Full Width(True/False)

नाट्यपंढरीकडे नाटकांची पाठ; गेल्या तीन वर्षात झाले अवघे १०३ प्रयोग

अस्तित्व टिकवण्यासाठी नाट्यगृहांची धडपड नाट्यपंढरी सांगलीत नव्या नाटकाचा शुभारंभ करूनच पुढे राज्यभर दौरा करण्याची प्रथा होती. अलीकडे मात्र सांगलीत नाटकांचे मोजकेच प्रयोग होत आहेत. गेल्या तीन वर्षात केवळ १०३ नाटकांचे सादरीकरण झाले. यातही राज्यनाट्य आणि हौशी मंडळांच्याच नाटकांचा समावेश आहे. व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवरील नाटकांनी पाठ फिरवल्याने नाट्यपंढरीतील नाट्यगृहांना तग धरून राहण्यासाठी उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधावे लागत आहेत. याचा नाट्याभीरुचीवर गंभीर परिणाम होत आहे. आद्य मराठी नाटककार विष्णूदास भावे यांनी १८४२ मध्ये सांगलीत ‘’ या नाटकाचा प्रयोग सादर करून महाराष्ट्रातील नाट्यकलेची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्यासह मास्टर दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व, मास्टर अविनाश अशा अनेकांनी नाट्यक्षेत्रात सांगलीचा नावलौकिक वाढवला. नाट्यपंढरीमध्ये आजवर तीन नाट्यसंमेलने झाली. नवीन नाटकाच्या तालमी पूर्ण होताच सांगलीच्या भावे नाट्यमंदिरात शुभारंभाचा प्रयोग करूनच राज्यभर दौरा सुरू करायचा, अशी प्रथाच गेल्या कित्येक वर्षांची होती. निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांना नाट्यपंढरीची प्रचंड ओढ होती. सांगलीतील चोखंदळ नाट्यरसिकांची दाद मिळाल्यानंतर राज्यभर नाटकाचे प्रयोग गाजणार असे समीकरणच होते. यामुळे सांगली आणि मिरजेत नेहमीच नाटकांची रेलचेल असे. अलीकडे मात्र अनेक कारणांनी सांगलीतील नाट्यप्रयोगांना उतरती कळा लागली. भावे नाट्यमंदिर, दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आणि मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिरात गेल्या तीन वर्षात नाटकांचे खुपच कमी प्रयोग झाले. नाटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या भावे नाट्य मंदिरात तीन वर्षात केवळ १०३ नाटके झाली. नाटकांशिवाय इतर सांस्कृतिक कार्यक्रम, सभासंमेलने असे २३९ कार्यक्रम झाले. नव्या नाटकांचा सांगलीत शुभारंभ करण्याची प्रथा जवळपास थांबली आहे. याशिवाय नाटकांचे दौरेही घटले आहेत. पुरेसे प्रेक्षक नसल्याचे कारण देत नाट्यसंस्था सांगलीला टाळतात. प्रत्यक्षात मात्र मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाची गैरसोय होऊ नये, यासाठी बहुतांश कलाकार मुंबई, पुण्याबाहेरचे नाट्यप्रयोग टाळतात, असा नाट्य वितरकांचा अनुभव आहे. मुंबईत ४० ते ५० हजारात होणा-या नाटकाच्या प्रयोगासाठी सांगलीत किमान दोन लाख रुपये मोजावे लागतात. यामुळे तिकीट दर वाढत असल्याने प्रेक्षकांच्या संख्येवर परिणाम होत आहे. व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत नसल्याने राज्यनाट्य स्पर्धा आणि काही स्थानिक नाट्य संस्थांच्या प्रयोगांवरच नाट्यरसिकांना समाधान मानावे लागते. नाटकांचे प्रयोग थांबल्याने नाट्यगृहांचेही आर्थिक नुकसान होत आहे. मनोरंजनाच्या अन्य साधनांमुळे नाटक पाहण्यासाठी येणा-या प्रेक्षकांमध्ये कमालीची घट झाल्याचे लक्षात घेऊन नाट्यगृहचालक अन्य पर्यायांकडे वळत आहेत. नाट्यगृहांच्या आवारात व्यावसायिक इमारती उभ्या होत आहेत. सभा, संमेलनांसह आता मंगलकार्यासाठीही नाट्यगृहांचा वापर सुरू झाला आहे. नाट्यसंस्था, निर्माते, कलाकार आणि प्रेक्षकांच्या उदासिनतेमुळे येणा-या काही दिवसात नाट्यगृहांचे रुपांतर मॉल किंवा मंगल कार्यालयांमध्ये होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाट्यक्षेत्रातील जबाबदार सर्व घटकांची ही उदासिनता समृद्ध नाट्यपरंपरेला बाधा आणणारी ठरू शकते. कलाकारांचे नाटकांकडे दुर्लक्ष नाटकांमध्ये काम करणारे आघाडीचे कलाकार चित्रपट आणि मालिकांमध्येही काम करतात. कलाकारांकडून चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला प्राधान्य दिले जाते. यातून वेळ मिळाल्यास नाटकाला तारखा दिल्या जातात. यातही सर्व कलाकारांच्या तारखा जुळवणे, त्यांच्या प्रवासाची, राहण्याची व्यवस्था करताना नाट्यसंस्थांची दमछाक होते. मुंबईत होणा-या नाटकाचा खर्च सांगली, कोल्हापुरात चौपट आकारला जातो. या खर्चात कपात केली तरच तिकिटांचे दर आवाक्यात रहू शकतात, असे नाट्य वितरकांना वाटते. नाट्यपंढरीमध्ये नाटकांचे प्रयोग कमी होण्यामागे सर्वात मोठे कारण नाटकाच्या वाढलेल्या खर्चाचे आहे. कलाकारांनी याचा विचार करण्याची गरज आहे. अन्यथा येणा-या काळात प्रेक्षक नाटकाकडे फिरकणारही नाहीत. मुकुंद पटवर्धन – अध्यक्ष, नाट्य परिषद सांगली शाखा प्रसिद्धीस आलेल्या सांगली शहरातील नाट्यगृहांसमोर स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही नाट्यगृहांनी उत्पन्नाचे वेगळे पर्याय स्वीकारले आहेत. वेळीच ही परिस्थिती सुधारणे आवश्यक आहे. डॉ. शरद कराळे – अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यमंदिर समिती, सांगली


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/350VOch