Full Width(True/False)

यंदाची दिवाळी जबाबदारीनं साजरी करा; कलाकाराचं चाहत्यांना आवाहन

गर्दी, फटाके नकोच सध्याची कठीण परिस्थिती बघता आपण सर्वांनीच जबाबदारीनं वागणं आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करता कामा नये. कामाशिवाय बाहेर पडणं टाळलं पाहिजे. संसर्गाचा धोका वाढणार नाही याची काळजी घ्यायला हवी. फटाक्यांच्या धुरामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पुढचं वर्षभर फटाक्यांचा वापर कटाक्षानं टाळायला हवाय. आपण सगळे एकत्र येऊनच या संकटावर मात करू शकतो. दिवाळीनंतर, सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी घेऊन आम्ही नाटकाचे प्रयोग सुरू करत आहोत. नव्यानं सुरू होणाऱ्या नाट्यप्रयोगांना रसिकांनी चांगला प्रतिसाद द्यावा, अशी इच्छा आहे. -सुनील बर्वे सकारात्मकतेची ज्योत दीपावली हा दिव्यांचा सण आहे. या सणाला आपण सगळे जण घरी पणत्या लावतो. या वर्षी सकारात्मक ज्योतीची, आशेच्या प्रकाशाची समाजाला गरज आहे. या उत्सवात आपण सगळ्यांनी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. या निमित्तानं मी सांगू इच्छिते, की शक्य असल्यास त्यांनी या सणाला एखाद्या गरजू कुटुंबाला मदत करावी. फटाके बिलकूल फोडू नयेत. कारण फटाक्यांच्या धुराचा त्रास कुणालाही होता कामा नये. आपण सगळ्यांनी मिळून आनंदानं सुरक्षित साजरी करू या. -वैदेही परशुरामी त्यांना होऊ दे मदत यंदाच्या दिवाळी सणाचं रूप नेहमीपेक्षा वेगळं असणार हे निश्चित आहे. या सर्वात आपण वेगळी दिवाळी कशा प्रकारे साजरी करू शकतो याचा विचार केला पाहिजे. अनेक लोक, खास करून महिला उदरनिर्वाहासाठी घरगुती फराळ बनवून विकत आहेत. लोक छोटे-छोटे व्यवसाय करत आहेत. तरुण मुलं-मुली स्वतः कंदिल बनवून त्याची विक्री करीत आहेत. दिवाळीमध्ये आपण जवळच्या माणसांना काही ना काही भेट देत असतो. या भेटवस्तू, दिवाळीसाठी लागणारं साहित्य अशा घरगुती व्यवसाय करणाऱ्यांकडून, छोट्या उद्योजकांकडून आपण विकत घेतलं पाहिजे. जेणेकरून आपलाही खर्च कमी होईल आणि त्यांनाही मदत होऊन त्यांची दिवाळी आनंदात पार पडेल. - रेणुका शहाणे घरातच, परिवारासोबतकरोना संकटामुळे सर्वच सण घरबसल्या साजरे झाले. दिवाळीही त्याला अपवाद नसेल. दरवर्षीसारखी धावपळ, सर्वांच्या भेटीगाठी शक्य होणार नाहीत. यंदाची दिवाळी आपल्याला शांतपणे, घरात राहून आपल्या परिवारासोबतच साजरी करावी लागणार आहे. परंतु, अत्यंत उत्साहात आणि सकारात्मक भावनेनं आपण हा सण साजरा करू या. शेवटी ही सगळी धावपळ आपण आपल्या परिवारासाठीच तर करत असतो. मग काय हरकत आहे, या वर्षाची दिवाळी संपूर्णपणे त्यांच्याबरोबरच साजरी करायला. शेवटी आपल्याला काय हवंय आणि आपण या सर्वाचा कशा पद्धतीनं विचार करतो हे महत्वाचं! - शब्दांकन - संजना पाटील शब्दांकन - गौरी आंबेडकर


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36tECvb