Full Width(True/False)

स्वप्निल जोशीच्या जाळ्यात अडकले 'चला हवा येऊ द्या' चे कलाकार

मुंबई- ‘’ गेली सहा वर्ष महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढणार आहे. याचं कारण म्हणजे शोमध्ये स्वप्निल जोशीची एण्ट्री होणार आहे. तो या कार्यक्रमात सिंहासनाधिष्ट होणार असून शोमधील कलाकारांचा तो मितवा, मार्गदर्शक होणार आहेत. दिवाळीच्या निमित्ताने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये एक नवा अध्याय सुरू होत आहे. यात थुकरटवाडीचा सेट पूर्णपणे बदलणार आहे. महाराजा प्रदीप सिंग ऊर्फ बच्चू जोशी यांच्या राजवाड्याच्या जागेवर थूकरटवाडी उभारण्यात आलेली असते. बच्चू जोशी ५०० वर्षांपूर्वीच मरण पावले आहेत. पण या थूकरटवाडीचे लोक त्या वास्तूशी छेडछाड करतात. याच रागातून राजाचा आत्मा तेथे येतो. सर्व थुकरटवाडीकरांना बंदी बनवतो आणि राजाला हसवण्याची, त्याचं मनोरंजन करण्याची शिक्षा देतो. हा सगळ्या हलका- फुलका माहोल ‘चला हवा येऊ द्या’च्या प्रेक्षकांना या दिवाळीत अनुभवता येणार आहे. ‘चला हवा येऊ द्या’च्या निर्मात्यांनी एक वेगळा प्रयोग यावेळी दिवाळीत केला आहे. यातील कलाकार सात दिवस एका फार्महाऊसवर राहणार आहेत. तेथे ते धमाल करणार आहेत. हसविण्याच्या या नवीन संकल्पनेत स्वप्निल राजाच्या भूमिकेत असणार आहे. सिंहासनावर बसून तो मनोरंजनाचा आनंद घेणार आहे. या कार्यक्रमात पाहुणा कलाकार म्हणून अनेकदा आला. पण यावेळी तो एका वेगळ्याच भूमिकेत या शोमध्ये दिसणार आहे. आपल्या या नव्या भूमिकेबद्दल बोलताना स्वप्निल जोशी म्हणाला की, 'चला हवा येऊ द्या'चा मंच माझ्यासाठी नवीन नाही. मी अनेकदा आलो तर आहेच पण त्याचबरोबर यातील कलाकारांशी माझा फार जुना परिचय आहे. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे हे सर्व ‘फू बाई फू’ कार्यक्रमातून पुढे आले आहेत. निलेश साबळे त्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक होता. त्यांचा प्रवास मी तेव्हापासून अनुभवतोय. त्या सर्वांचा मी चाहता आहे.' 'या नवीन प्रयोगाच्या माध्यमातून मी त्यांचा मितवा म्हणून कार्यक्रमात सहभागी होतो आहे. त्यामुळे आता मला या आवडत्या कार्यक्रमात सातत्याने सहभागी होता येईल, समोर बसून त्यांचा आविष्कार पाहता येईल, कलाकारांना दाद देता येईल. या कलाकारांना कोपरखळी मारता येईल, त्यांची गम्मत करता येतील, त्यांच्याकडून स्वतःचीही गंमत केलेली पाहता येईल. यासोबतच कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांनाही कम्फर्टेबल करता येईल.' स्वप्निल पुढे म्हणाला की,या कार्यक्रमात सहभागी होणं ही त्याच्यासाठी ‘विन-विन’ अशी परिस्थिती आहे. 'मला या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी हक्काने, प्रेमाने बोलावले आहे. मलाही खळखळून हसता येईल, मानसिक ताण कमी होईल. त्याहून महत्वाचं म्हणजे माझ्या चाहत्यांशी या माध्यमातून कनेक्ट होता येईल. त्यामुळेही या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा वेगळा आनंद मला आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kzGZln