Full Width(True/False)

रिव्ह्यू- :नावाप्रमाणे 'भारी' आहे 'सूरज पे मंगल भारी

कल्पेशराज कुबलkalpeshraj.kubal@timesgroup.com आजच्या न्यू नॉर्मल वातावरणात, पन्नास टक्के प्रेक्षक संख्येत, पूर्ण खबरदारी घेऊन हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव तुम्ही घायला हवा. कारण, 'सूरज पे मंगल भारी' हा चित्रपट त्याच्या नावातील शब्दाप्रमाणेच 'भारी' आहे. तो तुम्हाला हसवतो, तुमचं मनोरंजन करतो. सिनेमातील कुटुंब हे मराठी असल्याने कथेला आणि संवादांना मराठी भाषेचा चटपटीत फोडणी आहे. हे मराठी कनेक्शनही आपल्याला भावल्याशिवाय राहात नाही. कारण, सिनेमातील नायकाची पार्श्वभूमी पंजाबी आणि नायिकेची मराठी आहे. त्यामुळे पटकथेत निर्माण होणारे प्रासंगिक विनोद आपल्याला खळखळून हसवतात आणि समाधानही देतात. १९९५ मधील 'मुंबई'मध्ये घडणारी ही गोष्ट आपल्याला भावते याचे कारण दिग्दर्शक अभिषेक शर्मा आपल्याला सिनेमाच्या कथानकाशी एकरूप करून टाकतो. सिनेमा बघताना आपल्या चेहऱ्यावरील स्मितहास्य कायम राहते. सिनेमाची ट्रीटमेंट अत्यंत वेगवान आहे. गोष्टी पटापट घडतात, त्यामुळे आता पुढे काय होणार याची उत्सुकता संपूर्ण सिनेमाभर आपल्या मनात राहते. 'तेरे बिन लादेन', 'परमाणू', आणि 'द जोया फॅक्टर' सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन करणाऱ्या अभिषेक शर्मा याने त्याच्या 'सूरज पे मंगल भारी' चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. ही गोष्ट एक 'वेडिंग डिटेक्टिव्ह'ची मधू मंगल राणे (मनोज बाजपेयी) याची आहे. तो लग्न ठरलेल्या संभाव्य वरांचा, वेषांतर करुन पाठलाग करतो. त्याच्याविषयीच्या अप्रिय गोष्टी-प्रसंग कॅमेऱ्यात टिपतो. जेणेकरून हे फोटो तो मुलींच्या घरच्यांना दाखवून लग्न मोडता येईल. कोणत्याही मुलीचं लग्न चुकीच्या आणि वाईट सवयी असणाऱ्या मुलाशी होऊ नये यासाठी हा डिटेक्टिव्ह काम करत असतो. इतर वरांप्रमाणे मधू सूरजचं () लग्न देखील मोडतो. पण, ही गुप्तहेराची बाब सूरजला समजते आणि तो पलटवार करण्यासाठी मधू मंगल राणेच्या बहिणीचं लग्न मोडतो. पण, हे करत असताना तो स्वतःच तिच्या, अर्थात तुळशीच्या () प्रेमात पडतो. कथानकातील हा ट्विस्ट पुढे काय काय उलथपालथ घडवून आणतो हे पाहणं नक्कीच मनोरंजनक आहे. स्वतः डिटेक्टिव्ह असलेल्या मधूच्या बहिणीचं लग्न तुटल्यावर तो काय करतो? सूरज आणि तुळशीच्या प्रेमाचं काय होतं? हे दोघे एकत्र येतात का? पण, जर अगोदरच मधूनं सूरजचं लग्न तोडलं आहे, तर यावेळी तो आपल्या बहिणीशी सूरजला लग्न करुन देईल का? आदी सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील. पण, त्यासाठी तुम्ही सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहायला हवा. याबरोबरच, मधू सर्व मुलांची लग्नं मोडण्याच्या मागे का लागलेला असतो? त्याचंही रंजक उत्तर तुम्हाला चित्रपटात मिळेल. सिनेमातील प्रत्येक पात्र, व्यक्तिरेखेला स्वतःचं असं स्थान दिग्दर्शकानं पटकथेत दिलं आहे. हा डिटेक्टिव्ह असल्याने सिनेमात त्याचं वेगवेगळ्या रुपात दिसणं प्रेक्षकांच्या चकित करतं आणि हसवतंदेखील. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यानं ही विनोदी भूमिका उत्कृष्टरित्या निभावली आहे. मनोज वाजपेयीला अशा भूमिकांत पाहणं ही मेजवानी आहे. कलाकार म्हणून कोणत्याही धाटणीतील व्यक्तिरेखा आपण कुशलतेनं साकारु शकतो, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. त्याच्या अभिनय कौशल्याचा पुरेपूर वापर करून घेत दिग्दर्शक अभिषेक शर्मानं 'मधू मंगल राणे' ही व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली आहे. एक अमराठी व्यक्ती पहिल्यांदा मराठी बोलताना कशा प्रकारे बोलेल? मराठी नाटक पाहिल्यावर.. तो त्यावर कशी प्रतिक्रिया देईल आणि पंजाबी मुंबईकर कसा असेल? ते दिलजीत दोसांझनं चित्रपटात उत्तमरीत्या साकारलं आहे. तुळशीच्या भूमिकेत असलेल्या फातिमानं देखील मुंबईकर मराठी मुलीची भूमिका चांगल्या प्रकारे निभावली आहे. तिच्या तोंडी असलेलं एक वाक्य.. 'तुलसी नहीं.. तुळशी' यातून त्या व्यतिरेखेतील आणि संवांदफेकेतील बारकावे जाणवतात. तुळशीच्या आईच्या भूमिकेत असलेल्या सुप्रिया पिळगावकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला साजेसं संयमी काम यावेळी केलं आहे. एकंदरच चित्रपटातील सर्व कलाकारांनी त्यांच्या भूमिका उत्कृष्टरित्या वठवल्या आहेत. या भूमिकांना मिळालेले दिग्दर्शकीय संस्कारदेखील पडद्यावर दिसतात. सिनेमाच्या कलादिग्दर्शनाचं कामही उजवं आहे. १९९५ ची मुंबई पडद्यावर जिवंत होते. दिसायला सिनेमा आखीवरेखीव आहे. छायांकन आणि संकलनाच्या पातळीवर चित्रपट उत्तमरीत्या बांधला गेला आहे. शेवटपर्यंत तो आपल्याला गुंतवून ठेवतो. त्यामुळे, बऱ्याच दिवसांनंतर थिएटरमध्ये पाहण्यासाठी एक चांगला चित्रपट आला आहे हे नक्की. सिनेमा : सूरज पे मंगल भारी निर्मिती : झी स्टुडिओज कथा / दिग्दर्शक : अभिषेक शर्मा लेखन : रोहन शंकर, शोखी बॅनर्जी कलाकार : मनोज वाजपेयी, दिलजीत दोसांझ, फातिमा सना शेख, सुप्रिया पिळगावकर, मनोज पाहवा, अनु कपूर छायांकन : अंशुमन महाले संकलन : रामेश्वर भगत दर्जा : तीन स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lxGlpD