Full Width(True/False)

'असा' आहे मराठी सेलिब्रिटींचा न्यू इअर पार्टी प्लॅन

मुंबई टाइम्स टीम नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. कुठे मित्र-मैत्रिणी एकत्र जमणार आहेत तर कुठे कुटुंबियांसोबत बाहेर जाण्याचं प्लॅनिंग सुरु आहे. गेले काही महिने खडतर गेल्यानंतर सगळेच नवीन वर्षाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्यामुळे नियोजनही जोरदार सुरु आहे. याला कलाकारही अपवाद नाही. काही कलाकार निसर्गाच्या जवळ जात सेलिब्रेशन करणार आहेत. तर काही मंडळी घरच्यांसोबत नव्या वर्षाचं स्वागत करणार आहेत. 'दरवर्षी नव वर्षाचं स्वागत मी आमच्या 'मिथक मुंबई' या नाट्यसंस्थेतील रंगकर्मींसोबत करतो. कॉलेजच्या दिवसांमध्ये आम्ही ही संस्था स्थापन केली होती. आज त्यातील सदस्य रंगकर्मी कलाक्षेत्रासह विविध व्यवसायात आहेत. पण, आम्ही नववर्षानिमित्त नेहमी एकत्र येतो. एकमेकांसोबत नववर्षांचं स्वागत करतो. यंदा आम्ही अलिबाग येथे जाणार आहोत. पण, यंदाचं सेलिब्रेशन फार मोठं नसणार आहे. आपल्यावरील करोनाचं संकट अद्याप पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळे सुरक्षिततेची काळजी घेत छोटेखानी कार्यक्रमच आम्ही करणार आहोत.' असं अभिनेता आशुतोष गोखलेनं सांगितलं. यावेळी आशुतोष बरोबर त्याचा मित्र अभिनेता अद्वैत दादरकर देखील असणार आहे. 'आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी आमच्या 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाची तालीम आहे. नववर्षात पुन्हा एकदा आम्ही रंगभूमीवर हे नाटक घेऊन येत आहोत. त्यामुळे मी नववर्षाचं स्वागत तालमीनेच करणार आहे. तसंच उद्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी आगामी वेब सीरिजच्या कामाला प्रारंभ होणार आहे. मी त्याच्या चित्रीकरणात व्यग्र असणार आहे' असं अभिनेत्री ऋता दुर्गुळेनं सांगितलं. तर अभिनेता आरोह वेलणकर म्हणतो की, 'मी सध्या मढमध्ये माझ्या मालिकेचं चित्रीकरण करतोय. पण, आम्हाला नववर्षानिमित्त दोन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे मी माझं पुण्याचं घर गाठणार आहे. बायकोसोबत कँडल लाइट डिनरचा बेत आखला आहे'. 'आम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र वेळ घालवणार आहोत. पाणशेतला एकत्र जमणार आहोत. त्या सगळ्यांना मी बनवलेला स्वयंपाक आवडतो. म्हणून मी घरुन काही पदार्थ बनवून घेऊन जाणार आहे. तसंच तिथे गेल्यावर वेगवेगळे खेळ खेळणार आहोत.हसत-खेळत नव वर्षाचं स्वागत करणार आहे', असं अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत सांगते. 'यंदा आम्ही काही मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीय नागोठाणे येथील एका फार्महाऊसवर एकत्र जमलो आहोत. चार-पाच दिवस राहण्याचा प्लॅन आहे. घरगुती पद्धतीनं सेलिब्रेशन करणार आहोत. या घराची काळजी घेणारं कुटुंब रुचकर स्वयंपाक करतं. आता पुढचे काही दिवस आम्ही सगळे मिळून स्वयंपाक करणार आहोत. अनेक चविष्ट पदार्थांची रेलचेल असेल. गेम्स खेळणार आहोत. तसंच डबल सेलिब्रेशन आहे. एक म्हणजे नव्या वर्षाचं स्वागत आणि दुसरं म्हणजे क्षितीचा वाढदिवस उद्या (१ जानेवारीला) असतो, तोही इथेच साजरा करणार आहोत. एकंदरच धमाल असणार आहे', असं हेमंत ढोमे सांगतो. तर मुंबईपासून दूर चित्रीकरण सुरु असलेल्या मालिकांचे कलाकार तिथेच राहून टीमसोबत सेलिब्रेशन करणार आहोत. 'आमच्या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्याला सुरु आहे. तिथून एका दिवसासाठी मुंबई गाठणं अशक्य आहे. संपूर्ण दिवस प्रवासात जाईल. त्यामुळे मालिकेची टीम कास पठारावर जाणार आहे. तिथे आजूबाजूच्या परिसरात फिरु आणि एका फार्महाऊसवर सेलिब्रेशन करु', असं अभिनेता विवेक सांगळे सांगतो. अशा प्रकारे कलाकार आपापल्या कामांतून वेळ काढल नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे. सेलिब्रेशनमधून आनंद मिळण्यासाठी कलाकारांचं जोरदार प्लॅनिंग सुरू आहे. चित्रीकरणाला सुट्टीछोट्या पडद्यावरील अनेक मालिकांना नववर्षानिमित्त सुट्टी देण्यात आली आहे. 'आई कुठे काय करते', 'सहकुटुंब सहपरिवार', 'रंग माझा वेगळा', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'फुलाला सुगंध मातीचा', 'देवमाणूस', 'कारभारी लयभारी', 'डॉक्टर डॉन' आणि 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकांना सुट्टी आहे. त्यामुळे मालिकेतील काही कलाकार घरी तर काही जण मुंबईजवळच शॉर्ट ट्रिप करत नववर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3o5klUp