Full Width(True/False)

एके व्हर्सेस एके: 'झक्कास' प्रयोग

अभिषेक खुळे वाढतं वय वगैरे या गोष्टी काही जणांच्या बाबतीत झूठ असतात. बस्स, दिल में जिंदादिली बरकरार होनी चाहिये. अभिनेता अनिल कपूरकडे पाहून याची खात्री पटते. आजही तो तसाच आहे, जसं त्याला गेल्या ४० वर्षांपासून पडद्यावर आपण पाहत आहोत. नुसतं त्याचं दिसणंच नाही तर त्याचं असणंही ऊर्जेची अनुभूती असते. नव्यानं प्रदर्शित झालेल्या ‘एके व्हर्सेस एके’मध्येही त्याची खात्री पटलीय. आता मूळ मुद्द्याकडे वळू. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित ‘एके व्हर्सेस एके’ गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आला तेव्हा ‘हे काय भलतंच’ म्हणत काहींनी मोठी उत्सुकता दर्शविली तर काहींनी नाकं मुरडली. स्वत:चीच पात्रं साकारण्याचा हा फालतू स्टंट आहे, असंही अनेकांनी बोलून दाखवलं. प्रत्यक्ष चित्रपट पाहिला तेव्हा ‘ये तो कुछ अलग है बॉस...’ची साक्ष पटली. तसं पाहिलं तर हा चित्रपट चर्चेत येण्याआधी दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्यातील सोशल मीडियावरील वाद लोकांच्या नजरेत भरले. साधारणत: १७ वर्षांपूर्वी अनुरागनं आपल्या ‘ऑल्विन कालीचरण’ चित्रपटासाठी अनिल कपूरला विचारणा केली होती. मात्र, त्यावेळी त्यानं अनुरागला नकार दिला होता. अनुरागनं सोशल मीडियातून याविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. एकमेकांवरील टीका-टिप्पणीचा हा खेळ अधेमधे अनेकांनी अनुभवला. मात्र, येणाऱ्या ‘एके व्हर्सेस एके’साठी तर ही तयारी नव्हती ना, असा हलका विचार हा चित्रपट पाहताना मनात डोकावतो. चित्रपटाबद्दल एका शब्दात सांगायचं झालं तर बॉलिवूडमध्ये आजपर्यंत कधीही असा वेगळा प्रयोग झालेला नाही. त्यामुळे तो ‘चांगला’ या वर्गात मोडतो. ट्रेलरवरून उलटसुलट चर्चा झाल्या असल्या तरी चित्रपट मात्र एक चांगली अनुभूती देऊन जातो. अनिल कपूरला आता अनुरागसोबत काम करायचं आहे. मात्र, अनुराग मागच्या गोष्टी विसरलेला नाहीय. अशातच, एका शोमध्ये अनुराग कश्यप आणि अनिल कपूर एकमेकांवर शाब्दिक कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. अनिलच्या मते चित्रपट केवळ स्टार चालवू शकतात. तर ‘हे फक्त दिग्दर्शकाचं माध्यम आहे’, यावर अनुराग ठाम असतो. तो भर शोमध्ये अनिल कपूरच्या चेहऱ्यावर ग्लासमधलं पाणी फेकतो. खळबळ उडते, मीडियात चर्चा होते. मग अनुराग एक वेगळा खेळ खेळण्याचं ठरवतो, अनिलला घेऊन एक रिअल सिनेमा बनवण्याचा. अनिलची मुलगी अभिनेत्री सोनम कपूरचं तो अपहरण करतो. तिला शोधण्यासाठी अनिलला दहा तासांचा वेळ देतो. यात पोलिस तसेच बाहेरचे कुणी सहभागी नसतील, फोन लाउडस्पीकरवर असेल, कॅमेरा सुरू राहील, अशा अटी घालतो. मग सुरू होतो ‘लाइव्ह’ खेळ. तो अगदी खरा वाटावा, याचे पूर्ण प्रयत्न दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानेनं केले आहेत. अनिल कपूरचं रस्त्यांवर भटकणं, जंग जंग पछाडणं, कित्येकांपुढे याचना करणं वगैरे वगैरे पाहताना आपणही स्तंभित होतो. अनुरागनं दिलेले दहा तास कमी होत जातात, तशी आपली उत्कंठाही वाढत जाते. यात अनुराग, अनिल यांच्यासह , , , योगिता बिहानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांनी त्यांचीच पात्रं यात साकारली आहेत. आपल्या पहिल्याच चित्रपटापासून ‘उडान’ भरणाऱ्या दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानेचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही कथेचं सोनं करणं. ते यातही दिसलं. अविनाश संपतनं कथा चांगली रचलीय. अभिनयात सगळेच सरस आहेत. अनिल कपूरचं ‘नायक’त्व यातही सिद्ध झालंय. आलोकनंदा दासगुप्ताचं पार्श्वसंगीत थ्रिलिंगला साजेसं आहे. बॅकग्राउंडला असलेली गाणी रॅप प्रकारातली आहेत. कुठंही वेळ न घालवता थरार कायम ठेवण्यात विक्रमादित्य यशस्वी ठरलाय. एकंदरीत, एक नवा नि वेगळा प्रयोग बॉलिवूडमध्ये झालाय. त्याचे साक्षीदार होण्याची ही 'झक्कास' संधी आहे. एके व्हर्सेस एके निर्माता : दिपा मोटवाने दिग्दर्शन : विक्रमादित्य मोटवाने कलाकार : अनिल कपूर, अनुराग कश्यप, सोनम कपूर, हर्षवर्धन कपूर, बोनी कपूर, योगिता बिहानी लेखन : अविनाश संपत, विक्रमादित्य मोटवाने संगीत : आलोकनंदा दासगुप्ता ओटीटी : नेटफ्लिक्स दर्जा : साडेतीन स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34ScxOm