Full Width(True/False)

त्या नंतर कर्जाच्या डोंगराखाली आम्ही दहा वर्षं काढली; पण...आदिनाथनं सांगितली खटारा गाडीची आठवण

एका प्रख्यात चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॅालिवूड आणि मराठी चित्रपटांना एकत्रित गौरवलं जातं. त्यामध्ये माझ्या वडिलांना त्यांच्या एका चित्रपटासाठी नामांकन होतं. मी नुकताच कॉलेजला जायला लागलो होतो. त्या वयात आपल्याला असं भासवायला लागतं की आता आपण वयात आलो आहोत आणि शहाणे झालो आहोत पण खरं तर आपण अतीशहाणे झालेलो असतो. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. आमच्या कुटुंबाच्या जीवनातही आले. माझ्या वडिलांनी यशाचं शिखर गाठलेलं. लागोपाठ सहा-सात सुपरहिट चित्रपट बनवले होते. तेव्हा मी खूप लहान होतो. मी दहावीत असताना त्यांनी एका हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्या डोंगराखाली आम्ही पुढची दहा वर्षं काढली. पण त्या डोंगराच्या सावलीतही एका वादळाला झुंज देणाऱ्या पर्वतासारखे उभे राहाणारे माझे आई-वडील मी कधीच विसरू शकणार नाही. तर अशा परिस्थितीत आम्ही त्या प्रख्यात चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पोहोचलो. माझ्या वडिलांनी दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकावला. सोहळा संपन्न झाला आणि आम्ही इतर सगळ्या दिग्गज कलावंतांसोबत बाहेर पडत होतो. रेड कार्पेटच्या पलीकडे व्हीआयपी प्रवेशद्वार होतं. तिथे सगळ्या सुप्रसिद्ध बॅालिवूड कलावंतांच्या महागड्या गाड्या त्यांना न्यायला येत होत्या आणि ते सगळे सुपरस्टार मीडियासाठी पोझमध्ये फोटो देत होते. जमलेल्या पब्लिकला हातवारे करून ऐटीत त्यांच्या वाहनांमध्ये बसून जात होते. कुठल्या तरी खान किंवा कपूर नंतर आम्ही त्या प्रवेशद्वारी पोहोचलो. माझ्या वडिलांना बघून जमलेली पब्लिक चेकाळली. आपल्या मातीतल्या स्टारवर आपला मराठी प्रेक्षक नेहमीच जास्त प्रेम करतो. शिट्ट्यांचा आवाज झाला. मीडिया कचाकच फोटो काढत होते. वडिलांच्या मागे मी आणि आई उभे होतो. तिथला दरबान माझ्या वडिलांकडे आला आणि त्यानं आमच्या गाडीचा नंबर मागितला. मग जाऊन त्यानं तो नंबर लाऊड स्पीकरवर सांगितला. त्या क्षणी माझी ट्यूब पेटली. आमच्याकडे तेव्हा त्या आर्थिक परिस्थितीत एक सेकंड हँड कार होती जी दर दोन दिवसांनी बंद पडायची. तिला धक्का मारून सुरू करावं लागायचं. मला अचानक आमच्या परिस्थितीची खूप लाज वाटली. आधीच्या कलावंतांच्या चकचकीत मोठ्या गाड्यांसमोर जर आपली खटारा सेकंड हँड गाडी इथे या पब्लिक आणि मीडियासमोर आली तर काय होईल या विचारानं मी बैचेन झालो. मी पटकन माझ्या वडिलांजवळ जाऊन त्यांच्या कानात पुटपुटलो. “डॅड, आपण पार्किंग लॅाटमध्ये जाऊन गाडी घेऊ या ना. इथे कशाला? इथे येऊन बंद पडली तर...” माझ्या वडिलांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाले, “शट अप. गाडी इथेच येणार आणि आपण त्यात बसून जाणार”. माझी बोलती बंद. मी आईकडे आशेने बघितलं तर ती सुद्धा माझ्यावर हसली. आता आपली खटारा या ठिकाणी आल्यावर काय होणार या भीतीनं मला घाम फुटायला लागला. ही भीती माझ्या आई-वडिलांना का वाटत नव्हती याचा मला रागही आला होता. माझ्या डोक्यातल्या कल्पना सैरभैर फिरत होत्या. सगळ्या पब्लिकला काय वाटेल? कुणी कमेंट्स किंवा टोमणे मारले तर ? लोक हसले तर ? आम्हाला गाडीसाठी थांबून बराच वेळ झाला होता. गाडी अजून दिसत नव्हती. कदाचित आपली गाडी सुरूच होत नसावी या विचारानं माझा जीव जरा शांत झाला. पुन्हा वडिलांना सांगण्याचं धाडस करून बघितलं. “डॅड, मला वाटतं गाडी बंद पडली आहे. आपल्याला आता पार्किंग लॅाटमध्येच...” इतक्यात मला समोरून आमची गाडी येताना दिसली. माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. आमची कार आमच्या समोर येऊन थांबली. आम्ही त्यात बसलो. बसताना त्या सर्व चाहत्यांचा गदारोळ तसाच चालू राहिला. त्या गदारोळातून एक कमेंट आमच्या कानावर पडली. ती होती “ए ड्रायव्हर ! सो रहा था क्या ?” माझ्या वडिलांना इतका वेळ गाडीसाठी थांबायला लावलं म्हणून एक फॅन आमच्या वाहनचालकावर चिडला असावा. मी तेव्हा जो भयानक विचार करत होतो तसं काहीच घडलं नाही हे बघून मी नक्कीच सुखावलो असेन, पण तसं का नाही घडलं याचं उत्तर मला माझ्याच नकळत हळूहळू उमगत गेलं असावं. प्रेक्षकांची आपल्याकडून फक्त एकच अपेक्षा असते. आपल्याकडून त्यांना दुसरं काहीही नको असतं. ती अपेक्षा असते प्रामाणिकपणाची. तो प्रामाणिकपणा आपल्या कामातला असो किंवा आपल्या आयुष्यातला. त्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहते आणि आपल्याला फक्त त्यांचं प्रेम. हाच खरा पुरस्कार !


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pAaPJu