मुंबई- 'सेक्रेड गेम्स' ही वेब सीरिज अशा काही सीरिजपैकी एक आहे ज्याने भारतातील ओटीटी प्लॅटफॉर्मची ओळख बदलून टाकली. या लोकप्रिय सीरिजचे दोन सीझन रिलीज झाले आहेत. यात सरताज सिंग म्हणजेच सैफ अली खान मुंबई शहर वाचवू शकणार का? याच्या कथेचं पुढे काय झालं असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिले आहेत. त्यामुळेच अनेकांना ३ येईल अशी आशा होती. पण याच्या उत्तराने मात्र चाहत्यांची निराशाच केली. नाही होणार सेक्रेड गेम्स ३- 'सेक्रेड गेम्स' या सीरिजमध्ये कोणा एका व्यक्तीची सर्वात जास्त कोणत्या भूमिकेचं कौतुक झालं असेल तर ते म्हणजे गणेश गायतोंडे या भूमिकेचं. नवाजुद्दीन सिद्दीकी याने गणेश गायतोंडेची भूमिका साकारली होती. या सीरिजचा तिसरा भाग येणार नसल्याचं त्याने नुकतंच सांगितलं. एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत नवाज म्हणाला की, 'ज्या प्रकारे सेक्रेड गेम्सचे जगभरात कौतुक झाले, त्याची कुणीच कल्पना केली नव्हती. मला आठवतं की मी रोममध्ये तनिष्ठा चॅटर्जीच्या सिनेमाचं चित्रीकरण करत होतो. तिथे बरेच लोक सेक्रेड गेम्सविषयी बोलत होते. नवाजुद्दीन पुढे म्हणाला की, 'तिथेच आम्ही याचा दुसरा भाग करण्याचा निर्णय घेतला.' पहिल्या सीजनच्या तुलनेत दुसरा सीझन यशस्वी न झाल्याचंही यावेळी नवाजने मान्य केलं. पहिल्या सीझनमध्ये जो प्रामाणिकपणा होता तो दुसऱ्या सीझनमध्ये कमी पडल्याचं त्याने मान्य केलं. याबद्दल अधिक बोलताना नवाज म्हणाला की, 'तिसरा सीझन येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण कादंबरीच्या आधारे जे म्हणायचं होतं ते आम्ही दोन सीझनमध्ये सांगितलं. आता विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीत काहीच शिल्लक नाही. त्यामुळे सीझन तीनमध्ये काय दाखवणार हा प्रश्न आहे.' या सीरिजमधलं त्याची गणेश गायतोंडे ही व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय झाली होती. गणेशचे अनेक संवाद लोकांच्या तोंडावर होते. पण या साऱ्याचं श्रेय नवाज स्वतःला न देता लेखकाला देतो. 'भारतात अनेकदा यशस्वी संवादाचं श्रेय कलाकाराला दिलं जातं. पण त्याचं श्रेय लेखकाचं आणि ज्यांनी संवाद लिहिले त्यांचं आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hJmYcd