Full Width(True/False)

'काम मिळवण्यासाठी हांजी-हांजी किंवा लाडीगोडीचं वागणं मला जमत नाही'

‘’ मालिकेत ‘काव्या’ या रुचिता जाधव हिनं साकारलेल्या भूमिकेला रसिकांची दाद मिळाली. सौंदर्य स्पर्धेपासून वैविध्यपूर्ण मालिका, चित्रपट आणि लघुपट असा तिचा दोन दशकांचा प्रवास आहे; मात्र उत्तम अभिनेत्री म्हणून दाद आणि ओळख मिळवण्यासाठी अनेक वर्षं संघर्ष करावा लागला, हे ती आवर्जून नमूद करते. मराठी मुलींमध्ये उपजत सौंदर्य आणि बुद्धीमत्ता हे ‘कॉम्बिनेशन’ असल्यानं गेली अनेक वर्षं ग्लॅमर इंडस्ट्रीत मराठी मुली झळकताहेत, असं ती सांगते. ‘एनिग्मा...’ लघुपटाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होतंय. दोन दशकांच्या प्रवासात तुला अशी दाद मिळायला थोडा उशीर झाला, असं वाटत नाही का?- निश्चितच असं घडलंय खरं. भरपूर हिंदी-मराठी मालिका आणि चित्रपट करूनही माझ्या संघर्षाचा कालावधी थोडा जास्त लांबला. अर्थात त्याबद्दल माझी तक्रार नाही. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला निश्चितच मिळतं. आता अनेक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्ससाठी विचारणा होत आहे. ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर यांच्यासोबत अभिनय करणं, या आव्हानाला कशी सामोरी गेलीस? मुळात लघुपटाचं गणित कसं जमलं?- प्री कोव्हिड काळात घरी असताना निखिल लिमयेंचा फोन आला. भली मोठी ऑडिशन दिली. निर्माता-दिग्दर्शक अभय ठाकूर यांना इंग्रजीवर प्रभुत्त्व असणारी मुलगी हवी होती. मी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. या लघुपटासाठी आम्ही तीन महिने कार्यशाळा करत होतो. यतीन सरांसोबत काम करणं म्हणजे अखंड शिकणं, असं मी म्हणेन. हॉलिवूड स्टाइलनं, तितक्याच शिस्तीनं आम्ही हा लघुपट केला. त्यासाठी मी १५ किलो वजन वाढवलं होतं. फेमिनासारख्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिस फोटोजिनिक’ किताब मिळवल्यानंतर या क्षेत्राची काहीच पार्श्वभूमी नसताना अभिनयाकडे वळायचा निर्णय कसा घेतलास? इथं अनेकांना बऱ्या-वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. तुझा अनुभव? - फेमिना सौंदर्यस्पर्धेतच प्रोत्साहन मिळालं. मी फॅशन डिझायनिंगची विद्यार्थिनी असताना डॉ. , कोरेना मॅम यांनी आग्रह करून स्पर्धेत उतरण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मिस फोटोजिनिक टायटल मिळालं. पुढे एकातून एक अशा संधी मिळत गेल्या. नशिबानं मला वाईट अनुभव आला नाही. मी थोडी फटकळ आहे आणि उगाचच काम मिळवण्यासाठी हांजी-हांजी किंवा लाडीगोडीचं वागणं मला जमत नाही. तुम्ही तुमचा आत्मसन्मान जपून वागताय-वावरताय हे दिसलं, की आपसूकच लोक अदबीनं वागतात. हिंदी-मराठी मालिकांच्या दीर्घ अनुभवाबद्दल काय सांगशील?- हिंदीत मी २०१२ मध्ये ‘वीर शिवाजी’ ही मालिका केली. पुढे अनेक मालिकांमध्ये झळकले; मात्र मराठी अभिनेत्री आहे म्हणून ‘पर डे’ मानधनाबाबत लावला जाणारा निकष मला पटला नाही. त्यापेक्षा मातृभाषेतच अधिक काम केलेलं चांगलं या विचारातून मग मी अनेक मालिका केल्या. त्यानंतरही लांबलेल्या संघर्षाच्या कालावधीतबद्दल माझी तक्रार नाही. ‘अरे बाबा पुरे’ या चित्रपटातून तू २०११ मध्ये अभिनयात पदार्पण केलंस. त्यानंतर ‘माणूस एक माती’, ‘वात्सल्य’, ‘चिंतामणी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलीस. तरीही नायिका म्हणून खास तुझा असा चित्रपट येणं बाकी आहे. या पुढे निवडक कलाकृतींमध्ये दिसणार आहेस का?- सुरुवातीच्या काळात मला कुणी सल्ला देणारंही नव्हतं. अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत चित्रपट केले तेव्हा खूप शिकायला मिळालं. तुझ्यासाठी तुझं असं एक वळण नक्की येईल, तोपर्यंत मिळालेल्या संधीचं सोनं करत राहा, असा सल्ला त्यांनी दिलेला. तो प्रमाण मानत मी माझं काम करत राहिले. यापुढे मात्र अभिनेत्री म्हणून आनंद देतील, अशाच कलाकृतींमध्ये मी दिसेन.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39Zumhx