मुंबई- आताच्या काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्या कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात नाव कमावणाऱ्या या महिलांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये रोजच्या आयुष्यात खाचखळग्यांनी भरलेला रस्ताच दिसतो. बॉलिवूडमध्ये काही वर्षांपासून महिलांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपटांची निर्मिती करण्यात येतेय. अशा चित्रपटांना प्रेक्षकांचीदेखील प्रचंड पसंती मिळते, हे महत्वाचं. दरवर्षी ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने महिलांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटांवर एक नजर टाकूया. २०२० साली प्रदर्शित झालेला 'थप्पड' हा चित्रपट एका सामान्य महिलेची असामान्य गोष्ट सांगणारा चित्रपट होता. स्वतःवर झालेला अन्याय सहन न करण्याचा निर्धार केलेल्या एका महिलेची ही गोष्ट आहे. पती, कुटुंब आणि घर संसारात रमलेली एक गृहिणी स्वतःचं अस्तित्व विसरून जाते. त्यात एक मारलेली कानाखालीदेखील घरगुती हिंसा असते, याची जाणीव या चित्रपटाने करून दिली. घरगुती हिंसाचारावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होती. इंग्लिश विंग्लिश बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुख्य भूमिका असलेला 'इंग्लिश विंग्लिश' हा चित्रपट एका गृहिणीच्या आयुष्यावर आधारित होता. ज्यात ती महिला तिच्या मुलांसाठी आणि पतीसाठी तिचं संपूर्ण आयुष्य खर्च करते पण त्याबदल्यात तिच्या कुटुंबाकडून तिला हवा असलेला मान मिळत नाही. तिचा पती आणि मुलं तिला इंग्रजी येत नसल्याने तिची थट्टा करतात. शेवटी ती कुटुंबातील तिचा मान मिळवण्यासाठी इंग्रजी भाषा शिकते आणि स्वतःला सिद्ध करते. गौरी शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम लाभलं. अभिनेत्री कंगना रणौतचा 'क्वीन' हा चित्रपट प्रेक्षकांना पसंत पडला होता. एका सरळ साध्या मुलीच्या आयुष्यावर आधारित आहे. जिच्यासाठी आई वडिलांचं म्हणणं ऐकणं आणि पतीच्या म्हणण्याप्रमाणे संपूर्ण जीवन जगणं सर्वकाही असतं. पण गोष्ट तेव्हा बदलते जेव्हा तिचा होणारा नवरा लग्नाला नकार देतो आणि ती एकटीच हनिमूनसाठी जाते. पिंक अनिरुद्ध रॉय यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. महिला सशक्तीकरणावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने महिलांच्या नकाराचा अर्थ नकारचं असतो हे प्रेक्षकांना समजावलं. तापसीने या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारली होती. शारीरिक संबंध ठेवताना महिलांच्या परवानगीची गरज असते, ही कल्पना या चित्रपटाने प्रेक्षकांसमोर मांडली. अज्जी २०१७ साली प्रदर्शित झालेला 'अज्जी' हा चित्रपट महिला दिनाच्या दिवशी अगदी उत्तम उदाहरण आहे. चित्रपटात बलात्कार आणि त्याचा घेतला जाणारा बदला दाखवण्यात आला आहे. एका झोपडीमध्ये राहणारी एक वयस्कर महिला तिच्या नातीवर झालेल्या बलात्काराचा कसा प्रतिशोध घेते, यावर हा चित्रपट आधारित आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'राजी' चित्रपटात आलिया भट्टने एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. ज्यात तिला देशासाठी पतीसह संपूर्ण कुटुंबाचं बलिदान द्यावं लागतं. शेवटी तिच्या नशिबी एकटेपण येतं आणि संपूर्ण आयुष्य तिला त्यांच्या आठवणीत काढावं लागतं. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून यात एका महिलेची अनेक रुपं अत्यंत ठळकपणे दाखवली गेली आहेत. लिपस्टिक अंडर माय बुरखा दिग्दर्शक अलंकार श्रीवास्तव यांचा 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. भोपाळमधील एका गल्लीबोळात राहणाऱ्या चार वेगवेगळ्या महिला ज्यांना या समाजाच्या रूढी परंपरांना छेद देऊन नवीन आणि मोकळं आयुष्य जगायचं आहे, अशा महिलांवर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ruTu5V