Full Width(True/False)

'मला धर्म शिकवू नका', गश्मीर महाजनीची युझरला सणसणीत चपराक

मुंबई- लोकप्रिय मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांचा सुपुत्र असलेला सुप्रसिद्ध अभिनेता सध्या मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहे. 'देऊळ बंद' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा गश्मीर चाहत्यांचा लाडका असून तो सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. वैयक्तिक आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी असो किंवा व्यावसायिक घडामोडी, प्रत्येक गोष्ट तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. सोशल मीडियावर गश्मीरच्या चाहत्यांची संख्यादेखील प्रचंड आहे. परंतु, अकेही काही आहेत जे गश्मीरला ट्रोल करण्याची संधी सोडत नाहीत किंवा सातत्याने तसा प्रयत्न करताना दिसतात. अलीकडेच गश्मीरने त्याच्या मुलाचे जावळ केलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. हे फोटो पाहून अनेकांनी बाप- लेकाच्या जोडीला हिट जोडी म्हटलं तर काहींनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. या फोटोंत दोघांनीही पांढऱ्या रंगाचं धोतर नेसलं आहे. गळ्यात माळा आहेत आणि छोट्या व्योमचे केस कापले आहेत. एका फोटोत गश्मीरने व्योमच्या डोक्यावर हात ठेवला आहे. तर दुसऱ्या फोटोत तो व्योमचे केस ओढताना दिसत आहे. या फोटोला गश्मीरने नारळ पाणी, कुणाला हवंय का? असं कॅप्शन दिलं आहे. हे फोटो पाहून एका युझरने त्यावर प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिलं, 'काका शेंडी नका ओढू हो, धर्म आहे आपला तो...!' त्यावर गश्मीरने त्याला सुनावत त्याची बोलतीच बंद केली आहे. गश्मीरने त्याला उत्तर देताना लिहिलं, 'मुळात ही त्याची शेंडी नाही. तो फक्त दोन वर्षांचा आहे. त्याची मुंज झालेली नाही. उन्हाळा म्हणून केस कापले आहेत. बापाला आपल्या मुलाची शेंडी ओढण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण आपण बहुतेक आपल्या धर्माचे शिलेदार आहात. पण पूर्ण माहिती नसताना अशा बेजबाबदार कमेंट करू नका. धन्यवाद.' अशा शब्दात गश्मीरने त्याचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यावर इतर चाहत्यांनीही गश्मीरची बाजू घेत त्या युझरला सुनावलं आहे. अनेकांनी गश्मीरच्या फोटोंचं कौतुक केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3a4KYE7