मुंबई- भारताचा कॅप्टन कूल अर्थात महेंद्रसिंग धोनीने क्रिकेट विश्वामध्ये आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अनेकांसाठी धोनी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये यशस्वी कर्णधार म्हणून यशस्वी ठरलेला धोनी आता लवकरच एका वेगळ्या भूमिकेत समोर येत आहे. त्याची ही भूमिका क्रिकेट जगताशी संबंधित नाही. तुम्हाला विचार पडला असेल की आता धोनी नेमके काय करणार आहे? तर धोनी आणि त्याची बायको साक्षीने एक निर्मिती संस्था काढली आहे. हो तुम्ही बरोबर ऐकले आहे. क्रिकेटपटू आता आपल्यासमोर चक्क निर्माता म्हणून येणार आहे. धोनी आणि निर्माता? या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरा कठीणच आहे. परंतु हे खरे आहे. महेंद्रसिंग धोनी आणि त्याची बायको यांनी धोनी एण्टरटेनमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि ब्लॅक व्हाईट ऑरेंज प्रायव्हेट लिमिटेड या नावाच्या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. इतकेच नाही तर या निर्मिती संस्थेतर्फे एमएस धोनीच्या नावाने चक्क एक स्पाय सीरिजची निर्मिती केली जाणार आहे. ही देशातील पहिली अॅनिमेटेड स्पाय सीरिज असणार आहे. या सीरिजचा पहिला सिझन २०२२ मध्ये रिलीज होणार आहे. या सीरिजचे नाव ‘’ असे आहे. धोनीच्या जर्सीचा नंबरही ७ होता. त्यावरूनच हे नाव घेतले आहे. ‘कॅप्टन ७’ या स्पाय अनिमेटेड सीरिजबद्दल धोनीने सांगितले, 'या सीरिजची कथा आणि संकल्पना खूपच छान आहे. या माध्यमाद्वारे क्रिकेटव्यतिरीक्त इतर माध्यमात काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होईल.' साक्षीने सांगितले की, 'माहीवर अॅनिमेटेड फिक्शन करण्याची कल्पना आमच्यासमोर आली तेव्हा आम्ही त्यासाठी लगेचच तयार झालो. ही सीरिज अतिशय उत्कंठावर्धक असणार आहे.' महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारीत 'एमसएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' हा बायोपिक येऊन गेला आहे. हा सिनेमा खूपच लोकप्रिय झाला होता. या सिनेमात सुशांतसिंह राजपूत याने महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारली होती. तर, कियारा आडवाणी हिने साक्षी धोनी हिची भूमिका साकारली होती. आता धोनीच्या चाहत्यांना त्याच्यावर आधारीत असलेल्या गुप्तहेर अॅनिमेटेड सीरिज कशी असेल याची उत्सुकता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wwMw3g