Full Width(True/False)

म्हणून पत्नी आणि मुलगा घेऊ शकणार नाहीत श्रवण राठोड यांचं दर्शन

मुंबई: बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध जोडी आता कायमची तुटली आहे. संगीतकार नदीम श्रवण या जोडीनं एकेकाळी बॉलिवूड गाजवलं पण आता यांच्या निधनानंतर ही जोडी कायमची तुटली आहे. २२ एप्रिलला रात्री ८.३० वाजता श्रवण कुमार राठोड यांनी शेवटचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून ते करोनाग्रस्त होते. त्यांना मुंबईच्या माहिम येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण तब्येत अधिकच खालावल्यानंतर श्रवण यांना मागच्या ४८ तासांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण अनेक प्रयत्न करूनही श्रवण यांचा जीव वाचवण्यात डॉक्टर्सना अपयश आलं. श्रवण यांच्या निधनानंतर एकिकडे संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कुटुंबीयांनाही या धक्क्यातून सावरणं कठीण झालं आहे. एवढंच नाही तर श्रवण राठोड यांच्यावर अंतिम संस्कार होण्याआधी त्यांची पत्नी आणि मुलगा त्यांचं अंतिम दर्शनही घेऊ शकणार नाही आहेत. श्रवण राठोड यांची पत्नी आणि मुलगा या दोघांनाही करोनाची लागण झाल्यानं त्या दोघांनाही अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि ते करोनाशी लढा देत आहेत. गीतकार समीर अनजान म्हणाले की, श्रवण यांचं निधन मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे झालं. तुम्ही मराणाच्या दारात उभे असता आणि तुमचे आप्तेष्ट तुमच्यासोबत नसतात यापेक्षा दुसरं वाईट काय असू शकतं. दरम्यान श्रवण यांच्या निधनाची बातमी दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर दिली. अनिल यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'फारच वेदनादायी अशी बातमी... प्रसिद्ध संगीतकार श्रवण कोविडमुळे आपल्याला सोडून गेले. ते माझे खूप चांगले मित्र होते. आम्ही 'महाराजा' मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यांनी नेहमीच चांगलं संगीत दिलं. त्यांच्या कुटुंबियांना धैर्य मिळावं हीच प्रार्थना. श्रवण नेहमीच आमच्या हृदयात जिवंत राहतील.' ९० च्या दशकातील हिट संगीतकार जोडी १९९० च्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये या संगीतकार जोड गोळीचा दबदबा होता. नदीम सैफी मित्र श्रवण राठोड यांच्यासोबतीने गाण्यांना चाली लावायचे. त्यांनी संगीत दिलेल्या 'आशिकी' सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. हा सिनेमा आणि त्यातील गाणी त्या काळात सुपर हिट होती. सगळ्यांच्या तोंडी या सिनेमाची गाणी होती. या सिनेमामुळे ही जोडी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या संगीतकार जोडीने 'आशिकी'नंतर, 'साजन', 'सडक', 'दिल है की मानता नही', 'साथी', 'दिवाना', 'फूल और काँटे', 'राजा हिंदुस्थानी', 'जान तेरे नाम', 'रंग', 'राजा', 'धडकन', 'परदेस', 'दिलवाले', 'राज' अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xlItHl