Full Width(True/False)

Irrfan Khan- अंग्रेजी मीडियमवेळी इरफान खान विसरले होते अभिनय

मुंबई- बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते आज आपल्यात नाहीत. २९ एप्रिल २०२० रोजी त्यांचं कर्करोगाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या जाण्याला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. परंतु, आजही इरफान त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. प्रत्येकालाच वाटत होतं की ते त्यांच्या आजारावर मात करतील आणि पूर्ण बरे होतील परंतु, असं घडलं नाही. इरफान यांच्या निधनापूर्वी त्यांनी 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात काम केलं होतं. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. परंतु, या चित्रपटात काम करण्यापूर्वी इरफान यांना असं वाटत होतं की आजारामुळे ते अभिनय पूर्णपणे विसरले आहेत. इरफान पडद्यावर जितका चांगला अभिनय करायचे खऱ्या आयुष्यात तेवढेच चांगले माणूसही होते. त्यांच्या शेवटच्या चित्रपटाच्या वेळेचा अनुभव सांगताना 'अंग्रेजी मिडीयम' चित्रपटाचे दिग्दर्शक सुजित सरकार यांनी म्हटलं, 'इरफान यांच्या शिवाय त्या चित्रपटात दुसरं कुणी असूच शकत नव्हतं. त्यांची जागा दुसरं कुणी घेऊच शकत नाही. त्यामुळेच आम्ही एक वर्ष त्यांची प्रकृती सुधारण्याची वाट पहिली. दोन वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर असल्यामुळे त्यांना वाटलं की ते अभिनय विसरले आहेत. जेव्हा ते मला भेटायला आले तेव्हा ते एकदम कोऱ्या पाटीप्रमाणे होते. पण जेव्हा त्यांनी चित्रीकरण सुरू केलं तेव्हा मात्र त्यांना यात तथ्य नसल्याचं जाणवलं. इरफान एक उत्कृष्ट अभिनेते होते. अभिनय त्यांच्या रक्तात होता. मी कधीही त्यांच्यासारख्या अभिनेत्यासोबत काम केलं नाही.' इरफान यांनी १९८८ सालच्या 'सलाम बॉम्बे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि २०२० चा 'अंग्रेजी मीडियम' त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. इरफान यांनी 'कमाल की मौत', 'दृष्टि', 'एक डॉक्टर की मौत', 'कसूर', 'हासिल', 'तुलसी', 'पीकू', 'अंग्रेजी मीडियम' 'पान सिंह तोमर', 'द लंचबॉक्स', 'तलवार', 'लाइफ ऑफ पाय', 'मुंबई मेरी जान', 'साहेब बीवी और गैंगस्टर रिटर्नस', 'हिंदी मीडियम', 'मकबूल' यांसारख्या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gNN3sb