Full Width(True/False)

करोना- वडिलांचं छत्र हरवलेल्या मुलाला सलमानची लाखमोलाची मदत

मुंबई- देशात करोनाची दुसरी लाट सुरू आहे. रुग्णसंख्या वाढत आहे. कित्येक लोकांनी त्यांचे जीव गमावले आहेत. अशात अनेक कलाकार पुढे येऊन इतरांची मदत करत आहेत. कुणी ऑक्सिजन सिलेण्डरची व्यवस्था करत आहे, तर कुणी पीपीई किटसाठी मदत करत आहे. बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता यानेदेखील या परिस्थितीत पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या प्रकारे रुग्णांची आणि करोना योद्ध्यांची मदत करत आहे. आता त्याने एका गरजू मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. सलमानने करोनामुळे झालेल्या पहिल्या लॉकडाउनमध्येही गरजूंची मदत केली होती. आताही सलमान गरजूंना जेवण देण्याचं, महानगर पालिकेसोबत मेडिकल किट आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचं काम करत आहे. पुन्हा लागू झालेल्या लॉकडाउनमध्ये सलमान फ्रण्टलाइन वर्कर्स आणि पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था करत आहे. युवासेनेचे अध्यक्ष राहुल एस. कनल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान करोनामुळे एकट्या पडलेल्या मुलांची देखील मदत करत आहे. नुकतीच त्याने कर्नाटक राज्यातील १८ वर्षीय मुलाच्या खाण्यापिण्याची आणि शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. या मुलाच्या वडिलांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. राहुल यांनी सांगितल्याप्रमाणे, सलमान अशा अनेक मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे. अशा परिस्थितीत तो मागे हटणार नाही. काही दिवसांपूर्वी सलमानने 'बिईंग हंग्री' उपक्रम सुरू केला आहे. यात त्याने करोना योद्ध्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. सलमान या जेवणाची गुणवत्ता स्वतः पडताळून घेतानाचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर वायरल झाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tlB1J2