मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तला संयुक्त अरब अमीरात म्हणजेच यूएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. संजय दत्तनं बुधवार २६ मे रोजी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याची माहिती दिली. या व्हिसाव्दारे आता १० वर्षं दुबईमध्ये राहू शकतो. सामान्यपणे हा व्हिसा पूर्वी उद्योगपती, गुंतवणूकदार आणि डॉक्टर किंवा तत्सम अन्य प्रोफेशन असलेल्या लोकांना देण्यात असे पण आता याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले असून त्यामुळे संजय दत्तला हा व्हिसा मिळाला आहे. संजय दत्तनं यासाठी दुबईच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. संजय दत्तनं त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्याच्यासोबत त्यानं ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. यातील एका फोटोमध्ये तो त्याचा पासपोर्ट दाखवताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तो वह मेजर जनरल मोहम्मद अल मारी यांच्यासोबत दिसत आहे. मोहम्मद अल मारी हे दुबईमध्ये जनरल डायरेक्ट्रेट ऑफ रेजीडेंसी अँड फॉरेन अफेयर्सचे डायरेक्टर जनरल आहेत. हे फोटो शेअर करताना संजय दत्तनं लिहिलं, 'मेजर जनरल मोहम्मद अल मारी यांच्याकडून युएई गोल्डन व्हिसा स्वीकारताना आनंद होत आहे. या सन्मानासाठी मी युएई सरकारचा आभारी आहे.' संजय दत्तनं त्याच्या पोस्टमध्ये 'फ्लाय दुबई'चे सीओओ हमाद उबैदल्ला यांचेही आभार मानले आहेत. संजय दत्तच्या या पोस्टवर त्याचे चाहते कमेंट करून अभिनंदन करताना दिसत आहेत. संजय दत्तच्या या पोस्टवर त्याची मुलगी त्रिशाला दत्तनं देखील कमेंट केली आहे. वडिलांच्या पोस्टवर कमेंट करताना त्रिशालानं लिहिलं, 'बाबा तुम्ही ग्रेट आहात. आय लव्ह यू' संजय दत्त नेहमीच व्हेकेशनसाठी दुबईला जात असतो. दुबईमध्ये त्याचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. काय आहे युएई गोल्डन व्हिसा? हा गोल्डन व्हिसा मिळालेल्या व्यक्तीला संयुक्त अरब अमीरात म्हणजेच दुबईमध्ये १० वर्षांपर्यंत राहण्याची परवानगी असते. पूर्वी हा व्हिसा केवळ मोठे उद्योगपती, गुंतवणूकदार यांना दिला जात असे. मागच्या वर्षी यासंबंधीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले. ज्यामुळे आता हा व्हिसा डॉक्टर्स, अभिनेता, वैज्ञानिक यांच्यासमवेत आणखी काही लोकांना मिळू शकणार आहे. नियमांमध्ये झालेल्या या बदलांमुळेच संजय दत्तला हा व्हिसा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडमध्ये हा व्हिसा मिळवणारा संजय दत्त हा पहिला अभिनेता आहे. संजय दत्तच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो 'केजीएफ चॅप्टर २'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो 'अधीरा' ही खलनायकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट येत्या १६ जुलैला रिलीज होणार होता मात्र करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. याशिवाय संजय दत्त 'शमशेरा' या चित्रपटातही दिसणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fqx2ax