'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील बबिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिच्या वादग्रस्त व्हिडीओप्रकरणातील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तिच्याविरोधात जातीवाचक शब्द वापरल्याप्रकरणी हरियाणा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अर्थात असे वाद होण्याची मुनमुनच्या आयुष्यातील ही पहिली घटना नाही.
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. मुनमुनने एका व्हिडीओमध्ये जातीवाचक शब्दप्रयोग केल्यामुळे सोशल मीडियावर ती ट्रोल झाली आहे. इतकेच नाही तर तिने जातीवाचक शब्दप्रयोग केल्यावरून तिच्याविरोधात हरियाणा पोलिसांकडे तक्रारही दाखल झाली आहे. या प्रकरणी मुनमुन दत्ताला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर निर्माण झालेल्या वादानंतर मुनमुनने माफीनामा सादर केला असला तरी देखील पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यामुळे तिच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. अर्थात वादामध्ये अडकण्याची मुनमुन दत्ताची ही पहिली वेळ नाही. या आधीही अनेकदा तिला वादग्रस्त प्रसंग, घटना सामोरे जावे लागले होते.
वाद आणि मुनमुन दोघांचं जुनं नातं
मुनमुन दत्ता ही टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. अभिनेत्री म्हणून तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील बबिता या भूमिकेमुळे. मुनमुनने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये तिने मेकअपबद्दल काही माहिती दिली होती. लवकरच मुनमुन स्वतःचे युट्यूब चॅनेल सुरू करणार असल्याने त्यासाठी तिला छान दिसायचे आहे, असे सांगत असताना तिने एका जातीचा उल्लेख केला. मुनमुनने जो जातीवाचक उल्लेख या व्हिडीओमध्ये केला त्यावरून सोशल मीडियावर तिला खूपच ट्रोल व्हावे लागले. इतकेच नाही तर संतप्त युझर्सने तिच्याविरोधात हॅशटॅग मोहीम सुरू करत याप्रकरणी मुनमुन दत्ताला अटक करण्याची मागणी केली.
कोलकत्यात झाली लहानाची मोठी
मुनमुन दत्ताचा जन्म पश्चिम बंगलामधील दुर्गापूर येथे २७ सप्टेंबर १९८७ मध्ये झाला. मुनमुन आता ३३ वर्षांची असून तिने इंग्रजी साहित्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. मुनमुनचे लहानपण कोलकातामध्ये गेले. लहानपणी मुनमुनला गायिका व्हायचे होते. लहान असताना तिने आकाशवाणी आणि दूरदर्शनवर गाण्यांचे कार्यक्रमही सादर केले होते. देशात २०१७ मध्ये 'मी टू' चळवळ सुरु झाली तेव्हा मुनमुनने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून सर्वांना एक मोठा धक्का दिला होता.
'मीटू' चळवळीदरम्यान सांगितला अनुभव
तिने लिहिले होते, ' हे असे काही लिहिताना देखील माझ्या डोळ्यात पाणी येते. जेव्हा मी लहान होते तेव्हा शेजारच्या काकांच्या त्या नजरेची मला भीती वाटायची. ते अनेकदा मला वाईट पद्धतीने स्पर्श करायचे आणि याबद्दल कुणालाही न सांगण्याची धमकी ते मला द्यायचे.' यापुढे मुनमुनने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते, 'माझा चुलतभाऊ देखील वाईट नजरेने बघायचा. इतकेच नाही तर १३ वर्षांची असताना क्लासमध्ये शिकवणाऱ्या सरांनी अंतर्वस्त्रात हात घातला होता.'
अभिनय क्षेत्रात पदार्पण
मुनमुन दत्ता काही दिवस पुण्यात रहात होती. तिथे रहात असताना तिने एका फॅशन शो मध्ये भाग घेतला होता. त्यानंतर ती मुंबईला आली. २००४ मध्ये तिने 'हम सब बाराती' या मालिकेतून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. तर २००५ मध्ये मुनमुन दत्ताने कमल हासन यांच्या 'मुंबई एक्सप्रेस'मधून सिनेमात काम करायला सुरुवात केली. पण तिला खरी ओळख तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतूनच मिळाली.
बॉयफ्रेंड अरमान कोहलीबरोबर मारामारी
मुनमुन दत्ताचे अरमान कोहलीबरोबर प्रेमसंबंध होते. २००८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार या दोघांचे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी भांडण झाले. या भांडणामध्ये अरमान कोहलीने मुनमुनवर हात उचलला होता. याप्रकरणी मुनमुनने पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. या दोघांमध्ये झालेल्या भांडणाची डॉली बिंद्राही साक्षीदार होती. डॉलीने दिलेल्या माहितीनुसार अरमान आणि मुनमुन मॉरिशसमध्ये एकत्र सुट्टीवर गेले तेव्हापासून त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली होती. मुनमुनला तिने घरातून रडत बाहेर पडताना पाहिल्याचे डॉलीने सांगितले होते.
सेटवर अनेकदा झालीत भांडणे
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत मुनमुन दत्ता काम करत आहे. मध्यंतरी तिचे आणि जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांच्याशी भांडण झाल्याची बातमी आली होती. त्या भांडणानंतर दोघे एकमेकांशी बोलतही नव्हते. दरम्यानच्या काळात मालिकेतील काही कलाकारांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणल्यामुळे या घटनेची फारशी चर्चा झाली नाही. मुनमुन दत्ता अनेकदा मालिकांच्या सेटवर काही ना काही कारणांवरून रागावताना दिसली आहे. जेव्हा एखाद्या मालिकेतील शारीरिक स्पर्श करण्याचे प्रसंग येतात तेव्हा मुनमुन अधिकच संतप्त होते. त्यावरून तिचे अनेकदा भांडणही होते. त्यामुळे काही भागांमधून दिग्दर्शकांनी तिला बाहेरही काढले आहे.
होळीचे चित्रीकरण करताना बाहेर काढले
'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत काही वर्षांपूर्वी होळीच्या प्रसंगाचे चित्रीकरण होते. त्यावेळी मुनमुनने सगळ्यांना स्पष्ट सांगितले होते की तिला कुणीही रंग लावायचा नाही. तेव्हा दिग्दर्शकाने समजावून सांगितले तरी ती ऐकत नव्हती. अखेर तिला न घेता त्या भागाचे चित्रीकरण करण्यात आले. त्यावेळी त्या भागात नसल्याचे कारण तिला विचारले असता वडील आजारी असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी कोलकात्याला गेल्याचे मुनमुनने सांगितले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3f9T0gJ