मुंबई: 'देवमाणूस' या मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. एसीपी दिव्याने भर लग्नमंडपातून अजितला अटक करत, त्याला फरफटत पोलीस ठाण्याच्या दिशेने वरात काढली होती. दिव्याने अशा पद्धतीने अटक केल्याने अजित भलताच संतप्त झाला. सध्या मालिकेत डॉक्टर अजितकुमार देव याची कोर्टात केस चालू आहे आणि सरकारी वकील आर्या यांच्या विरुद्ध अजित स्वतःची केस स्वतः लढतोय. खूप चतुराईने अजित सगळ्यांची साक्ष घेऊन आपण कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यात कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय. असं असतानाच मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट येणार आहे. सोशल मीडियावर या ट्विटसंदर्भातला एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मालिका आता भरकटत असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार झालं आहे. मालिकेत नेमकं पुढे काय होणार याची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसतेय. डिंपल एका गाडीत ठेवलेली फाइल चोरून पाहत असते. त्या फाइलमधील कागदपत्रांवरील नाव पाहून तिला धक्का बसतो. त्यावर डॉ. अजित कुमार देव असं लिहिलेलं असतं. हा खरा डॉ. अजित कुमार देव नक्की कोण? असा प्रश्न ती देवी सिंगला विचारते. यावर तो माझा सख्खा भाऊ असल्याचं डिंपलला सांगतो. आता देवी सिंग आणि डॉ. अजित कुमार देव यांच्याबद्दल आणखी खुलासे होणार ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. आता मालिकेत एसीपी दिव्या सिंग हिच्या हाताखाली नवीन पोलिस अधिकारी इन्स्पेक्टर शिंदे देखील या केसमध्ये लक्ष घालणार आहेत. त्यामुळे आता एसीपी दिव्या, इन्स्पेक्टर शिंदे आणि ऍडव्होकेट आर्या हे तिघे मिळून अजितकुमारला फासावर लटकवण्यात यशस्वी होतील का हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2TlJu2X