Full Width(True/False)

लेखः मोबाइलची पंचाहत्तरी अन् बिल गेट्स यांचं ते भाकीत अखेर खरं ठरलं

सौरभ करंदीकर १७ जून २०२१ रोजी जगातल्या पहिल्यावहिल्या मोबाईल फोन कॉलला ७५ वर्षं झाल्याचं ऐकलं आणि ‘चाची ४२०’ चित्रपटातलं ओम पुरीचे पात्र डोळ्यासमोर उभं राहिलं. आपल्या मालकाच्या (अमरीश पुरीच्या) सेल्युलर फोनला तो तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतो, सेल्युलरची शपथ घेऊन बोलतो, गुंडांनी मारलं तरी सेल्युलरला अजिबात इजा होऊ देत नाही! त्याच्या सततच्या सेल्युलरकथांना वैतागून अमरीश पुरी शेवटी त्याला ‘सेल्युलर न हुआ, भगवान हो गया?’ असं विचारतो. सेल्युलर किंवा मोबाइल फोन आणि आपलं नातं गेल्या ७५ वर्षांत बदलत गेलेलं आहे. आधी तंत्रज्ञानाची करामत वाटणारा मोबाइल फोन क्रमाक्रमाने ‘श्रीमंती थाट’, ‘आंबट द्राक्ष’, ‘नव्याची नवलाई’, ‘परमेश्वर’, ‘सततची कटकट’, ‘क्षणभर विरंगुळा’ आणि ‘सोडता न येणारं व्यसन’ बनत गेला. आज मात्र ‘प्राणवायू’ ही उपाधी त्याला अधिक योग्य ठरेल. भविष्यात सेलफोनचं स्वरूप बदलेल असे संकेत असले तरी आपल्या आयुष्यातलं त्याचं स्थान आता फारसं बदलेल असं वाटत नाही. अमेरिकेच्या सेंट लुईस, मिसुरी येथून प्रवास करणाऱ्या एका माणसाने आपल्या गाडीत बसवलेल्या फोनवरून १७ जून १९४८ रोजी पहिलावहिला मोबाइल कॉल केला. (त्याबद्दल त्याला ट्रॅफिक पोलिसांनी दंड केल्याची नोंद मात्र सापडत नाही. असो.) त्यानंतरच्या दोन वर्षांत ही सुविधा अमेरिकेच्या सुमारे १०० शहरांत उपलब्ध झाली. महिना १५ डॉलर (आताचे सुमारे १,००० रुपये) त्या सेवेचं भाडं होतं. त्याशिवाय एका कॉलला जवळपास ३५ सेंट्स पडत (आताचे सुमारे ३५० रुपये). त्या काळी ही सुविधा ट्रक वाहतूक कंपन्या आणि काही पत्रकारच वापरत असत. प्रत्येक शहराच्या मध्यभागी उभारलेल्या टॉवरवरून हे सारे फोन जोडले जात. परंतु एका वेळेस केवळ ५-६ ग्राहकच एकमेकांशी संवाद साधू शकत. त्या काळात मोबाइल फोन नंबर मिळणं हे प्रतिष्ठेचं लक्षण होतं; कारण एका शहरात किती फोन असावेत यावर देखील तांत्रिक बंधनं होती. खरं सांगायचं तर आजचे फोन जसे मोबाइल नेटवर्कवर चालतात तसे हे फोन नव्हतेच. त्यांना ‘टू वे रेडिओ’ म्हणणं अधिक योग्य ठरेल. इटालियन संशोधक मार्कोनी यांनी ‘रेडिओ लहरींचा वापर करून वायरलेस संवाद साधता येईल,’ या संकल्पनेवर १८९४ पासूनच काम करायला सुरुवात केली. सन १९०० ते १९०६ मध्ये अटलांटिक महासागरापार संवाद घडवण्याचे अनेक प्रयत्न झाले; परंतु त्याला म्हणावं तसं यश आलं नाही. ‘युद्ध ही अनेक शोधांची जननी होय,’ असं खेदानं म्हणावं लागेल. पहिल्या जागतिक महायुद्धादरम्यान रेडिओ लहरींचा वापर सैनिकी संवादांसाठी केला जाऊ लागला. सामान्यांच्या पदरात मोबाइल तंत्रज्ञान येण्यासाठी मात्र १९२० चं दशक उजाडावं लागलं. जर्मनीच्या ‘डैच राईकबाहन’ म्हणजेच राष्ट्रीय रेल्वेमधून बर्लिन ते हॅम्बर्ग प्रवास करणाऱ्या प्रथम श्रेणीतील प्रवाशांना १९२६ मध्ये प्रथम मोबाइल फोन सेवा देण्यात आली. आज आपण ज्याला ‘सेल्युलर’ फोन म्हणतो (‘सेल’ म्हणजे एकमेकांशी संपर्क ठेवणारे ठिकठिकाणी बसवले जाणारे प्रक्षेपक टॉवर), त्यावर ‘अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ’मधील (एटी अँड टी) तंत्रज्ञ १९४० पासून संशोधन करू लागले. सन १९७३ मध्ये ‘मोटोरोला’चे मार्टिन कूपर यांनी हातात राहू शकेल आणि कुठेही नेता येऊ शकेल असा पहिलावहिला ‘मोबाइल फोन’ जगासमोर आणला. डायना टॅक नावाचा हा फोन सुमारे दोन किलो वजनाचा होता. मी हा फोन १९९५ मध्ये एका लघुउद्योजकाकडे सर्वप्रथम पाहिला. ते गृहस्थ गाड्या भाड्यानं द्यायचे. ‘रात्रीच्या वेळेस आडगावात प्रवास करताना वाटमारी झालीच तर हा फोन हत्यार म्हणूनदेखील वापरता येईल,’ असं ते गमतीनं म्हणत असत! शिवाय ‘दिवसभर फोनवर बोललो, तर व्यायामशाळेत वेगळं जायची गरज नाही,’ असंही ते म्हणत. एकंदरच आपला मोबाइल फोन कसा अष्टपैलू आहे, याचा त्यांना त्याही काळात सार्थ अभिमान होता. जपानच्या ‘एनटीटी’ने १९७९ मध्ये व्यावसायिक तत्त्वावर प्रथमतः मोबाइल नेटवर्क प्रस्थापित केलं. युरोपातील काही देशांनी काही वर्षातच आपापली नेटवर्क उभारली. आज ज्या जीएसएम तंत्रज्ञानावर आपले मोबाइल चालतात त्याची पायाभरणी १९८७ मध्ये सुरू झाली. १९९१ साली फिनलंड देशात ‘टू जी’ आलं (घोटाळा फेम). थोडक्यात तंत्रज्ञानाचा भक्कम पाया या काही दशकांमध्ये रोवला गेला. मात्र, आपल्या देशात मोबाइल फोन यायला १९९५ उजाडावं लागलं. भारतातला पाहिला मोबाइल फोन कॉल ३१ जुलै १९९५ रोजी केला गेला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी कोलकाता शहरातून दिल्लीमध्ये बसलेल्या दूरसंचारमंत्री सुखराम यांच्याशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियन कंपनी टेल्सट्रा आणि भारतीय कंपनी बी. के. मोदी यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा कॉल शक्य झाला. त्या काळी असे कॉल मिनिटाला आठ रुपयांपासून मोबाइल ट्रॅफिक वाढल्यास मिनिटाला १६ रुपयांपर्यंत जात. तेही इनकमिंग आणि आउटगोइंग - म्हणजे फोन करणाऱ्याला, तसंच फोन घेणाऱ्यालादेखील पैसे भरावे लागत. याशिवाय हँडसेटची किंमत सुमारे ४०,००० रुपये असायची (आजचे दोन लाख रुपये). त्यामुळे सर्वांनाच मोबाइल फोन घेणं परवडणारं नव्हतं. जगातला पहिलावहिला ‘मिस्ड कॉल’देखील याच काळात केला गेला असावा. फोन वाजला, पण तो घेतला नाही, तर पैसे पडत नसत. त्यामुळे असे सांकेतिक कॉल ठरलेल्या वेळी करणे, ‘अमुक एवढ्या रिंग झाल्या आणि फोन बंद झाला तर तो माझाच आहे असं समज आणि अमुक कर, किंवा तमुक ठिकाणी ये,’ इत्यादी गुप्तहेरांना शोभतील अशा क्लृप्त्या लढवणे अनेकांच्या अंगवळणी पडले. आज रुपयांचे पैसे झाले, डेटा पॅक्स आणि फ्री कॉल्सचा सुळसुळाट झाला, तरी मिस्ड कॉल्स द्यायची पद्धत संपुष्टात आलेली नाही. मोबाइल फोनचा वापर एके काळी फक्त बोलण्यासाठी केला जात असे, असं सांगितलं तर आताची पिढी आपल्याला नक्कीच वेड्यात काढेल. आज बोलण्यापेक्षा मेसेज पाठवणं पसंत केलं जातंय. जगातला पहिला (म्हणजे निदान ज्याची नोंद झाली असा) एसएमएस १९९२ मध्ये ब्रिटनमध्ये पाठवला गेला. वोडाफोनसाठी मेसेजिंग सर्व्हिस तयार करणाऱ्या नील पॅपवर्थ याने रिचर्ड जार्विस नावाच्या वोडाफोनच्या अधिकाऱ्याला ‘मेरी ख्रिसमस’ असा मेसेज पाठवला. रिचर्ड ऑफिसमधल्या ख्रिसमस पार्टीत दंग होता. आणि नीलचा मेसेज त्याने लगेच वाचला नसावा, असा अंदाज आहे. कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आदिमानवाने गुहेच्या भिंतींवर चित्रं रेखाटली. मानवाच्या प्रगतिपथावर त्या चित्रांची लिपी झाली; अक्षरांचा जन्म झाला आणि त्याच अक्षरांना मोबाइलमध्ये समाविष्ट करण्यात आलं. परंतु दैवाला हे पाहवलं नसावं. जपानमधल्या शिगेटाका कुरिता नावाच्या डिझायनरने १९९९ मध्ये ‘ईमोजी’ नावाची चित्रलिपी तयार केली. मानवी भावभावनांचं चित्रीकरण छोट्याशा स्मायलीजमध्ये केलं गेलं. आज मोबाईल मेसेजेसवर या इमोजींची सरशी झाली आहे आणि मनुष्य पुन्हा एकदा आपल्या कल्पनांना, भावनांना दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रांचा आधार घेऊ लागला आहे असं चित्र दिसतं. मोबाईल फोनचा वापर १९९० च्या दशकात केवळ ध्वनी, अक्षरं आणि काही चित्रं पाठवण्यासाठी होत होता; परंतु तंत्रज्ञानाच्या एका उल्लेखनीय एकत्रीकरणाने हे चित्र कायमचं पालटलं. संगणक तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगत होत होतं. कम्प्युटर चिप अधिकाधिक सूक्ष्म होत होती. हातामध्ये मावेल अशा आकाराच्या कम्प्युटरच्या कल्पना तग धरत होत्या. ‘द रोड अहेड’ या १९९५ मध्ये लिहिलेल्या पुस्तकात ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स यांनी संगणकीय प्रगतीची पुढची पायरी म्हणजे ‘सर्वांना परवडेल, एका हातात बसेल, कुठेही नेता येईल आणि तरीही इंटरनेटशी जोडलेलं राहील असं उपकरण होय,’ असं भाकीत केलं. कम्प्युटर आणि मोबाइल फोन यांचं एकत्रीकरण विधिलिखितच होतं. फोनचं परिवर्तन स्मार्टफोनमध्ये झालं. आयबीएमने १९९४ मध्ये सायमन नावाचा कम्प्युटर-फोन बाजारात आणला. आयबीएम आणि मायक्रोसॉफ्टखेरीज नोकिया, ह्युलेट पॅकार्ड, अॅपल या साऱ्या कंपन्या आपापल्या ‘हॅँडहेल्ड’ उपकरणांवर काम करत होत्या. त्याच दरम्यान ‘ब्लॅकबेरी’चा जन्म झाला. कार्यालयीन कामकाजाच्या संदर्भातल्या ई-मेल्स मोबाईलद्वारे पाठवणं आणि त्याला उत्तर देणं शक्य झालं. ऑफिसचं काम ऑफिसबाहेर आलं. आणि आता या ‘जिनी’ला पुन्हा एकदा ऑफिसबंद करणं केवळ अशक्य झालं आहे. (करोना हे केवळ निमित्त आहे. स्मार्टफोन हे खरं कारण आहे). दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये २००० मध्ये डिजिटल कॅमेरा आणि मोबाइल एकत्र करण्यात आले. तेव्हाच्या डिजिटल कॅमेऱ्यांनी ०.११ ते ०.३५ मेगापिक्सेल इतके मोठे (!) फोटो निघत असत. ‘ब्लूटूथ’ आणि ‘वायफाय’ तंत्रज्ञान विकसित झालं तेव्हा कुठे अशा फोटोंना खऱ्या अर्थी पाय फुटू लागले. आज सोशल मीडियावर एखादा फोटो टाकला गेला, की वणव्यासारखा पसरतो आणि त्याचं शेअरिंग थोपवणं अशक्य होतं. त्या काळात मात्र फोटो त्या त्या मोबाइल फोनवरच साठवले जात असत. मग २००३ मध्ये थ्री जी तंत्रज्ञान विकसित झालं. इंटरनेटने स्मार्टफोन्सना एकमेकांच्या अधिक जवळ आणलं. सन २००७ मध्ये ‘अॅपल’ने आयफोन बाजारात आणला. त्यामधली अॅप्स कालांतराने विकसित होऊ लागली. आज आपला फोन आपल्यासाठी पत्ता शोधतो, प्रवासाची दिशा दर्शवतो, हवी ती माहिती चित्ररूपात, दृश्यरूपात, ध्वनीरूपात (आणि अजूनही शब्दरूपात) आपल्यासमोर आणतो. गाणी ऐकवतो, चित्रपट दाखवतो, आपलं मनोरंजन करतो. नंतर २०१६ मध्ये ‘पोकेमॉन गो’सारखे गेम मोबाइलवर आले. याद्वारे वैयक्तिक, तसेच सभोवतालची माहिती शत्रूराष्ट्रं गोळा तर करत नाहीत ना, यासारख्या शंकाकुशंका घेतल्या जाऊ लागल्या. ‘प्रायव्हसी म्हणून काही राहिलीच नाही,’ अशी नाकं मुरडली गेली, तरीही मोबाइलवरची विविध अॅप फुकटात वापरता यावी म्हणून आपण वेळोवेळी ‘टर्म्स आणि कंडिशन्स’ न वाचताच ‘अॅक्सेप्ट’ करू लागलो. अॅप तयार करणाऱ्या कंपन्यांना आपल्या आवडीनिवडी, आपलं भौगोलिक स्थान, आपल्या खरेदीविषयक माहिती, आपली इतर वैयक्तिक माहिती बेलाशक वापरायला देऊ लागलो. थोडक्यात आपला मोबाईल फोन आपल्याला स्वतःहून अधिक ओळखू लागला. या साऱ्याची आपल्याला कल्पना असूनदेखील आपण आपल्याला मोबाइलपासून सोडवू शकत नाही. आपली नाळ त्याच्याबरोबर कायमची जोडली गेलेली आहे. करोनाकाळात मोबाइल फोन म्हणजेच शाळा, ऑफिस, बाजारपेठ, क्लब, बँक, डिपार्टमेंटल स्टोअर, औषधांचं दुकान ठरला आहे. इतकंच काय, लग्न-मुंजीसारख्या कौटुंबिक समारंभांना हजेरी लावायचं साधनदेखील बनला आहे. मोबाइल अॅडिक्शन (व्यसन) गांभीर्यानं घेतला पाहिजे असं अनेक मानसोपचारतज्ज्ञ सांगत आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढला, असं काळजीने म्हणणारे पालक, मुलांना सर्वसमावेशक शिक्षण मिळावं, त्यांना पुढल्या आयुष्यासाठी मार्गदर्शन मिळावं म्हणून नाइलाजानं मोबाईलचीच मदत घेत आहेत. करोनोत्तर काळातदेखील मोबाइल फोनच्या या व्याख्या आणि समस्या बदलतील असं वाटत नाही. सतत मोबाइलच्या चौकटीकडे पाहिलं जातं म्हणून मोबाइलला ‘ब्लॅक मिरर’ म्हणतात. आता या चौकटीपासून आपली सुटका कशी होईल यावर संशोधन चालू आहे. ‘गुगल’च्या ‘प्रोजेक्ट सोली’मध्ये रडार तंत्रज्ञान वापरून केवळ हातवाऱ्यांनी मोबाइलशी संपर्क करता येईल अशी प्रणाली विकसित करण्यात येते आहे. त्यामुळे भविष्यात आपण मोबाइल वापरू; परंतु तो कदाचित हातातही घ्यावा लागणार नाही! पहिल्या मोबाइल फोन कॉलला ७५ वर्षं झाली तरी आपण आजही मोबाईल फोनवर ‘बोलतो’, हीच कौतुकाची गोष्ट आहे. त्या घटनेला १०० वर्षं होतील, तेव्हा आपण कदाचित मानवी संवादांचं कुठलं तरी दुसरंच साधन वापरत असू आणि मोबाइलला ‘फोन’ म्हणणं विस्मृतीत गेलेलं असेल. (लेखक युजर एक्स्पिरिअन्स डिझाइन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.)


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jkktjl