Full Width(True/False)

'बरं झालं बॉलिवूडमधल्याशी लग्न नाही केलं' सोनमचं अजब विधान

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाणारी सोनम सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सध्या सोनम पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये आहे. सोनम आणि आनंद यांचं २०१८ साली लग्न झालं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनम तिच्या लग्नाबद्दल आणि वैवाहिक आयुष्याबद्दल भरभरून बोलली. यासोबत बॉलिवूडमधल्या कोणत्याही व्यक्तीशी लग्न केलं नाही हे चांगलंच झालं असंही यावेळी सोनमनं म्हटलं आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सोनम कपूर म्हणाली, 'मी खूप नशीबवान आहे की मी एका अशा व्यक्तीला भेटले ज्याचे विचार माझ्यासारखेच आणि स्त्रीवादी आहेत. देवाचे खूप आभार की मी बॉलिवूडशी संबंधीत कोणत्याही व्यक्तीशी लग्न केलं नाही. असं झालं असतं तर मग माझं जग खूपच सिमित राहिलं होतं. मला फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे याचीच माहीत मिळाली असती.' सोनम पुढे म्हणाली, 'ही पहिली वेळ आहे की, मी आणि आनंद एवढे दिवस एकमेकांसोबत आहोत. कारण आम्ही दोघं कामाच्या निमित्तानं बराच प्रवास करतो. त्यामुळे एकमेकांसाठी आम्हाला फार कमी वेळ मिळतो. या काळात आम्हाला दोघांनाही जाणवलं की, आमचं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे आणि एकमेकांसाठी आम्ही किती वेडे आहोत. सध्या आम्ही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ व्यतित करत आहोत.' या मुलाखतीत सोनमनं अभिनेता आणि अभिनेत्रीच्या मानधनातील फरकावरही भाष्य केलं. याबाबत बोलताना ती म्हणाली, 'या इंडस्ट्रीमध्ये पुरुष आणि स्त्रीयांच्या मानधनातील फरक ही हास्यस्पद गोष्ट आहे. मी यावर बोलेन या सर्वांच्या विरोधातही जाईन. पण यामुळे मला हव्या तशा भूमिका मिळणार नाही. यामुळे मला काहीच समस्या नाही कारण मी हे नुकसान सहन करू शकते.' सोनम कपूर लवकरच 'ब्लाइंड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत बोलताना सोनम म्हणाली, 'करोनाच्या काळात आम्ही या चित्रपटाचं शूटिंग केलं आहे. हे शूट सकाळी लवकर सुरू होत असे आणि रात्री उशीरा संपत असे.' या चित्रपटात सोनम एका ब्लाइंड पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. जी एका सीरियल किलर केसचा तपास करते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wqoxle