मुंबई- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळं आणि आर्थिक परिस्थितीमुळं स्वप्निल सुनील लोणकर या तरुणानं आत्महत्या केली. या घटनेची सर्व स्तरावरून निंदा केली जात आहे. फक्त राजकीय वर्तुळातच नाही तर सिनेवर्तुळातूनही या घटनेची निंदा केली जात आहे. या तरुणाच्या आत्महत्येला राजकारण्यांचा बेफिकिरपणा जबाबदार आहे अशी टीका सर्वत्र होताना दिसत आहे. अशात प्रसिद्ध दिग्दर्शक यांनीही या घटनेवर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत प्रविण म्हणाले की, 'प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाला दोष देणार. एक पक्ष दुसऱ्या पक्षाशी युती करणार... एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाला जाऊन भेटणार अशाच प्रकारच्या चर्चा रोज ऐकू येत आहेत. या गोष्टी करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे पण मुलांच्या नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आमदारांच्या नियुक्त्या व्हाव्या यासाठी दररोज राज्यपालांकडे जाण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे. दिल्लीत, महाराष्ट्रात काय संपूर्ण देशात हेच सुरू आहे. अशा परिस्थितीत फक्त राजकारण्यांनीच जगायचं का?' असा सवाल तरडे यांनी केला. एवढं बोलून प्रविण थांबले नाहीत ते पुढे म्हणाले की, 'फुटपाथच्या कामातून पैसे खाणाऱ्या आणि ते खाता यावे यासाठी रस्ते उकरणाऱ्या माणसांना आपण देशाचे आणि राज्याचे आयडल करून बसलो मग असेच तरुण मरत राहणार. एमपीएससी- युपीएससी करणारे मरणार, शेतकरी मरणार, कलाकार मरणार, लेखक मरणार. काल एक कला दिग्दर्शक मेला. जे जे संवेदनशील, सर्जनशील आहेत, ते सगळे मरणार आणि फक्त राजकारणा आणि त्यांच्याशी संबंधित लोक जिवंत राहणार. या देशात आणि राज्यात फक्त हेच लोक जिवंत राहणार आहेत.' दरम्यान, प्रविण तरडे यांनी तरुणांना धीर न सोडता संयमाने वागण्याची विनंती केली आहे. आई- बाबांची आणि तुमची स्वप्न निरर्थक व्यक्तींसाठी वाया घालवू नका आणि जीव देऊ नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मागे सोडून जाणाऱ्या आई- बाबांचा विचार करा आणि असं टोकाचं पाऊल उचलू नका अशी कळकळीची विनंती त्यांनी यावेळी तरुणांना केली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dK3svs