मुंबई: बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटासंदर्भात दोघांनीही संयुक्तपणे प्रसिद्धीपत्र शेअर केलं आहे. चित्रपट, तसेच अन्य आवडीच्या प्रकल्पांसाठी आम्ही एकत्रितपणे काम करू, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आज दोघंही पुन्हा एकदा एकत्र कॅमेऱ्यासमोर आले. पाणी फाऊंडेशनसंदर्भात एका लाइव्ह सेशनमध्ये संवाद साधताना आमिर आणि किरण राव यांनी त्यांच्या घटस्फोटावरही भाष्य केलं आहे. 'तुम्हाला दु:खही झालं असेल, शॉक बसला असेल, पण आम्हाला हे सांगायचं आहे की, आता आम्ही दोघंही खूप खूष आहोत, एकचं कुटुंब आहोत, फक्त आमच्या नात्यात आता बदल झालाय. पण आम्ही एकमेकांसोबतच आहोत. त्यामुळं तुम्ही याबद्दल काही विचार करू नका. पाणी फाऊंडेशन हे आम्हाला आमच्या मुलाप्रमाणेच आहे. जसा आझाद आहे तसं पाणी फाऊंडेशन आहे. आम्ही आनंदी राहावं यासाठी प्रार्थना करा एवढंच बोलायचं आहे', असं आमिरनं या लाइव्ह सेशनमध्ये म्हटलं आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘’ चित्रपटाच्या वेळी आमिर आणि किरण यांची पहिल्यांदा भेट झाली. किरण त्या चित्रपटाच्या सहायक दिग्दर्शिका होत्या. दोघांनी २००५मध्ये लग्न झाले होते. आता १५ वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आमिर आणि किरण यांनी संयुक्तपणे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘या पंधरा वर्षांत आम्ही अनेक आनंदाचे, समाधानाचे, हास्याचे सुरेख क्षण एकत्रित अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम या आघाड्यांवर आमचे ऋणानुबंध घट्ट होत गेले. आता आम्हाला आयुष्याच्या नव्या टप्प्याला सामोरे जायचे आहे. या प्रवासात आम्ही नवरा-बायको असणार नाही. आम्ही मुलांसाठी सहपालक असणार आहोत. एकमेकांच्या कुटुंबीयांसाठी सदैव सोबत असू. विभक्त होण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी आम्ही विचारपूर्वक घेतला. या संदर्भात औपचारिक प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. आम्ही स्वतंत्र राहू मात्र एकमेकांच्या कुटुंबाचा भाग असू. आझाद या आमच्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आमच्यावर एकत्रितपणे आहे. चित्रपट, पाणी फाऊंडेशन तसेच अन्य आवडीच्या प्रकल्पांसाठी आम्ही एकत्रितपणे काम करू.’ आमिर खानचा पहिला विवाह रीना दत्ता यांच्याशी १९८६मध्ये झाला होता. दोघे २००२मध्ये विभक्त झाले. त्यांना जुनैद आणि इरा ही मुले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qLAh0i