म. टा. वृत्तसेवा, ठाणे करोनामुळे काही उद्योग व्यवसाय कमालीचे अडचणीत आले आहेत. केश कर्तनालय त्यापैकी एक. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत केस कापण्यासाठी कुणीच बाहेर पडत नव्हते. काहींनी तर या काळात घरच्या घरी एकमेकांचे केस कापून वेळ मारून नेली. परिणामी केश कर्तनालय व्यवसाय अडचणीत आला. या व्यवसायाकडे ग्राहकांनी पुन्हा वळावे म्हणून आता एक अॅप विकसीत करण्यात आले आहे. हेअरगुरू नावाचे हे अॅप आता मुंबई-ठाण्यात लोकप्रिय होऊ लागले आहे. या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे त्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या जवळील केश कर्तनालयातील सुविधा, त्याचे दर पाहता येतात आणि केस कापण्याची वेळ निश्चित करता येते. त्यामुळे केश कर्तनालयात गर्दी होत नसल्याने संसर्गाचाही धोका राहत नाही. वाचाः टिटवाळा येथील गगन सकपाळ या तरुणाने हे अॅप विकसीत केले आहे. सध्या मुंबई, ठाणे परिसरातील २०० केश कर्तनालये या अॅपशी जोडले गेली आहेत. गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या या अॅपद्वारे ग्राहकांना त्यांच्या घराजवळील पसंतीच्या केश कर्तनालयात केस कापण्यासाठी आपली वेळ निश्चित करता येते. त्यामुळे त्यांना केश कर्तनालयात ताटकळत बसावे लागत नाही. गगन सकपाळ कराटे प्रशिक्षक आहे. टिटवाळ्यात दिनेश सकपाळ या त्याच्या भावाचे केश कर्तनालय आहे. करोनाने या व्यवसायावर आलेली संक्रांत त्याने जवळून अनुभवली. करोना संसर्गाच्या भीतीने केश कर्तनालयात यायला लोक घाबरतात. कारण तिथे गर्दीत संसर्ग होण्याची त्यांना भीती वाटते. शिवाय केश कर्तनालयात पुरेशी सुरक्षा साधने आहेत की नाहीत, याविषयी नागरिकांच्या मनात साशंकता असते. त्यावर उपाय म्हणून अॅप विकसीत करण्याचा निर्णय घेतल्याचे गगन सकपाळ याने सांगितले. या अॅपवर केश कर्तनालयाचे दरही पाहता येत असल्याने ग्राहकांच्या मनात कोणत्याही शंका राहत नाहीत. त्यांना निश्चिंत मनाने केस कापण्याचे हवे तसे नियोजन करता येते. वाचाः सौंदर्यवर्धन केंद्रांकडूनही वापर केश कर्तनालयाप्रमाणेच सौंदर्यवर्धन केंद्रेही गेल्या दीड वर्षात अडचणीत आली. कारण लग्न आणि इतर समारंभांतील उपस्थितीवर मर्यादा आहेत. आता हळूहळू हे व्यवसायही सुरू होऊ लागले आहेत. त्यांनाही या अॅपचा ग्राहक नोंदणीसाठी उपयोग होऊ लागला आहे. वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jcxl9x