मुंबई : छोट्या पडद्यावर आणि मराठी रंगमंचावरील लोकप्रिय अभिनेत्री यांचा गेल्या महिन्यात अपघात झाला होता. या अपघातामध्ये वर्षा यांच्या पाठीच्या मणक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्या पूर्णपणे अंथरुणाला खिळून होत्या आणि त्यांना कोणतीही हालचाल करणे शक्य नव्हते. परंतु महिन्याभरानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. अपघातानंतरच्या या कठीण काळात वर्षा यांची पूर्ण देखभाल त्यांच्या मुलीने तन्मयीने खूप साथ दिली. आज तन्मयीच्या वाढदिवसानिमित्ताने वर्षा यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. काय लिहिले आहे वर्षा यांनी वर्षा दांदळे यांनी आपल्या लाडक्या लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोसोबत वर्षा यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये वर्षा यांनी लिहिले आहे की, 'वाढदिवसाच्या खूप सा-या शुभेच्छा तन्मयी... २२ सप्टेंबरला अपघात झाल्यावर हॉस्पिटल, सर्जन्स, सर्जनकडून होणाऱ्या ऑपरेशन्सची माहिती आणि ऑपरेशन झाल्यावर कराव्या लागणाऱ्या फिजिओथेरेपीची सर्व जबाबदारी एकहाती सांभाळणारी माझी लेक... आज एक महिन्यानंतर मला आता टाईपही करता येतंय... यावरून तिच्यातल्या फिजिओथेरेपिस्टचे महत्त्व लक्षात आले असेलच.. वाढदिवसाच्या शुभेच्छा तनू जशी आहेस तशीच रहा सेवाभावी..' मूळच्या अकोल्याच्या असलेल्या वर्षा दांदळे लग्नानंतर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. अभिनयाचा त्यांचा प्रवास खूपच उल्लेखनीय असाच आहे. मुंबई महापालिकेत वर्षा संगीत शिक्षिकेची नोकरी करायच्या. हळूहळू वर्षा यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. नाटकात काम करता करता वर्षा टीव्ही मालिकांमध्ये काम करू लागल्या. झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या. या मालिकेत वर्षा यांनी साकारलेली वच्छी आत्याची भूमिका खूपच गाजली होती. याच नावाने त्यांना ओळख देखील मिळाली. त्यानंतर नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत त्यांनी लता काकूची भूमिका साकारली होती. अलिकडेच संपलेल्या 'पाहिले न मी' तुला मालिकेत उषा मावशीची भूमिका साकारली होती. याशिवाय एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केले आहे. वर्षा यांना अपघात झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. तेव्हा अनेक कलाकारांपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सर्वांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. इतकेच नाही तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना वर्षा दांदळे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यास नाशिकला पाठवले होते आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले होते. त्याचा फोटो देखील वर्षा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3GqXpIP