रंगदेवतेचा चमत्कार रंगदेवता ही आदिशक्ती आहे. रंगमंचावर गाण्याचे कार्यक्रम सादर करताना तिची शक्ती मी अनुभवली आहे. आमच्या गाण्याच्या कार्यक्रमांच्या तारखा आधीच ठरलेल्या असतात. पण काही वेळा कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सर्दी, खोकला, आवाज बसणं अशा तक्रारी जाणवतात. आवाज साथ देईल ना, ही रुखरुख वाटत राहते. याप्रसंगी रंगदेवता तिचा चमत्कार दाखवते. कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडतो, गाणं छान होतं. त्यादरम्यान आपल्या घशाला काही झालंय याचा पूर्णतः विसर पडतो. - प्रियांका बर्वे, गायिका मनाचा ठाम निश्चय माझ्या सासूबाई मृदुला मराठे या माझ्यासाठी एक आदरणीय स्त्रीशक्ती आहेत. एकत्र कुटुंबातील घरकामांचा सगळा व्याप सांभाळून प्रियाच्या वेळी गरोदर असताना त्यांनी प्रथम श्रेणी मिळवून मराठी विषयात एम.ए. पूर्ण केलं. हे मला कौतुकास्पद वाटतं. त्यांनंतर त्यांच्या यजमानांचं निधन झालं. पण खचून न जाता त्यांनी समर्थपणे मुलांना वाढवलं. अर्थार्जनासाठी त्यांनी योग प्रशिक्षण वर्ग घ्यायला सुरुवात केली. या दोन्ही प्रसंगी त्यांच्या मनाचा ठाम निश्चय मला सर्वाधिक भावतो. - शंतनू मोघे, अभिनेता विलक्षण आधारस्तंभ माझी मोठी बहीण तेजल ऊर्फ तेजू माझ्यासाठी एक विलक्षण आधारस्तंभ आहे. आमच्यात सहा वर्षांचं अंतर आहे. आम्हा दोघींच्या लग्नानंतर आता आमचं बहिणींचं नातं एका वेगळ्या वळणावर आलं आहे. तेजू सध्या दिल्लीत असते. एखाद दिवस बोलणं झालं नाही तरीही माझं काहीतरी बिनसलंय, हे तिला मी न सांगताच कळतं. एकमेकांपासून लांब राहायला लागल्यावर आपण मनानं अधिक जवळ येतो. तेजू घर सांभाळून स्पॅनिश भाषेचं उच्चशिक्षण घेतेय. मला तिचा खूप अभिमान आहे. - श्रेया बुगडे, अभिनेत्री निवडीचं कौतुक आई ही आदिशक्ती आहे. ती नेहमीच प्रेरणा देते. पण याबरोबरच मला सतत प्रेरित करते ती म्हणजे अभिनेत्री आलिया भट. तिची स्वत:ला सादर करण्याची पद्धत वाखणण्याजोगी आहे. तिची चित्रपट आणि दिग्दर्शकांची निवडही कौतुकास्पद आहे. तिच्या वडिलांचं निर्मिती क्षेत्रात मोठं नाव असतानाही तिनं स्वतः निर्माती म्हणून पाऊल टाकलंय. तिच्यावर होणाऱ्या टीका ती शिताफीनं हाताळते हे सगळं शिकण्यासारखं आहे. आलियासह मल्याळी अभिनेत्री सई पल्लवीसुद्धा मला खूप प्रेरित करते. - प्राजक्ता माळी, अभिनेत्री ऊर्जेचा स्रोत माझ्या आयुष्यात आईनंतर माझी धाकटी गौतमी देशपांडे ही माझ्यासाठी आदिशक्ती आहे. मला कधी कंटाळवाणं वाटत असेल किंवा मनासारखं काही घडत नसेल तेव्हा मला ऊर्जा देणारी व्यक्ती म्हणजे गौतमी. ती माझ्यापेक्षा लहान असली तरी वेळप्रसंगी मोठी होऊन ती मला समजून घेते, मार्ग दाखवते. आईबरोबर काही गोष्टी शेअर करता येत नाहीत; अशी अनेक गुपितं गौतमीला माहिती असतात. - मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री लढवय्या बहिणी माझ्या सगळ्या बहिणी माझ्यासाठी आदिशक्ती आहेत. त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. माझी आत्तेबहीण वसुधा पाटील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिली आहे. एकदा कुटुंबासमवेत प्रवास करत असताना तिनं रेल्वे स्टेशनवरील स्वच्छतागृहांचा वापर करण्याबाबत आणि तेथील अरेरावीबाबत शासनाला दखल घ्यायला भाग पाडलं. त्याचबरोबर शरयू कासार या बहिणीनंही त्या गोष्टीचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला. वाईट वर्तवणूक करणाऱ्या लोकांविरोधात जाताना शारीरिक बळ वापरायलादेखील त्या दोघी मागे-पुढे बघत नाहीत. - अश्विनी कासार, अभिनेत्री मुलगी माझी प्रेरणास्रोत माझी मुलगी जिजा माझं प्रेरणास्त्रोत आहे. ती तीन वर्षांची आहे. पण मी अजून चांगला माणूस कसा होईन याची ती मला सतत जाणीव करून देते. मुलं आई वडिलांकडे बघत बघत शिकतात. त्यामुळे त्यांना ठरवून काहीच शिकवता येत नाही. आपण त्यांच्यासमोर एक चांगलं उदाहरण म्हणून असायला हवं. त्यातूनच त्यांच्यावर संस्कार होत असतात. - आदिनाथ कोठारे, अभिनेता संकलन : वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ संकलन : गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oKTK2l