Full Width(True/False)

शाहरुख आणि गौरीसोबत आर्यन खान व्हिडिओ कॉलद्वारे बोलला, दहा मिनिटात...

मुंबई : क्रुझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आर्यनच्या जामीनावर गुरुवारी झालेल्या सुनावणी झाली. मात्र त्यावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला असून त्याची सुनावणी २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे आर्यनचा मुक्काम सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहे. दसऱ्यानिमित्त आर्यनने आर्थर रोड कारागृहातून आई गौरी आणि वडील यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. आर्यनने दहा मिनिटे आई-वडिलांशी संवाद साधला. जवळपास १२ दिवसांनंतर आर्यनने आई गौरी आणि शाहरुखशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे. आर्यनला पाहून गौरी आणि शाहरुखला अश्रू अनावर झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तुरुंगातील एका अधिका-याने माहिती दिली आहे की, 'आर्यनने त्याच्या आईचा फोन नंबर दिला होता. त्या नंबरवर आर्यनने आई आणि वडिलांना व्हिडीओ कॉल केला होता. जवळपास १० मिनिटे त्यांच्यामध्ये संवाद झाला. यावेळी आर्यनला रडू आवरले नाही. आर्यनला रडताना पाहून गौरी खानला रडू कोसळले...' आर्थर रोड जेलमध्ये व्हिडिओ कॉल ही सुविधा करोना काळात सुरू करण्यात आली. या सुविधेमुळे कैद्यांना त्यांचे वकील आणि कुटुंबीयांशी संवाद साधता येत आहे. गेल्या आठवड्यातच आर्यनला क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्याला जनरल कोठडीत हलवण्यात आले आहे.आर्यन खानचा अंडर ट्रायल नंबर एन९५६ असा आहे. आर्यनला कारागृहात ठेवल्यानंतर इतर सर्वसाधारण कैद्याप्रमाणे त्याला वागणूक दिली जात आहे. कारागृहात आर्यनला घरून ४ हजार ५०० रुपयांची मनीऑर्डर आली आहे. त्यातून आर्यन त्याला हव्या त्या वस्तू कारागृहातील कँटिनमधून विकत घेत आहे. कारागृह प्रशासनाने न्यायालयाच्या निर्णयानंतरच आर्यनला घरातून खाणे दिले जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आर्यनला कारागृहातील जेवण दिले जात आहे. परंतु हे जेवण त्याला आवडत नसल्याने आर्यन बिस्किटे खाऊनच गुजराण करत आहे. दरम्यान, आर्यनसह पाच जणांनी जामिनासाठी अर्ज केला होता. २ ऑक्टोबरपासून तो अटकेत आहे आणि सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्यावर एनसीबीने गंभीर आरोप केले असून आंतरराष्ट्रीय तस्करांशी त्याचा संपर्क होता असा दावा केला आहे. विशेष न्या. व्ही व्ही पाटील यांनी तीनही अर्ज २० ऑक्टोबर रोजी निकालासाठी राखून ठेवले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3j5abTm