मुंबई- छोट्या पडद्यावर गाजणारा कार्यक्रम 'बिग बॉस मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या आठवड्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी नेहमीप्रमाणे घरातील सदस्यांचे कान टोचले. जे चुकले त्यांना सुनावलं तर जे चांगले खेळले त्यांची पाठ थोपटली. परंतु, बिग बॉसच्या घराच्या नियमाप्रमाणे प्रत्येक आठवड्यात घरातील एका सदस्याला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागतो. या आठवड्यात घरातील सदस्य घराबाहेर झाला आहे. घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेल्या सदस्यांमध्ये विकास पाटील, विशाल निकम, स्नेहा वाघ, अविष्कार दारव्हेकर, गायत्री दातार आणि सोनाली पाटील यांची नावं होती. परंतु, प्रेक्षकांचे वोट कमी मिळाल्याने अखेर अविष्कारला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. अविष्कार आणि स्नेहा हे पूर्वाश्रमीचे पती- पत्नी असल्याने बिग बॉसचा तिसरा सीजन प्रचंड मनोरंजक होणार अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. अविष्कारला घरात आलेला पाहून स्नेहाची प्रतिक्रिया देखील अगदी पाहण्यासारखी होती. मात्र जसा जसा खेळ पुढे सरकला तसा अविष्कार घरात दिसेनासा झाला. प्रेक्षकांच्या मते, अविष्कारने घरात कोणत्याही कामात हिरीरीने भाग घेतला नाही. तो कोणत्याही टास्कमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. अविष्काराने स्वतःहून कोणत्याही कामाची जबाबदारी घेतली नाही. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही. प्रेक्षकांच्या मते अविष्कार या खेळासाठी बनलेलाच नव्हता. त्यामुळे प्रेक्षकांनी दिलेल्या कमी वोटिंगमुळे तो एलिमिनेट झाला. अखेरच्या क्षणापर्यंत गायत्री आणि अविष्कार डेंजर झोनमध्ये होते. मात्र थोड्याफार फरकाने गायत्रीने अविष्कारवर मात केली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Bt1rN3