Full Width(True/False)

दुखावलेल्या प्रेमाची 'तडप'

'तडप' सिनेमाचा ज्यांनी ट्रेलर पाहिला असेल; त्यांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे कथानकातील नायक नायिकेवर प्रचंड प्रेम करतोय. पण, ट्रेलरच्या एका दृश्यात नायक नायिकेला गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न करतोय. नेमकं असं काय घडतं ज्यामुळे नायकाला हे असं टोकाचं पाऊल स्वतःच्या 'प्रेमा'बाबतीतच उचलावं लागतंय? या प्रश्नाचं उकल करणारं या सिनेमाचं कथानक आहे. बॉलिवूडच्या गाण्याच्या भाषेत सांगायचं झाल्यास, 'तड़प तड़प के इस दिल से आह निकलती रही है... मुझको सजा दी प्यार की, ऐसा क्या गुनाह किया... तो लुट गए हाँ लुट गए, तो लुट गए हम तेरी मोहब्बत में...' या गाण्याच्या ओळीत सिनेमाचं सार दडलेलं आहे. खरं सांगायचं तर बॉलिवूडमधील लेखकांच्या लेखणीत रोमँटिक-अॅक्शन प्रेमकथानकांची कमतरता नाही. पण, तरीही बॉलिवूडला रिमेकचा मोह काही आवरता येत नाही. 'तडप'देखील तेलुगू सिनेमा 'आरएक्स १००'चा रिमेक आहे. हाती असलेल्या कथानकाला बॉलिवूडचा तडका आणि मुलामा देऊन लेखक रजत अरोरा आणि दिग्दर्शक मिलन लुथारिया यांनी तो आपल्यासमोर मांडला आहे. सिनेमाचा नायक स्टारकिड असल्यानं काहींच्या नजरा 'नेपोटिझम'च्या चष्यातून त्याच्याकडे बघतील. तर काही जण त्याला 'प्रतिभे'च्या चष्म्यातून बघतील. पण, सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षक हे जरुर मान्य करतील की, 'बंदे मे दम तो हैं.' अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न अहाननं त्याच्या या पदार्पण सिनेमातून केला आहे. सिनेमाच्या सुरूवातीपासून ते उत्तरार्धापर्यंत त्याच्या व्यक्तिरेखेची ग्रीप त्यानं घट्ट पकडून ठेवली आहे. थोडक्यात सांगायचं झाल्यास सुरुवातीला त्यांच्या अंगी 'हिरोपंती' दिसते. प्रेमात आंधळा झालेल्या नायकाचा मग 'कबीर सिंग' होतो आणि शेवटी 'डर' सिनेमातील खुनशी नायक त्याच्यात भिनतो. त्यामुळे अभिनेता म्हणून यापुढेही त्याच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. इशाना (अहान शेट्टी) हा मसुरीत राहणारा सर्वसामान्य मुलगा आहे. खरंतर तो अनाथ आहे; पण डॅडी (सौरभ शुक्ला) यांनी त्याचं संगोपन केलंय. इशाना एका मुलीच्या प्रेमात पडतो; जी आमदाराची मुलगी आहे. परदेशातून शिक्षण घेऊन आलेली रमिसा (तारा सुतारिया) आधुनिक विचारांची मुलगी आहे. प्रथमदर्शनी हा सिनेमा एक सामान्य मुलगा आणि श्रीमंत मुलीची प्रेमकथा वाटू शकतो. पण प्रत्यक्षात तसं नाही, कारण कथा जसजशी पुढे सरकत जाते, तसतसे तिचे अनेक पदर उलगडत जातात. सिनेमाचा पूर्वार्ध टिपिकल प्रेमप्रकरण, रोमान्स याभोवती फिरतो. पण, प्रेमात मिठाचा खडा पडतो आणि नायक-नायिकेत विरह येतो. पटकथेत प्रथमदर्शनी वडिलांच्या इच्छेनेच नायिकेचं लग्न होत आहे. पण मध्यंतरानंतर सिनेमा अचानक आपला मार्ग बदलतो. नायक प्रेमाच्या उत्कटतेनं सर्व मर्यादा ओलांडून नायिकेला मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण, काही घटना आणि गोष्टी अशा घडतात की, प्रेमच प्रेमाचा अंत करु पाहतो. हे नेमकं काय रंजक वळण आहे; ते जाणून घेण्यासाठी सिनेमा पाहण्यास हरकत नाही. अभिनेता म्हणून अहान मेहनती वाटतो. स्क्रीनवर तो लक्ष वेधून घेतो; पण त्यानं स्वतःच्या संवादफेकीवर आणखी भरीव काम करणं आवश्यक आहे. नायिका तारा सुतारिया ग्लॅमरस दिसली आहे. पण, भूमिकेच्या बाबतीत तिनं फार चोख काम केलंय अशातला भाग नाही. सिनेमात सौरभ शुक्ला यांच्या अनुभवामुळे डॅडी ही भूमिका उंचावते. त्यांचं काम सहज आणि नैसर्गिक वाटतं. लेखक रजत अरोरानं पटकथा आणि संवाद भरीव लिहिले आहेत. 'हिरो' आणि 'अँटीहिरो' पडद्यावर उभा करताना त्यात दिग्दर्शकाची मेहनत दिसते. मिलन लुथरियाचे सिनेमे त्यातील संवादांसाठीही लक्षात राहतात. यातही असे काही संवाद आपसूकच कलाकारांच्या तोंडी येतात की, ज्यामुळे प्रसंगांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. सिनेमाचा पूर्वार्ध काहीसा गोंधळलेला वाटू शकतो. पण, उत्तरार्धात अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. जे रहस्य लेखक आणि दिग्दर्शकाला पटकथेच्या शेवटापर्यंत लपवून ठेवायचं आहे; तो ठेहराव सिनेमाच्या मांडणीत अचूकपणे राखला आहे. सिनेमातील क्लायमॅक्स... 'तो लुट गए हम तेरी महोब्बत में' असं म्हणायला भाग पाडतो. सिनेमा : तडप निर्मिती : साजिद नाडियादवाला दिग्दर्शक : मिलन लुथरिया लेखन : रजत अरोरा कलाकार : अहान शेट्टी, संकलन : राजेश पांडे छायांकन : रगुल धरुमन दर्जा : तीन स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rCWyzP