बावीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'वास्तव : द रिअॅलिटी' हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात असेल. सिनेमातील संजय दत्तच्या अभिनयाचं तेव्हा भरभरून कौतुक झालं. पण, त्याच्याकडून तसं काम करून घेतलं ते दिग्दर्शक यांनी. संजयच्या अभिनय कौशल्याचे कंगोरे या सिनेमांच्या निमित्त मांजरेकर यांनी पडद्यावर मांडले. अशीच काहीशी पुनरावृत्ती मांजरेकरांनी 'अंतिम - द फायनल ट्रुथ' या सिनेमाच्या बाबतीत केली आहे. आणि त्याच्या 'व्यावसायिक' सिनेमातील 'लार्जन दॅन लाइफ' प्रतिमेला दिग्दर्शक म्हणून मांजरेकरांनी छेद दिला आहे. सिनेमाची व्यावसायिक गणितं आणि व्यक्तिरेखेतील वास्तविकतेचा योग्य समतोल राखत सलमानला त्यांनी पडद्यावर सक्षमपणे उभं केलंय. परिणामी; सलमान बॉलिवूडचा 'स्टार हिरो' नव्हे तर एक 'अभिनेता' म्हणून आपल्याला सिनेमात दिसतो. गेल्या काही वर्षांच्या सलमानच्या सिनेमातील त्याचा अभिनय पाहता; 'अंतिम'मध्येही तसाच काहीसा 'चुलबुल' पाहायला मिळेल अशी प्रथमदर्शनी अपेक्षा होती. पण, ती फोल ठरली असून सलमान स्वतःच्याच सलमानमय आवेशातून बाहेर पडला आहे. राजवीर सिंग या पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेत सलमाननं स्वत:ला उत्तमरित्या मोल्ड केलंय. पडद्यावर आपल्याला 'राजवीर सिंग' दिसतो. या भूमिकेत 'सलमान' फारसा डोकावत नाही. 'अंतिम' हा सिनेमा प्रविण तरडे लिखित, दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' या मराठी सिनेमावर बेतलाय. मराठीत गाजलेल्या या सिनेमाच्या कथानकाची पुनर्रचना करताना पटकथाकार-दिग्दर्शक म्हणून मांजरेकर यांनी आणि पटकथाकार अभिजित देशपांडे, सिद्धार्थ साळवी यांनी 'पुनर्निर्मितीचा संतुलित पॅटर्न' पडद्यावर आखला आहे. त्यामुळे रिमेक सिनेमांच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये होणारी गफलत 'अंतिम'च्या बाबीतीत झालेली नाही. नव्यानं पटकथा लिहिताना हिंदी सिनेमांच्या व्यावसायिक गणितांचा विचार करुन त्यात योग्य प्रमाणात 'मीठ-मसाला' टाकण्यात आलाय. वारेमाप 'मसाला' त्यात पडलेला नाही. परिणामी गोष्ट जरी पुण्यात घडणारी असली तरी ती देशव्यापी आणि बड्या निर्मिती मूल्यामुळे प्रभावी ठरते. सिनेमात मांजरेकर 'टच'देखील आहे आणि सलमानचा बॉक्स ऑफिस गल्लाभरु 'एंटरटेनमेंट' देखील. एंट्रीला टाळ्या.. अॅक्शन सिनला शिट्ट्या पडतील. पण, सिनेमा आपल्या वास्तवितेची नाळ तोडत नाही. कथानकाचा मूळ नायक राहुल अर्थात आहे. आयुषनं यापूर्वी 'लव्हयात्री' या सिनेमात काम केलं होतं. पण, अभिनेता म्हणून तितकासा तो प्रकाशझोतात आला नव्हता. राहुल या भूमिकेनं त्याला प्रकाशझोतात आणलं आहे. त्याची शरीरयष्टी, त्याचा स्क्रीनवरील वावर आणि त्याचं अभिनय कौशल्य अधोरेखित करण्याजोगं आहे. मराठी सिनेमात राहुलची भूमिका ओम भुतकरनं उत्कृष्टपणे आणि ताकदीनं साकारली होती. पण, हा रिमेकचा राहुलदेखील दमदार आहे. ओमच्या राहुलमध्ये जी निरागसता होती; ती आयुषच्या राहुलमध्ये नाही. दोघांच्या अभिनय कौशल्याची तुलना होणार नाही. पण, मराठी प्रेक्षक भूमिकेची आपापसात तुलना केल्याशिवाय राहणार नाही. सिनेमातील कलाकारांचं कास्टिंग आणि त्यांचा अभिनय त्यांच्या नावाच्या कार्यक्षमतेला साजेसा आहे. राहुलच्या वडिलांच्या भूमिकेतील सचिन खेडेकर, आईच्या भूमिकेत असलेल्या छाया कदम, राजकारण्यांच्या भूमिकेतील शरद पोंक्षे, वकील भारत गणेशपुरे, पोलिस सयाजी शिंदे आणि नन्या भाईच्या भूमिकेतील उपेंद्र लिमये यांनी आपापल्या भूमिका लीलया वठवल्या आहेत. गण्याची व्यक्तिरेखा साकारलेला रोहित हळदीकर आणि मंदा साकारलेली महिमा मकवाना हे दोघं नजरेत भरतात. या सर्वच कलाकारांनी सिनेमात रंगत आणली आहे. सिनेमांचं प्रोडक्शन डिझाइन आर्ट प्रशांत राणेनं दमदार उभं केलंय. पटकथेतील बारकावे निर्मितीमूल्यात विशेष टिपण्यात आले आहेत. करण रावत यांचे कॅमेरावर्कही आखीवरेखीव झालंय. शेतकरी आपली जमीन काही कारणास्तव धनाढ्य व्यक्तींना कवडीमोल भावानं विकतो. स्वतःच्या शेतात शेतकरी कामगार म्हणून काम करतो. परिस्थितीनं जखडलेला शेतकरी स्वतःच्या कुटुंबाबरोबर उदरनिर्वाह करण्यासाठी पुण्याच्या मार्केट यार्डात येतो. हमाल म्हणून तिकडे काम करु लागतो. शेतकऱ्याचा मुलगा सुरुवातीला नाईलाजानं आणि मग ठरवून भाई (भू-माफिया) बनतो. ज्या भू-माफियामुळे ही दयनीय अवस्था शेतकऱ्याची आणि त्याच्या मुलाची झालेली असते; तीच गुंडप्रवृत्ती परिस्थितीमुळे शेतकऱ्याच्या मुलात येते. हा मुलगा म्हणजे राहुल. या राहुलचीच गोष्ट 'अंतिम'मध्ये सामावलेली आहे. या कथानकाबाबत फार खोलवर इकडे लिहायला नको. 'मुळशी पॅटर्न' पाहिलेल्या प्रेक्षकाला सिनेमाची गोष्ट अगोदरच ठाऊक असेल. पण, तरीदेखील त्या प्रेक्षकांनी 'अंतिम' पाहण्यास हरकत नाही. जुन्या प्रेक्षकांना नव्यानं बांधणी केलेली ही गोष्ट आणि त्यातील पात्र भावतील. आणि नव्या प्रेक्षकाला कथानकातील चढ-उतार, रंजक वळणं आणि कलाकारांचा अभिनय भावेल. सिनेमाचं पार्श्वसंगीत आणि त्यातील गाणी (आयटम साँग वगळल्यास) श्रवणीय आहेत. एकदंरच बॉलिवूडच्या पटलावर रिमेकचा सिनेमा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'अंतिम'; असं म्हणायला हरकत नाही. सिनेमा : अंतिम : द फायनल ट्रुथ निर्मिती : सलमान खान फिल्म दिग्दर्शन : महेश मांजरेकर पटकथा : महेश मांजरेकर, अभिजित देशपांडे, सिद्धार्थ साळवी कलाकार : आयुष शर्मा, सलमान खान छायांकन : करण रावत संकलन : बंटी नागी दर्जा : ३.५ स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZKkplx