Full Width(True/False)

अतरंगी रे; कल्पना चांगली, कथेची माती

-अभिषेक खुळे एखाद्या गोंडस लेकराला आपण लाडे लाडे जवळ घ्यावं, अन् त्यानंच आपल्या कानफटात सटासट वाजवाव्यात... कशी स्थिती होईल आपली? काही कलाकृतींचं असंच असतं. वरून चकाचक, त्यामुळे खूप अपेक्षा वाढलेल्या. प्रत्यक्षात भ्रमनिरास. ‘अतरंगी रे’ या सिनेमानं असंच केलंय. चित्रपटाची संकल्पना उत्कृष्ट आहे. मात्र, ती कथेत उतरवून ज्या पद्धतीनं आपल्यासमोर पटरूपात आणली गेली, तिथंच तिचं मातेरं झालं. कलाकृती आनंद देणाऱ्या वा विचारांना चालना देणाऱ्या असाव्यात, असा साधा-सरळ नियम आहे. मात्र, काहींनी डोकंच पिकवायचं ठरवलंय तर त्याला आपण तरी काय करणार? बरं, हा चित्रपट खूपच सुमार आहे, असं म्हणता येणार नाही. मात्र, चांगल्या संकल्पनेची सादरीकरणात जी वाट लावली गेली, ती असह्य आहे. काय नव्हतं हो या चित्रपटाला उचलण्यासाठी! एक छान संकल्पना, तगडी स्टारकास्ट, नावाजलेला दिग्दर्शक, इर्शाद कामिल यांची गाणी, ए. आर. रहमान यांचं संगीत. एवढं सगळं असतानाही बासुंदीत लिंबू पिळावं तशी गत झाली. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा वेगळी काही अनुभूती मिळेल, असं वाटलं होतं. प्रत्यक्षात, कथेचा निर्घृण खून होताना पाहणं, ये बहोत दर्दभरी दास्तान हैं. हे तेच दिग्दर्शक आनंद एल. राय आहेत, ज्यांनी २०१३ला आपल्याला ‘रांझना’ हा उत्कृष्ट चित्रपट दिला होता. त्यातही धनुषच होता. त्यानंतर शाहरुखबरोबर त्यांनी ‘झिरो’ केला. तो कसा होता, हे सुजाणांना सांगण्याची गरज नाही. आता एवढं सगळं असताना ‘अतरंगी रे’ला धार यायला हवी होती. पण, कशाचं काय...! बालपणीच आई-वडील गमावलेली रिंकू () आपल्या नानीकडे राहते. ती नेहमी पळून जाते, घरचे तिला पुन्हा पुन्हा परत आणतात. रिंकू नानीच्या हातचा बेदम मार खात राहते. अशातच, संयम संपलेली नानी (सीमा बिस्वास) आणि घरची मंडळी रिंकूचं लग्न दिल्लीत डॉक्टर असलेल्या विशू () याच्याशी जबरदस्तीनं लावून देतात. दोघांनाही दिल्लीच्या ट्रेनमध्ये बसवून दिलं जातं. रिंकूच्या मते, तिचा आधीच प्रियकर आहे. इकडे विशूचाही साखरपुडा ठरलेला. हे लग्न दोघांनाही मान्य नाही. त्यामुळे रिंकूचा प्रियकर, आफ्रिकेत जादू शिकण्यासाठी गेलेला सज्जाद (अक्षयकुमार) परत येईपर्यंत सोबत राहायचं, असं विशू आणि रिंकूचं ठरतं. त्यानंतर जे घडतं, वळणं येत राहतात, त्याची ही कथा. यात भावभावनांचा कल्लोळ आहे, मानवी स्वभावांचे विविध कंगोरे आहेत, तरल आणि अलवारतेचंही दर्शन आहे. तरीही कमतरता का भासावी? तर, संकल्पना ‘सीरियसली’ न घेतल्यामुळे. साधारणत: १९८८-८९ साली एक मराठी नाटक आलं होतं. त्या नाटकातील संकल्पना ‘अतरंगी...’त वापरण्यात आली. मात्र, वास्तव बघा, ती संकल्पना घट्ट धरून सादरीकरण केल्यानं ते नाटक प्रभावी ठरलं होतं. त्याची जादू आजही कायम आहे. त्या नाटकाचं नाव घेतलं तर या चित्रपटातील कथेचं रहस्य उगाच फोडल्यासारखं होईल. पण, जो हैं सो हैं! चित्रपटाची सुरुवात चांगली आहे. मध्यंतरापर्यंत बऱ्यापैकी जमून आलंय. मध्यंतरानंतर मात्र आपल्या अपेक्षा टराटरा फाटतात. गंभीर रहस्य उघड झाल्यानंतर ते तेवढ्याच गांभीर्यानं पुढं नेलं असतं तर अधिक वास्तवदर्शी वाटलं असतं. मात्र, इथं फुटकळ विनोद लावून त्या संकल्पनेवर अन्याय केला गेला. कित्येक अतार्किक प्रसंग यात आहेत. बॉइज हॉस्टेलमध्ये मुलगी इतके दिवस कशी काय राहू शकते? प्रशासन वगैरे चीज आहे की नाही? हीच रिंकू तामिळनाडूत विशूच्या साखरपुड्यात जाते, तिथं ‘चक चका चक’ म्हणत बेधुंद नाचते काय, विशूशी फ्लर्ट करते काय. काही काही बाबींत डोकं वापरलं की नाही, असं वाटत राहतं. या झाल्या चित्रपटाच्या पडेल बाबी. मात्र, सर्वात जमेची बाजू कुठली असेल तर ती धनुष. हे एक अजब रसायन आहे. अभिनय त्याच्या नसानसांत नाही, तर पेशीपेशींत आहे. कलाकृतीत त्याचा वावरच सुखावणारा असतो. तमिळ भाषेत रिंकूला आपल्या प्रेमाची कबुली देताना त्याचे जे डोळे बोललेत, ते लाजवाब. दुसरं म्हणजे, गाणी आणि रहमानी संगीत. तिसरं म्हणजे पंकज कुमार यांची सिनेमॅटोग्राफी. सारानं सुरुवातीला अभिनयाचा प्रयत्न केला. बिहारी लहेजा संवादांत आणला. पण, तो जास्त वेळ टिकला नाही. नंतर नंतर तिचा अभिनय ‘लाउड’ आणि ‘ओव्हर’ झाला. अक्षयकुमार मुळातच येऊन-जाऊन आहे. जेवढं वाट्याला आलं, त्यानं इमाने-इतबारे केलंय. विशूच्या मित्राच्या भूमिकेतील एमएस (आशिष वर्मा) यानंही कमाल केलीय. चित्रपटाचा शेवट तुलनेत थोडा प्रभावी, हृदयस्पर्शी झालाय. मात्र, तोवर प्रेक्षकांचा संयम संपत आलेला असतो. प्रेमाचं सुंदर नातं, मुलीची आपल्या वडिलांविषयी असलेली हिरोची प्रतिमा... या संवेदनशील बाबींनाही यात स्पर्श करण्यात आलाय. ही कलाकृती अनुभवायची की नाही, हे आपल्या ‘रिस्क’वर ठरवा. पाहायचाच झाला, तर धनुष आणि फक्त धनुषसाठी बघा, बाकीचं सोडून द्या. अतरंगी रे... कथा : हिमांशू शर्मा. दिग्दर्शक : आनंद एल. राय. निर्माते : आनंद एल. राय, हिमांशू शर्मा, किशन कुमार, भूषण कुमार, टी सीरिज, कलर येलो प्रॉडक्शन, कॅपे ऑफ गुड फिल्म्स. कलाकार : अक्षयकुमार, सारा अली खान, धनुष, सीमा बिस्वास, आशिष वर्मा आदी. गीते : इर्शाद कामिल संगीत : ए. आर. रहमान सिनेमॅटोग्राफी : पंकज कुमार संकलन : हेमल कोठारी ओटीटी : डिझ्ने हॉटस्टार दर्जा : अडीच स्टार कथा : हिमांशू शर्मा. दिग्दर्शक : आनंद एल. राय. निर्माते : आनंद एल. राय, हिमांशू शर्मा, किशन कुमार, भूषण कुमार, टी सीरिज, कलर येलो प्रॉडक्शन, कॅपे ऑफ गुड फिल्म्स. कलाकार : अक्षयकुमार, सारा अली खान, धनुष, सीमा बिस्वास, आशिष वर्मा आदी. गीते : इर्शाद कामिल संगीत : ए. आर. रहमान सिनेमॅटोग्राफी : पंकज कुमार संकलन : हेमल कोठारी ओटीटी : डिझ्ने हॉटस्टार दर्जा : अडीच स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sysCVV