Full Width(True/False)

नटवरच्या भूमिकेसाठी किरण गायकवाडनं केली विशेष तयारी; शेअर केला अनुभव

मुंबई : क्षणाक्षणाला वाढवणारी उत्कंठा आणि कथानकाला मिळणारं रंजक वळण यांची उत्तम सांगड घालत छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस' या मालिकेनं अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. मालिकेतील सर्व कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. मालिकेचं पहिलं पर्व यशस्वी झाल्यानंतर आता दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं. मालिकेचा मुख्य चेहरा असलेला अभिनेता किरण गायकवाड म्हणजेच डॉ. अजितकुमार देव हा आता राजस्थानी नटवरच्या भूमिकेत दिसतोय. परंतु हाच आहे का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आणि त्याचं उत्तर त्यांना मिळालंसुद्धा. नटवर हाच देवमाणूस आहे, हे प्रेक्षकांनी पाहिलंय. डॉ. अजितकुमार देव या भूमिकेतून नटवरच्या भूमिकेत शिरतानाचा अनुभव कसा होता याबाबत किरण गायकवाड म्हणतो, 'जेव्हा मला कळलं की नटवर हा राजस्थानमधील हातचलाखी करणारा माणूस आहे, तेव्हा मी त्या ट्रिक्स आणि जादूचे प्रयोग शिकून घेतले. राजस्थानी भाषेचं प्रशिक्षणसुद्धा घेतलं. जेव्हा आम्ही राजस्थानमध्ये शूटिंग करत होतो, तेव्हा मी आधी तेथील बाजारपेठेत फिरून माणसांचं निरीक्षण केलं आणि त्यांचा लहेजा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला'. नटवर सिंगच्या बायकोच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री प्रिया गौतमच्या अभिनयाचंही कौतुक होतंय. प्रिया मूळची राजस्थानची असल्यामुळे किरण गायकवाडला नटवर सिंग ही भूमिका साकारण्यासाठी तिनं विशेष मदत केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EFNZXS