मुंबई : गानसम्राज्ञी यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात ८ जानेवारीपासून उपचार सुरू आहेत. लतादीदींना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. लतादीदींची प्रकृती सुधारावी यासाठी जगभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. इतकेच नाही तर दीदींना बरे वाटावे यासाठी अयोध्येत महामृत्युंजय मंत्राचा जप आणि होमहवन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरात लवकर लतादीदींची भेट घ्यावी अशी इच्छा या होमहवनामध्ये सहभागी झालेल्या जगद्गुरू परमहंस आचार्य महाराजांनी व्यक्त केली आहे. जगद्गुरू परमहंस आचार्य महाराजांनी सांगितले की,' गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आम्ही महामृत्युंजयाचा जप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्ही विनंती करतो की त्यांनी लतादीदींची भेट घ्यावी...' ९२ वर्षांच्या लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या कोणत्याही अफवा पसरवू नका असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांसह डॉक्टरांनीही केले आहे. मंगेशकर कुटुंबियांनी लतादीदींच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, 'लता दीदी यांच्या प्रकृतीमध्ये किंचित सुधारणा झाली आहे. परंतु त्या अजूनही आयसीयुमध्ये आहेत. कृपा करून लतादीदींच्या प्रकृतीविषयीच्या खोट्या बातम्या पसरवू नका. त्यावर विश्वास ठेवू नका... धन्यवाद' मंगेशकर कुटुंबियांची विनंती 'डॉ. प्रतित समदानी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमकडून लतादीदींवर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यास आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तुम्ही अफवांना बळी पडू नका आणि दीदी लवकर बरे व्हाव्यात आणि घरी परत याव्यात यासाठी प्रार्थना करूयात.' लता मंगेशकर यांच्या कौटुंबिक स्नेही आणि प्रवक्त्या अनुषा श्रीनिवास अय्यर यांनी दिलेल्या माहितीनुसार 'लतादीदींच्या प्रकृतीविषयी रोजच्यारोज माहिती देणे शक्य नाही. हे त्या कुटुंबाच्या खासगीपणात हस्तक्षेप करण्यासारखे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संवेदनशील असणं गरजेचं आहे.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3u5vgTY