मुंबई- ज्येष्ठ समाजसेविका आणि 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. सिंधूताई यांच्या जाण्याने हजारो मुलं अनाथ झाली. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवले. 'कौन बनेगा करोडपती' मध्ये सिंधूताईंनी आयुष्यातील संघर्षाचा एक हृदयद्रावक अनुभव सांगितला. तो ऐकताना अमिताभ बच्चन यांच्यासह उपस्थित सारेच भावुक झाले. सिंधूताईंना KBC च्या ११ व्या सिझनमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी ताईंनी दिवाळीच्या दरम्यानचा एक किस्सा बिग बींना सांगितला होता. हा किस्सा त्या सासवडला असतानाचा होता. त्या म्हणाल्या की, 'लक्ष्मीपूजनाचा दिवस होता मी आजारी होते. जेव्हा इतर लहान मुलं फटाके फोडत होती तेव्हा माझी मुलं त्यांना पाहून टाळ्या वाजवत होती. त्यांच्याकडे काहीच नव्हतं आणि मी काहीच करू शकत नव्हते.' 'मग माझ्या एका मुलाने दारोदारी जाऊन विनंती केली आणि सांगितलं की आमची इथे ममता बाल सदन नावाची संस्था आहे. आमची आई आजारी आहे ती उठू शकत नाही. ती रडत आहे आणि आमच्याकडे खायला काहीच नाही. मग काहीनी गूळ दिला काहींनी पीठ दिलं आणि आमची मदत केली. या सर्व गोष्टी गोळा केल्यावर त्याने येऊन सांगितलं की आई हे बघ मी तुझं नावं सांगून या सर्व गोष्टी आणल्या.' दरम्यान, नवऱ्याने नाकारून घराबाहेर काढल्यानंतर गाईच्या गोठ्यात त्यांनी मुलीला जन्म दिला. दगडाने तोडलेली नाळ आणि मुलीने फोडलेला टाहो हे दोन्ही प्रसंग त्या शेवटपर्यंत विसरू शकल्या नाहीत. पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी दहा दिवसांचं बाळ घेऊन त्यांना बराच संघर्ष करावा लागला. त्यातूनच त्या अनाथांसाठी संस्था उभ्या करू शकल्या. प्राप्त परिस्थितीला शरण न जाता, त्यास केवळ 'प्राक्तन' न मानता आव्हान म्हणून त्यांनी आयुष्याकडे पाहिलं. समाजातील अन्यायग्रस्त स्त्रियांना आशेचा प्रकाश दाखवला. स्वातंत्र्य ही देण्याघेण्याची वस्तू नाही. जीवनमान उंचावण्यासाठी आपणच स्वातंत्र्याचा जाणीवपूर्वक अवलंब करायला हवा हे त्यांनी सिद्ध केलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3HFlawr