Full Width(True/False)

अंगावर काटा आणणारा अनुभव

‘हजारो वर्षं गुलामीत काढलीत ना! आता ती गुलामी हटवून स्वातंत्र्याचा सूर्य उगवू पाहतोय शिवाजी महाराजांच्या रूपात. त्या सूर्याला ग्रहण लागू नये म्हणून आज लढायचं. मला माहितेय तुम्ही सगळे दमलेले आहात; पण आज हे असंच सोडू नका. या जखमांकडून, तारवटलेल्या डोळ्यांकडून, धपापणाऱ्या छात्यांकडून बक्षिसी वसूल करा. तुमचं युद्ध गनिमाशी नाहीच, तुमचं युद्ध आहे कमजोरीशी. आज तुमचं युद्ध आहे काळ बनू पाहणाऱ्या वेळेशी, तुमचं युद्ध आहे अफाट संख्येचा गनिम पाहून मनात वाटणाऱ्या भीतीशी. तुम्हाला वाटेल आज कसे जिंकणार आहोत आपण, तेव्हा फक्त राजांना आठवा. या दरडीच्या छाताडावर पाय रोऊन उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज राजांना वाचवलंत, तर या घोडखिंडीच्या दगडादगडावर तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क, हक्कानं मागता येईल... ज्याचं नाव आहे, स्वराज्य!’ हे घोडखिंडीतले बाजीप्रभू देशपांडे यांचे उद्गार ‘पावनखिंड’ या चित्रपटात कानांवर पडताच अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. गनिमाविरुद्ध तळपायाची आग मस्तकात जाईल आणि ऊर अभिमानानं भरून येईल. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट त्याच शौर्याची साक्ष देतो. इतिहास पडद्यावर मांडताना, एक लेखक म्हणून दिग्पालनं पटकथेतला घटनाक्रम समर्पक लिहिला आहे. चित्रपटाच्या कथानकात, वेळोवेळी इतिहासाचे दाखले देण्याचा प्रयत्नही दिग्पालनं केला आहे. पूर्वार्ध संकलनाच्या पातळीवर काहीसा डगमगलेला वाटतो. चित्रपटाच्या शीर्षकातील, अर्थात ‘पावनखिंडीत’ घडणाऱ्या घटनेची पार्श्वभूमी; किंबहुना त्या घटनेचा उच्चांक प्रेक्षकांना गाठता यावा यासाठी लिहिली गेलेली पटकथा आणि त्यावर झालेले संकलन संस्कार प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपुरे पडतात. चित्रपटाच्या उत्तरार्धात मात्र ही कसर भरून निघते. पन्हाळगड, पायथ्याशी असलेला सिद्दी जौहर, पन्हाळगडावरून विशाळगडाकडे वाट काढण्याची युक्ती, घोडखिंडीतला लढा हा कथाप्रवास थक्क करणारा आहे. सह्याद्रीच्या कातळात असलेल्या ‘घोडखिंडी’ची ‘पावनखिंड’ कशी झाली, हा प्रवास चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज (चिन्मय मांडलेकर) यांच्या तोंडून ऐकायला आणि पाहायला मिळतो. चित्रपटाची सुरुवात होते, ती राज्याभिषेकापूर्वी महाराज आपल्या काही मावळ्यांसह शंभूराजांना कासारी नदीकाठी घेऊन येतात. नदीच्या पाण्याला वंदन करतात. याचं कारण, याच पाण्यात बांदल सेनेनं आपलं रक्त सांडलं होतं. स्वराज्य उभं करण्यामागे ज्या शूरवीरांची मोलाची साथ लाभली, त्यांच्याविषयी महाराज शंभूराजांना सांगू लागतात आणि चित्रपटाचं कथानक महाराजांच्या स्मृतीतून प्रेक्षकांसमोर उभं राहतं. पावनखिंड म्हटल्यावर सर्वसामान्यपणे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाविषयी इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या काही ओळी आठवतात; पण केवळ काही ओळींमध्ये संपेल इतकी छोटी ही घटना नक्कीच नाही. म्हणूनच हा चित्रपट बघणं आणि समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या खांद्याला खांदा लावून लाभलेल्या वीरांची ओळख आपल्याला चित्रपटात होते. रायाजीराव बांदल (अंकित मोहन), कोयाजीराव बांदल (अक्षय वाघमारे), बहिर्जी नाईक (हरिश दुधाडे), सरनोबत नेताजी पालकर (विक्रम गायकवाड), श्रीमंत शंभूसिंह जाधवराव (बिपीन सुर्वे), फुलाजीप्रभू देशपांडे (सुनील जाधव), हरप्या (शिवराज वायचळ), गंगाधरपंत (वैभव मांगले) आणि महाराजांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा नरवीर शिवा काशीद (अजिंक्य ननावरे) या चेहऱ्यांचं, त्यांच्या कामगिरीचं आणि शौर्याचं दर्शन या सिनेमात होतं. यात लेखक म्हणून दिग्पालचंही श्रेय आहे; कारण त्यानं प्रत्येक भूमिका बारकाईनं लिहिली आहे. कलाकारांबद्दल बोलायचं, तर मातु:श्री जिजाऊसाहेब यांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी या अभिनेत्रीनं नेहमीप्रमाणे उत्तम काम केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर, तर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत अजय पूरकर यांनी लाजवाब कामगिरी केली आहे. पटकथेतील क्लोजअप शॉट अफलातून आहेत. त्यात दिसणारे चिन्मय आणि अजयचे डोळे, चेहऱ्यावरील भाव संवादांच्या पलीकडे भावना व्यक्त करतात. अजय यांनी भूमिकेसाठी घेतलेली शारीरिक मेहनत पडद्यावर विशेष दिसते. समीर धर्माधिकारी यांनी सिद्दी जौहरची भूमिका उत्तम वठवली आहे. छोट्या भूमिकांमध्ये झळकलेले आस्ताद काळे, प्राजक्ता माळी यांचं कामही लक्षात राहतं. चित्रपटाचं संगीत कथानकाला पूरक. ‘युगत मांडली’ हे गाणं लक्षात राहतं. तांत्रिक बाजू काहीशी डगमगल्यासारखी वाटते; पण त्याकडे दुर्लक्ष करता येतील. चित्रपटाच्या संपूर्ण कथानकात विविध शूरवीरांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. पावनखिंड निर्मिती : आलमंड्स क्रिएशन्स लेखक/दिग्दर्शक : दिग्पाल लांजेकर कलाकार : मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, अंकित मोहन, हरीश दुधाडे, प्राजक्ता माळी संगीत : देवदत्त मनिषा बाजी छायांकन : अमोल गोळे संकलन : प्रमोद कहार दर्जा : साडेतीन स्टार


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/bnYHQfE