मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल म्हणजे आणि . लग्नानंतर दोघंही सध्या लंडनमध्ये आहेत. २७ जुलैला सखीचा वाढदिवस होता. सखीसाठी सुव्रतनं एक खास सरप्राइज दिलं होतं. हे सरप्राइज म्हणजे त्यानं स्वत: बनवलेला केक. सुव्रतनं अगदी फिल्मी स्टाइलनं तिच्यासाठी लपून-छपून केक बनवण्याचा घाट घातला होता. त्यानं छान केक देखील बनवला. या केकम मागची कहानी त्यानं सोशल मीडियाच्यामाध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सुव्रतनं केकचा एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ शेअर करताना त्यानं सखीबद्दल न लिहिता 'केक' बद्दल बरचं काही लिहिलं आहे. त्यानं लिहिलेलं हे कॅप्शन चाहत्यांची मनं जिंकत आहे. सुव्रतनं त्याच्या लहाणपाणापासून केकच्या गमती या पोस्टमध्ये शेअर केल्यात. मराठी भाषेत पोस्ट लिहिल्यानं चाहत्यांना ही पोस्ट आणखी भावली आहे. काय लिहिलं आहे सुव्रतनं त्याच्या पोस्टमध्ये? उत्तम केक बनवणे हे मोठे जिकिरीचे काम आहे. त्यात तंत्र आहे,पाककला आहे. त्यामुळे आज सखीच्या वाढदिवसानिमित्त काल दिवसभर लपून छपून शेजार्यांकडे जाऊन हा नटेला हेझलनट केक बनवला. नटाला 'नटेला' आवडतच. अंडी न घातलेला साजूक तुपातला कुकर मध्ये केलेला रव्याचा केक,लहानपणी ही माझी केक या पदार्थाबद्दलची समज आणि पोच होती. थोडक्यात रोज खात असलेला शिरा आपण कुकर मध्ये उकडून केक च्या नावाखाली खायचो. त्यातून वाढदिवसाला केक कापणे या कृतीला आमच्या घरात काहीही स्थान अथवा प्रोत्साहन नव्हते. मलाही त्याबद्दल कधी आकर्षण वाटले नाही. थोडा मोठा झाल्यावर केक या पदार्थाची व्याख्या विस्तारली. त्यात नुसता केक आणि "क्रिमचा केक" असे दोन गट पडले. त्यात अर्थातच "क्रीमच्या केक"ला अधिक वरचे आणि महत्वाचे स्थान होते. मग क्रिमच्या नावाखाली थापलेला पांढरा चिकट डालडा आणि 'चेरीच्या' नावाखाली ब्लिच करून साखरेत बुडावलेला,वर लाल रंग चढवलेला लाल भोपळा कुणी खायचा यावर होणाऱ्या भांडणात मी हिरीरीने भाग घेऊ लागलो. होय, लहानपणी आपल्या केकवर, मिल्कशेक मध्ये,पानामध्ये पडणारी "टूटी फ्रुटी" आणि "चेऱ्या" हा लाल भोपळा आहे, हे सँटाक्लाँज हे आपले वडीलच आहेत यापेक्षाही मोठा धक्का होता. या सगळ्यात अत्यंत प्रामाणिक पदार्थ म्हणजे 'खोबरा केक'. तो अतिशय लोकप्रिय होता. चाचणी परीक्षा संपणे ते स्नेहसंमेलनात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळणे या सर्व गोष्टीची पार्टी ही खोबरा केक खाऊनच व्हायची. मग पुढे कॉलेज मध्ये गेल्यावर मेणबत्ती विझून केकला सूरी टेकल्या क्षणी तो उचलून तोंडाला फासण्याची घाई होऊ लागली. कुठल्याही वाढदिवसाला आणलेला केक हा मुळात तोंडाला फासण्यासाठीच बनवलेला असतो याची खात्री मला पटली आहे. त्यामुळे बेसनाचा स्पंज केक बनवून वर चॉकलेट च्या जागी मुलतानी मिट्टीचे किंवा क्रिम म्हणून मॉइश्चरायझर चे आयसिंग केले तरी चालेल असे मला वाटते. किंबहुना त्यामुळे कॉलेज वयीन मुलांना त्यांना नुकत्याच आलेल्या तरुण्यापिटिकांपासूनही मुक्ती मिळू शकेल. मग गणपतीत असतात तसे विविध देखावे असणारे केक बनवण्याची खोडही लोकांना असते. काही लोक तर त्यांच्या आवडत्या नट नट्यांचे फोटो केकवर लावून घेतात. त्या न्यायाने अभिनयात नाही पण खऱ्या आयुष्यात मी काही नट नट्यांना खाऊन टाकले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीतून आल्यावर उत्तम केक खायला मिळायला मला वयाची तिशी गाठायला लागली. काही गोऱ्या मित्रांनी हा केक तोंडाला न फासता स्वतःच्या तोंडात कोंबला आणि तोंडातून स्तुतीचे शब्द काढले तेव्हा भरून पावलो. Happy birthday सखी!
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2P7DWDM