मुंबई: गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या लाखो चाकरमान्यांची लॉकडाऊनच्या नियमांमुळं कोंडी झाली आहे. राज्य सरकार ही कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करत असलं तरी आता कोकणवासीयांच्या मदतीला अभिनेता धावला आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात अडचणींचे डोंगर उभे ठाकले आहेत. विलगीकरणाचा कालावधी ठरत नाही, एसटी-रेल्वेची सेवा बंद आणि अशातच आता गावी जाण्यासाठी ई-पासही मंजूर होत नसल्यानं डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांच्या वेबसाइटवर वैद्यकीय कारणांसाठी आणि अडकलेल्यांसाठी अशा दोनच कारणांसाठी ई-पासची व्यवस्था असल्यानं नेमके कारण द्यायचं तरी काय असा प्रश्न चाकरमान्यांना पडला आहे. खासगी ट्रॅव्हल चालकही तिकिटांची अव्वाच्या सव्वा रक्कम मागत आहेत. असं असताना कोकणात जाण्याऱ्या एका व्यक्तीनं सोनू सूदकडं मदत मागितली आहे. 'आमचा सण जवळ यतोय. ट्रॅव्हल बस चालवणारे मुंबईपासून मालवणपर्यंत जाण्यासाठी एका व्यक्तीचे तब्बल ३ हजार रुपये आकारत आहेत. खरं तर हे दर ५०० रुपये असतात. शिवाय ते ई पाससाठीसुद्धा जास्तीचे ५०० रुपये मागत आहेत', असं म्हणत एका व्यक्तीनं सोनू सूदकडं गावी जाण्यासाठी मदत मागितली. अन् त्याला गणपती बाप्पा पावला,कारण सोनूनं त्याच्या ट्विटला रिप्लाय देत मदतीचा हात पुढं केलाय.' कुणालाही जास्तीचे पैसे देण्याची गरज नाही. मला तुमची माहिती पाठवा....गणपती बाप्पा मोरया', असं म्हटलं आहे. कोकणात घरोघरी साजरा होत असल्याने मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून लाखो चाकरमानी दरवर्षी या सणासाठी गावी जातात. रेल्वे, एसटी, खासगी लक्झरी, खासगी वाहने असे अनेक पर्याय चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी उपलब्ध असतात. मात्र यंदा करोनाच्या संकटामुळे रेल्वे बंद आहे. एसटी सोडायची की नाही याबाबतही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यातच विलगीकरण कालावधीवरून राजकारण रंगले आहे. महिन्यावर येऊन ठेपला तरी शासनाकडून काहीच मार्ग दिला जात नसल्याने चाकरमानी अडचणीत सापडले आहे. शासन निर्णय घेईल, तेव्हा घेईल; ऐनवेळी वाहतूक कोंडी तसेच इतर संकटामध्ये अडकण्यापेक्षा चाकरमान्यांनी आतापासून गावाला जायची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी खासगी वाहनांचा पर्याय निवडला आहे. परंतु या मार्गातही त्यांना अडचणी येत आहेत. एजंटना मिळतो तातडीने ई-पास ई-पास मिळवून देणाऱ्या एजंटचा मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांमध्ये सुळसुळाट आहे. स्वतःहून केलेल्या अर्जाला मंजुरी मिळत नाही; मात्र एजंटमार्फत अर्ज केल्यास तो तत्काळ मंजूर होतो. अंधेरीतील एक चाकरमानी गावी जाण्यासाठी निघाला. त्याने ई-पाससाठी अनेकदा अर्ज केला; मात्र तो नामंजूर झाला. अखेर त्याने एका एजंटशी संपर्क साधला. तिघांच्या ई-पाससाठी एजंटने दीड हजार रुपये घेतले. शासनाने चाकरमान्यांसाठी व्यवस्था न केल्यास गणेशोत्सवकाळात एजंटकडून अशीच आर्थिक लुबाडणूक केली जाण्याची शक्यता आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2X7Efmd