Full Width(True/False)

महाराजांची भूमिका साकारल्यानंतर दुसऱ्याचा विचार करायला शिकलो: शरद केळकर

- कल्पेशराज कुबल
  • महाराजांची भूमिका साकारल्यानंतर त्या भूमिकेतील कोणती गोष्ट आजही तुझ्याबरोबर आहे?
आपण आपल्या आयुष्यात स्वतःसाठी आणि जवळच्या माणसांसाठी खूप काही करतो. घर, गाडी, बँक बॅलन्स असं आपलं सर्वसाधारण ध्येय असतं. त्यात दुसऱ्यांचा विचार खूप कमी असतो. मी देखील असाच काहीसा होतो. पण, छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारल्यानंतर स्वतःमध्ये एक बदल झालेला मला जाणवतो; तो म्हणजे मी दुसऱ्याचा विशेष विचार करायला लागलोय. महाराज हे जनतेचे राजे होते. महाराजांचा तो विचार माझ्या मनात आज खोलवर रुजला आहे. माझ्यापरीनं मी दुसऱ्यासाठी जे काही करता येईल; ते करायचा प्रयत्न करतो.
  • एकीकडे हॉलिवूडचे सुपरहिरो सिनेमे सीरिज आणि दुसरीकडे भारतीय सिनेमा; काय सांगशील?
कोणताही चित्रपट हा प्रेक्षकांवर अवलंबून असतो. प्रेक्षकांनी चित्रपट पाहिल्यावर त्या सिनेमाच्या मेकर्सना प्रोत्साहन मिळतं आणि मग तो पुढे आणखी सिनेमे बनवतो. हॉलिवूडमधील अनेक चित्रपटांची सीरिज भारतसह जगभर लोकप्रिय आहे. त्यांच्या सुपरहिरो चित्रपटांची चर्चा आणि त्यांचा प्रेक्षक जगभर आहे. कारण, तसं मार्केटिंग, प्रमोशन ते करत असतात. स्वतःच स्वतःचा डंका वाजवणं महत्वाचं असतं. आपण आपल्या महापुरुषांना, वीरांगनांना चित्रपटांच्या माध्यमातून जगासमोर आणू. तसे प्रयत्न ओम राऊत, दिग्पाल लांजेकर यांच्यासारखे दिग्दर्शक करत आहेत. आता प्रेक्षक म्हणून आपली ही जबाबदारी आहे की, ते सिनेमे पाहून त्याविषयी इतरांना, अगदी सातासमुद्रापार सांगायचं. 'तान्हाजी' सिनेमाच्या निमित्तानं मला जगभरातील प्रेक्षकांकडून अभिप्राय आले.
  • 'इडक'च्या निमित्तानं तू सिनेनिर्मती क्षेत्रात पाऊल टाकलं आहेस....
अभिनेता असल्यामुळे मला निर्मात्याचं महत्त्व ठाऊक आहे. किंवा चित्रपटाची निर्मिती करणं किती महत्वाचं आणि आवश्यक आहे हे मी जाणतो. ज्या इंडस्ट्रीनं आपल्याला घडवलं आहे. त्या इंडस्ट्रीला आपणही देणं लागतो. मला अनेकांनी विचारलं की, तू स्वतः तुझ्या सिनेमात काम का नाही केलं? माझं उत्तर सोपं होतं...'कास्टिंग'. गोष्ट आणि त्यासाठी असलेलं कलाकारांचं कास्टिंग माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. स्वतःच सिनेमा बनवायचा आणि गरज नसताना त्यात स्वतःच हिरो म्हणून काम करायचं; असं बरोबर नाही. अभिनेता संदीप पाठक या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. जी त्यानं अत्यंत सुरेख साकारली आहे. सांगायचा मुद्दा हाच की, माझ्यासाठी योग्य कास्टिंग महत्त्वाचं आहे.
  • पुन्हा महाराजांची भूमिका साकारणार का?
मी यापूर्वी मराठीत काम केलं आहे. पण, छत्रपतींची भूमिका साकारल्यानंतर लोकांना विश्वास बसला आणि समजलंय की, हा महाराष्ट्रीयन आहे. या गोष्टीचा मला अधिक आनंद आहे. त्यामुळे पुन्हा संधी मिळाल्यास महाराजांची भूमिका नक्कीच साकारेन.
  • लोक का घाबरतात तुला ?
सध्या मी खूप शांत झालो आहे. माझ्या मुलीच्या जन्मानंतर मी राग सोडून दिला आहे. माझ्या जवळचा जो मित्र परिवार आहे, त्यांनाच ठाऊक आहे की मी किती हळवा आहे. कदाचित माझ्या आवाजामुळे लोक मला घाबरत असतील.
  • परेड आणि खाऊ
स्वातंत्र्यदिनाची एक आठवण सांगताना तो म्हणाला, की 'माझं बालपण मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये गेलं. मी आमच्या शाळेच्या बँडमध्ये होतो. माझी उंची इतर मुलांपेक्षा जास्त असल्यामुळे रांगेत मागे उभा राहून मी ड्रम वाजवायचो. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला शाळेत परेड असायची; त्यात मी नेहमी सहभागी व्हायचो. शाळेतले ते गोड दिवस आणि आठवणी प्रत्येकाच्या मनात घर करून असतात. तशाच त्या माझ्याही मनात आहे. परेडमध्ये सहभागी होण्याचं आणखी कारण म्हणजे परेडनंतर गोड खाऊ मिळायचा.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XZLDjV