गौरी भिडे ० यंदाच्या गणेशोत्सवामध्ये 'टाइम्स म्युझिक'बरोबर तुमचा अल्बम येतोय... यावर्षीचा गणेशोत्सव सगळ्यांसाठी वेगळा असणार आहे. 'टाइम्स म्युझिक' आणि 'लालबागचा राजा' मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं 'राजा गणपती' हा अल्बम 'टाइम्स म्युझिक स्पिरिच्युअल' या युट्यूब चॅनलवरून गणपतीच्या पहिल्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. यावर्षी सगळे घरीच असल्यानं हा अल्बम घरात एक वेगळंच भक्तिमय वातावरण निर्माण करेल. सगळीच गाणी अप्रतिम झाली आहेत. ० या अल्बममधल्या गाण्यांच्या अनुभवाबद्दल सांगा. मी एकट्यानं एक आणि माझ्या दोन्ही मुलांबरोबर एक अशी दोन गाणी गायलो आहे. मी 'वतापी गणपतीम' हे गाणं गायलो आहे. कर्नाटक शास्त्रीय संगीतावर आधारित हे गाणं मी आत्तापर्यंत गायलेल्या गाण्यांपेक्षा वेगळं आहे. शिवम आणि सिद्धार्थ यांच्याबरोबर मी 'दुर्गे दुर्घट भारी' ही आरती गायलो आहे. दीपेश वर्मा या आमच्या मित्रानंच हे गाणं अरेंज केलं आहे. आपल्या मुलांबरोबर गायची संधी फार कमी कलाकारांना मिळते. मला ती मिळाली हा खरं तर बाप्पाचा आशीर्वाद आहे. ० तुमचं आणि गणपती बाप्पाचं नातं कसं आहे? आमच्या घरी दहा दिवस मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होतो. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना या निमित्तानं घरी येतात. आम्ही वर्षभर गणपती बाप्पाची वाट बघत असतो. गजाननाच्या येण्यानं वर्षभर पुरेल अशी वेगळीच ऊर्जा घरात निर्माण होते. माझी पत्नी संगीतादेखील गणपतीची भक्त आहे. बाप्पाबद्दल आमच्या मनात खूप श्रद्धा आहे. ० दरवर्षी तुमच्या घरी गणपतीमध्ये सांगीतिक कार्यक्रम असतो त्याबद्दल सांगा. हो. आमच्या घरी गणपतीच्या दिवसात अनेक कलाकार येतात. रात्रभर आम्ही सांगीतिक कार्यक्रम सादर करतो. हे सगळे कलाकार स्वत:हून येतात आणि गणपतीसमोर आपली सेवा सादर करतात. गणपती ही कलेची देवता असल्यानं शास्त्रीय, उपशास्त्रीय, गझल, फिल्मी साँग अशा सगळ्या प्रकारची गाणी आम्ही गातो. प्रत्येक जण त्याला जी कला अवगत असेल ती सादर करतो. हसतखेळत कलेचा आनंद घेत आम्ही रात्रभर जागतो. यावर्षी याची खूप आठवण येईल. यंदा निर्बंध असल्यानं आणि माझ्या घरी ८३ वर्षांची माझी आई असल्यानं हा कार्यक्रम होऊ शकणार नाही. ० गणेशोत्सव नेहमीसारखा साजरा करता येणार नसल्यानं यंदा थोडं नकारात्मक वातावरण आहे... ही सगळी संकटं म्हणजे, आपण आत्तापर्यंत केलेल्या अनेक चुकांचं प्रायश्चित्त आहे. पृथ्वीनं आपल्याला केलेली ही शिक्षा आहे. त्यामुळे वातावरणात उदासी तर आहेच. पण, गणपती बाप्पा आल्यानंतर अवघं वातावरण बदलेल. घरोघरी उत्साह आणि आनंद नांदेल. अर्थात, आपल्याला सतर्क राहायला हवं. मास्क घालून, सुरक्षित अंतर ठेवूनच एकमेकांच्या संपर्कात यायला हवं. ० 'बंदीश बँडीट्स'ला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. तुमचा हा अनुभव कसा होता? असे प्रोजेक्ट नेहमी येत नाहीत. यामध्ये भजन, ठुमरी, बंदीश, फ्युजन, फोक अशा सगळ्या प्रकारच्या गीतप्रकारांचा समावेश आहे. संपूर्णपणे संगीतावर आधारित अशी ही सीरिज असल्यानं संगीतप्रेमींना आवडतेय. विशेषतः तरूण वर्ग या सीरिजकडे आणि संगीताकडे सकारात्मकतेनं बघतोय. 'कट्यार'नंतर जशी महाराष्ट्रातील तरूण मुलं शास्त्रीय संगीताकडे वळली होती, तशी आता जगभरातली मुलं संगीताकडे नव्या दृष्टीनं बघतायत याचा आनंद आहे. बाप्पाकडे मागणं... बाप्पाकडे काय मागाल? असं विचारल्यावर, 'बाप्पाच्या आशीर्वादानं मला सर्व काही मिळालंय. पण, सगळीकडे पुन्हा एकदा शांती नांदू दे. प्रत्येकाला सुखी ठेव. २०२० या भयंकर वर्षातले अनुभव पुन्हा कधीही अनुभवायला लावू नकोस. ज्या मुलांना पोटभर जेवणही मिळत नाही त्यांना सगळं मिळू दे हे मात्र मागेन', असं ते म्हणाले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3j4NJYc