आपल्या मैत्रीला जवळपास १० वर्षं झाली आहेत. इतक्या वर्षांमध्ये, मी तुला फोन केला आणि तू माझा फोन उचलला नाहीस, असं कधीही झालं नाही. आपल्या मैत्रीला नेहमीच प्राधान्य दिलं याचा आनंद आहे. तू एक उत्तम मैत्रीण आहेस. तुझं प्राणीप्रेम मला आवडतं. नुसतंच प्राणी आवडतात असं न म्हणता, ते संकटात असताना तू ज्याप्रकारे त्यांच्या मदतीला धावून जातेस ते मला भावतं. तुझं 'अधीर मन' हे गाणं माझ खूप आवडतं आहे. आपण लवकरच एकत्र चित्रपटात काम करू ही इच्छा आहे. आहेस तशीच कायम राहा. तुला 'फ्रेंडशिप डे'च्या खूप शुभेच्छा!
- भूषण
जवळपास १२-१३ वर्षं आपण एकमेकींना ओळखतो. तू अतिशय संवेदनशील मुलगी आहेस. तू काही जणांना शिष्ट वाटतेस. पण, मला माहीत आहे, की तुझ्या वर्तुळातल्या माणसांची तू किती काळजी घेतेस ते. मी फक्त एखादी इच्छा बोलून दाखवायचा अवकाश, की तू काहीही करून माझी इच्छा पूर्ण करतेस. आपण एकमेकींना निर्णय घेण्यात कायमच मदत करतो. त्यामुळे तू माझा खूप मोठा आधार आहेस. माझ्या एक वर्ष आधी तू आई झालीस. तुझ्या आई होण्याच्या अनुभवाचा मला चांगलाच फायदा झाला. मी आई झाले, तेव्हा आईला लागणारी प्रत्येक गोष्ट तू मला बारीकसारीक विचार करुन दिलीस. तेव्हा मी खरंच नि:शब्द झाले होते. तुझ्यातली हुशार कलाकार मला खूप आवडते. दिग्दर्शकाला नेमकं काय हवंय हे ओळखून तुझ्या अभिनयातून तू ते देतेस. मी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा यात तुला कोणती भूमिका देता येईल, याचा विचार करते. तुला मी ती स्क्रिप्ट ऐकवण्यासाठी आतुर असते. कारण तू समोरच्याचं खूप छान ऐकून घेतेस. तडकाफडकी काही न बोलता शांतपणे तुझं मत मांडतेस. त्यामुळे तू एक आदर्श मैत्रीण आहेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.
- क्रांती
तू जसा स्क्रीनवर सगळ्यांना दिसतोस, तसाच स्वभावानं निरागस आहेस. आपण एकत्र असताना समोर नसलेल्या माणसाबद्दल खूप बोलतो. मला तुझ्यातला आवडणारा गुण म्हणजे, तू कामासाठी कायम तत्पर असतोस. आपलं शूट पहाटे २-३ वाजेपर्यंत चालतं. आम्ही सगळे 'बास, आता नको' असं म्हणत असतो. पण, तू कामासाठी कायम तत्पर असतोस. सेटवरच नव्हे, तर या संपूर्ण क्षेत्रात कोणाशी तुझं कधी भांडण, वादावादी झाल्याचं माझ्या माहितीत नाही. आपण रोजच्या रोज तासनतास फोनवर बोलतो किंवा मेसेजवर बोलतो असं नाही. कामापुरतं फोनवर बोलतो. पण, जेव्हा समोर येतो तेव्हा खूप धमाल करतो. भाऊ, तू आहेस तसाच राहा.
- भारत
'फ्रेंडशिप डे'च्या खूप खूप शुभेच्छा! तू घरात फार मराठी बोलत नसलास, तरी तुझ्या आवाजातलं कुठलंही गाणं ऐकलं, की मधात बुचकळून काढलेल्या तुझ्या गोड आवाजाआधी मला कायम कौतुक वाटतं ते तुझ्या मराठी शब्दोच्चारांचं! परस्परविरोधी गोष्टी एकाच माणसात एकत्र सुखानं नांदत असल्याचं, तू एक उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहेस!!तुला खेकडे खायला प्रचंड आवडतं, पण बनवता येत नाहीत. आमच्यासाठी उत्कृष्ट काँटिनेंटल ब्रेकफास्ट तू बनवतोस अन् स्वतःसाठी मात्र कालचा उपमा परत मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेतोस. आपल्या दोघात केवळ तू गाण्यातच पुढे नाहीयेस, तर ओसीडी प्रॉब्लेम्समध्येही तूच अव्वल आहेस. महत्प्रयासाने तुला रस्त्यावरची पाणीपुरी खायला तयार केलं, की पाणीपुरीवाल्याचे हात मी धुऊन घेईपर्यंत, तू केमिस्टकडून सॅनिटायझर विकत घेऊन येताना दिसायलाच हवास! तुझ्याबद्दल अनेक तक्रारी आहेत. आपला फेसबुकवर एकत्र फोटो टाकताना स्वतःची जॉ लाइन नीट दिसत असलेला फोटो बरोब्बर निवडतोस. परंतु त्यात मी पोट आतमध्ये घ्यायला विसरलोय हे तुझ्या लक्षातसुद्धा येत नाही.
असो! म्हणतात ना... तुम्ही तुमचा मित्र निवडू शकता, परंतु सख्खा भाऊ नाही. म्हणूनच या इंडस्ट्रीमध्ये मी तुझ्याहून चांगले खूप मित्र निवडले. परंतु, प्राक्तनानं ह्या इंडस्ट्रीमधील सख्खा भाऊ म्हणून माझ्या नशिबी तुलाच टाकलं, तर त्याला तू तरी काय करणार? थोडक्यात, आपण एकमेकांना सहन करण्याचा क्रॅश कोर्स वारंवार करायला हवा. मध्यंतरी लेहची ट्रिप करून तो छान झालाही होता. परंतु, या दुर्दैवी करोनानं आपली दक्षिणेची ट्रिप रद्द केली. ती लवकरात लवकर घडो हीच आई एकविरेचरणी प्रार्थना!
- अवधूत
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PcdkS5