प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या आणि प्रसिद्धीपासून दूर राहून आपापल्या कार्यक्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या विविध क्षेत्रांतील व्यक्तिरेखांच्या जीवनावरील ‘बायोपिक’ गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत सातत्याने येताना दिसतात. हे चरित्रपट व्यावसायिक हिंदी चित्रपटांच्या चौकटीत राहून तयार केले असल्यामुळे सुरुवातीला ‘डिस्क्लेमर’ची पाटी टाकून संबंधित व्यक्तीच्या जीवनातील काही तथ्यांचा, प्रसंगांच्या आधारे हा सिनेमा फुलवला जातो. संबंधित व्यक्तीचं आयुष्य नक्की शंभर टक्के असंच होतं, हे असे चरित्रपट सांगत नाहीत; पण त्या व्यक्तीच्या आयुष्याची, कर्तृत्वाची गोळाबेरीज नक्की मांडतात. देश-विदेशात ख्याती मिळणाऱ्या गणितज्ज्ञ शकुंतलादेवींच्या आयुष्यावरील अनू मेनन दिग्दर्शित ‘शकुंतलादेवी’ हा सिनेमा असाच एका यशस्वी व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याचा पट आपल्यासमोर मांडतो. विद्या बालनने जीव ओतून साकारलेली शकुंतलादेवी, गुंतवून ठेवणारी पटकथा आदी वैशिष्ट्यांमुळे ‘शकुंतलादेवी’ एकदा अनुभवावा असा आहेच. काही ठिकाणी तो निश्चितच ‘फिल्मी’ होतो; पण सिनेमासाठी व्यावसायिक चौकटीचीच निवड केल्यामुळे हे फिल्मी असणं काहीसं दूर ठेवणं जास्त श्रेयस्कर ठरतं. बेंगळुरूमध्ये जन्मलेल्या शकुंतलादेवी (विद्या बालन) कथेच्या केंद्रस्थानी आहेत. लहानपणापासूनच गणितामध्ये विशेष रुची असलेल्या; पण गणिताचं किंवा कोणतंच शालेय शिक्षण न घेताही देश-विदेशातील विद्यापीठात प्रशंसा मिळवलेल्या शकुंतलेच्या लहानपणापासून सिनेमा सुरू होतो. वर्तमानकाळ-भूतकाळ अशी सांगड घालत या महिलेनं काय आयुष्य जगलं त्याची गोष्ट आपल्याला सांगितली जाते. अगदी लहानपणी शकुंतलेच्या या विद्वत्तेचा हलाखीच्या परिस्थितीमुळे कुटुंबाकडून होणारा सोयीस्कर वापर, लंडनमध्ये गेल्यावर तिचा संघर्ष, तिच्या आयुष्यात येणाऱ्या विविध व्यक्ती, भारतात परतल्यावर झालेलं लग्न आणि एका मनस्वी स्त्रीचं आई होणं, पुढे आई-मुलगी असं निर्माण होणारं नातं, या नात्यामध्ये येणारी वळणं, करिअर का कुटुंब यामध्ये झालेली द्विधा मनस्थिती अशा अनेक टप्प्यांवरून सिनेमा पुढे सरकतो. १९८२ मध्ये शकुंतला यांनी १३ अंकांचा गुणाकार केवळ २८ सेकंदांत सांगून नोंदवलेल्या ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या विक्रमासह विविध विक्रमांची, विदेशी विद्यापीठात झालेल्या कौतुकाची, अवघड गणितांची कम्प्युटच्या तुलनेत लवकर दिलेलं उत्तर असे शकुंतलादेवींच्या प्रतिभेचे आविष्कार सिनेमा आपल्यासमोर मांडतो. दुसरीकडे एक अल्लड मुलगी, विवाहित स्त्री, कुटुंबीयांना दूर लोटून जगभर भ्रमण करणारी आई, नवरा आणि मुलीसोबतचे मतभेद अशा शकुंतलादेवींच्या वैयक्तिक आयुष्यातील टप्प्यांवरही प्रकाश टाकला जातो. अनेक दशकांचा प्रवास ‘पास्ट-प्रेझेंट’ पद्धतीने मांडला जातो. ‘मानवी संगणक’ म्हणल्या जाणाऱ्या शकुंतलादेवींच्या आयुष्यातील एक गणितज्ज्ञ, ज्योतिषी, लेखिका, बासरी वादक आदी पैलूंचा ओझरता उल्लेख येतो. इंदिरा गांधींविरोधात निवडणूक लढवल्याचे संदर्भही येतात. मात्र, हा मोठा पट मर्यादित कालावधीमध्ये बसण्यासाठी अनेक घटना, प्रसंग झरझर पुढे सरकतात. त्यात रेंगाळणं येत नाही हे मान्य; पण त्यामुळे शकुंतलादेवींचे आयुष्य विस्तारानं समजू शकत नाही. किंबहुना त्यांच्या दैवी गणिती कौशल्यापेक्षा मतभेद-मनभेदावरच जास्त ‘फोकस’ केल्यासारखं वाटतं. पती परितोष (जिशू सेनगुप्ता), मुलगी अनुपमा (सान्या मल्होत्रा), जावई अभयकुमार (अमित साध) या घरच्यांसोबतच्या संबंधात सिनेमातील अवकाश जास्त व्यापला जातो, असं वाटतं. शकुंतलादेवी यांचं व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्य एकमेकांच्या हातात हात घालूनच असल्यामुळं या मतभेद-मनभेदांच्या चित्रीकरण काहीसं कमी करून त्यांच्या गणिती कौशल्यावर ‘फोकस’ करायला हवा होता, असं वाटत राहतं. नेहमीप्रमाणेच भूमिकेत जीव ओतून ती साकारते. सिनेमा पाहताना तिनेच आधी केलेल्या काही सिनेमांची आठवण येते आणि हा अभिनय साचेबद्ध तर होत नाही ना, असा प्रश्न पडतो. जिशू सेनगुप्ता, सान्या मल्होत्रा, अमित साध, प्रकाश बेलवडी आदी व्यक्तिरेखा आपापल्या व्यक्तिरेखांना योग्य न्याय देतात. सचिन-जिगरची गाणी ‘रेट्रो मूड’ अचूक पकडतात. मात्र, ती चित्रपट वगळून स्वतंत्र किती लक्षात राहतील हा निराळा मुद्दा. शकुंतलादेवींचे कर्तृत्व, त्यांची विलक्षण प्रतिभा आजच्या पिढीपुढे मांडण्यासाठी केलेली ही ‘गोळाबेरीज’ एकदा अनुभवायला काहीच हरकत नाही. शकुंतलादेवी आणि त्यांची प्रतिभा यांचं महत्त्वं खरच आपल्याला कळलं का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. चित्रपटाचे नाव : शकुंतलादेवी निर्माता : विक्रम मल्होत्रा पटकथा : अनू मेनन, नयनिका महतानी संवाद : इशिता मोइत्रा दिग्दर्शक : अनू मेनन संगीत : सचिन-जिगर कलाकार : विद्या बालन, अमित सध, सान्या मल्होत्रा, जिशू सेनगुप्ता ओटीटी : अॅमेझॉन प्राइम दर्जा : साडेतीन स्टार
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/316g6h5