Full Width(True/False)

जोतिबाच्या नावानं चांगभलं; कोल्हापुरच्या चित्रनगरीत पुन्हा एकदा लाइट, कॅमेरा, अॅक्शन

कोल्हापूर: जोतिबाच्या नावानं चांगभलं! असा गजर झाला अन् चित्रनगरीत पुन्हा एकदा बहर येण्याचा जणू संकल्पच झाला. अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनच्या वतीनं 'दख्खनचा राजा जोतिबा' या धार्मिक मालिकेच्या चित्रीकरणासाठी कोल्हापूरच्या चित्रनगरीत लगबग सुरू झाली. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी जो सेट उभारण्यात येणार आहे, त्याचा भूमिपूजन समारंभ अभिनेते महेश कोठारे यांच्या उपस्थित काही दिवसांपूर्वीच झाला. यावेळी आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे,नलिनी कोठारे, संतोष फुटाणे आणि कोल्हापूर चित्रनागरीचे कार्यकारी संचालक संजय पाटील उपस्थित होते. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट, मालिका यांच्या निर्मितीला मरगळ आली असताना कोल्हापुरात नव्या मालिकांच्या चित्रीकरणाला गती येत आहे. या नव्या बदलांमुळे कोल्हापुरात पुन्हा चित्रीकरणांना बहर येण्याची चिन्हं स्पष्ट झाली आहेत. सध्या कोल्हापुरात तीन मालिकांचं चित्रीकरण सुरू आहे. आता सलग चार वर्षे चित्रीकरण होणाऱ्या या नव्या मालिकेची भर पडली आहे. येत्या काही दिवसात हिंदी आणि मराठी वेब सीरिजचंही चित्रीकरण कोल्हापुरात सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर चित्रनगरीत लाइट, कॅमेरा, अॅक्शनचा आवाज घुमत राहणार आहे. पूर्वी बहुतांश मराठी चित्रपटांचं चित्रीकरण हे कोल्हापुरातच व्हायचं. मध्यंतरी त्यामध्ये थोडासा खंड पडला होता. आता मात्र पुन्हा तो सुवर्णकाळ परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड 'जय मल्हार' या बहुचर्चित मालिकेनंतर 'दख्खनचा राजा जोतिबा' ही नवी धार्मिक मालिका प्रेक्षकांसमोर येत आहे. यासाठी दोन एकर परिसरात भव्य सेट उभारण्यात येणार आहे. कोल्हापूर पुन्हा एकदा चित्रीकरणांसाठी सज्ज होत असून, यामुळे अनेक स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञांना काम मिळणार आहे. चित्रनगरीतील मोकळी जागा आता चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. शिवाय चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अनेक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोल्हापुरात कोणत्याही कामाची सुरुवात 'जोतिबाच्या नावानं चांगभलं' असं म्हणत केली जाते. आता कोल्हापुरातील चित्रीकरणाची सुरुवातही नव्या उत्साहानं झाल्यामुळे सिनेनिर्मात्यांनाही नवा पर्याय मिळाला आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी, सर्व नियमांचं पालन करत कोल्हापुरात पुन्हा एकदा चित्रीकरणाच्या नावानं चांगभलं होणार आहे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gYHsf0