कल्पेशराज कुबल kalpeshraj.kubal@timesgroup.com अभिनेत्री मौनी रॉयनं तिच्या अभिनय प्रवासाची सुरुवात हिंदी टीव्ही मालिकांपासून केली. छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत असलेला हा चेहरा पुढे हिंदी सिनेमांमध्ये सहाय्यक भूमिकेत दिसू लागला. आता हा चेहरा हिंदी सिनेविश्वात स्वतःचं विशिष्ट स्थान निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मौनी रॉय उत्तम अभिनय करू शकते, हे 'लंडन कॉन्फिडेन्शिअल' पाहिल्यावर लक्षात येतं. मौनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटातील तिचा आणि सहकलाकारांचा अभिनय वगळल्यास चित्रपट तुमची निराशा करतो. 'लंडन कॉन्फिडेन्शिअल'चा ट्रेलर पाहून असं वाटतं की, जागतिक वैद्यकीय क्षेत्राबद्दल आणि दोन देशांशी संबंधित एका खळबळजनक कटाची गोष्ट दिग्दर्शक यातून सांगणार आहे. हा कट म्हणजे एक सत्यदेखील असू शकतं. आज भारत-चीन सीमेवरही तणावाचं वातावरण आहे. करोनाच्या भयंकर विषाणूशी लढताना भारतासह जगभरातले बहुतांश देश चीनच्या नावानं शंख करताहेत. हेच वास्तववादी संदर्भ सिनेमाची पार्श्वभूमी म्हणून वापरण्यात आले आहेत. पण, एक चित्रपट म्हणून आवश्यक असलेली या संदर्भांच्या पुढची रंजक कथा मात्र यात नाही. एखाद्या वेब सीरिजचा दीर्घांक म्हणून आणखी तासभर लांब असलेला एखादा चित्रपट आपण पाहतोय की काय असं वाटू लागते. कारण, चित्रपटाची गोष्ट कुठल्याही ठाम निष्कर्षापर्यंत पोहोचतच नाही. करोना साथीच्या उत्तरार्धाच्या काळात चित्रपटाची गोष्ट सुरू होते. भारतीय गुप्तचर यंत्रणेतील हेर लंडनमध्ये एका प्रकरणाच्या मागावर असतात. तेथील भारतीय दूतावास कार्यालयातून सोबतच गुप्तचर यंत्रणेच्या विशिष्ट गुप्त ठिकाण्यावरून हेरगिरीचं हे काम सुरू असतं. सात दिवसांनंतर लंडनमध्ये एक जागतिक संमेलन आयोजित करण्यात आलेलं असतं, ज्यात विविध देशांचे अधिकारी उपस्थित राहणं अपेक्षित असतं. चीनकडून आगामी काळात होणाऱ्या एका जैविक रोगाच्या प्रसाराचा पर्दाफाश भारतीय गुप्तचर यंत्रणेला याच संमेलनात करायचा असतो. या प्रकारात भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या लंडन येथील टीमचं नेतृत्व उमा (मौनी रॉय) करत असते. उमाच्या टीममधील एक भारतीय हेर, ज्याच्याकडे संबंधित प्रकरणाची माहिती असते, तो चिनी गुप्तचर संस्था एमएसएसच्या हाती लागतो. आता उमाची टीम हे प्रकरण कसं सोडवते? हे या चित्रपटाच्या उत्तरार्धात दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला या कथेकडून खूप अपेक्षा निर्माण होतात. परंतु, पटकथेची सुमार मांडणी, गोष्ट पडद्यावर प्रभावीपणे मांडण्याचे दिग्दर्शकाचे फोल ठरलेले प्रयत्न यामुळे चित्रपट अपेक्षित उंची गाठू शकत नाही. जे काही बघण्यासारखं शिल्लक राहतं ते म्हणजे कलाकारांचा अभिनय आणि संवादफेक. सिनेमाच्या कथानकात गोळीबार किंवा इतर 'स्पाय' चित्रपटांप्रमाणे अॅक्शन नसली, तरी दिग्दर्शकाला गोष्ट अधिक रोचक करून दाखवता आली असती. पण, तसं घडत नाही. कथानकातील एकच धागा आहे, तो म्हणजे एक भारतीय व्यक्ती गद्दार असते व त्यावरच संपूर्ण चित्रपट शेवटपर्यंत बेतलेला आहे. ही व्यक्ती कोण? आणि ती असं का करत असते? हे जाणून घेण्यासाठी एकदा चित्रपट पाहण्यास हरकत नाही. सर्व कलाकारांची कामं उत्तम आहेत. सिनेमा दिसायलाही आखीवरेखीव आहे. मात्र सिनेमाचे व्हीएफएक्सदेखील कथानकाप्रमाणेच सुमार आहेत. सिनेमा : लंडन कॉन्फिडेन्शिअल निर्माता : मोहित छाब्रा, अजय राय दिग्दर्शक: कंवल सेठी लेखन : एस. हुसेन झैदी कलाकार : मौनी रॉय, पुरब कोहली, कुलराज रंधावा, सागर आर्य संगीत : संकेत नाईक ओटीटी : झी५ दर्जा : दोन स्टार
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cgCLwm