खरं तर सद्यस्थितीत आपल्या सर्वांनाच सकारात्मकतेची गरज आहे. आपण सगळेच म्हणतोय, की हे वर्ष संपू दे. हे वर्ष खूप वाईट गेलं आहे. अनेक दिग्गज मंडळी आपण गमावली. हे सगळं जरी खरं असलं, तरीही मला कुठल्याही परिस्थितीत सकारात्मकता शोधायला आवडते. मला असं वाटतं की, कोणत्याही परिस्थितीच्या दोन बाजू असतात. सद्यस्थितीची दुसरी बाजू नक्कीच सकारात्मक आहे. कामानिमित्त मी सतत घराबाहेर असायचे. काम करणं, सतत चित्रीकरण करणं, सुट्ट्या मिळाल्या की ''ची काम करणं आणि उरलेल्या वेळेत मैत्रिणींबरोबर काहीतरी प्लॅन करणं, असं सगळं सुरूच होतं. घरी राहणं किंवा घरच्यांना वेळ दिला जात नव्हता. कुठे तरी घर, घराप्रती असलेली जबाबदारी, घरातली माणसं, संसाधनांचा अतिवापर, पर्यावरणाची नासधूस या सगळ्या गोष्टी आपण गृहित धरायला लागलो होतो. यावर देवानं असा विचार केला असेल, की हे काही असं थांबणाऱ्यातलं नाही. काहीतरी मोठं घडायला हवं. म्हणून आपल्या आयुष्यात आला. म्हणजे बघा ना, एरवी घरात न राहणारी माणसं आता, घरात किती आणि काय सामान लागतं हे बघायला लागली. सतत घड्याळामागे धावणाऱ्या जगाला सक्तीची विश्रांती मिळाली. या संकटामुळे आयुष्याची आणि तब्येतीची कळलेली किंमत, घरच्या व्यक्तींमधलं कमी झालेलं अंतर, घरातलं पौष्टिक खाणं खायची झालेली सवय हे चांगलंच झालं. सगळेच घरी असल्यामुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान कमी झालं. प्रकृतीला दिलेली विश्रांती, वैयक्तिक स्वातंत्र्याची कळलेली किंमत हे सगळं माझ्या दृष्टीनं, सक्तीनं का होईना पण होणं गरजेचं होतं. या लॉकडाउनमध्ये, एक कलाकार म्हणून माझ्या शरीराला विश्रांतीची किती गरज होती हे कळलं. कधी-कधी काही शारीरिक किंवा बौद्धिक कामं न करणं हे उत्तम आरोग्यासाठी किती गरजेचं असतं हे यामुळे समजलं. आपल्या अवतीभवती, आपल्यावर अवलंबून राहणाऱ्या मुक्या प्राण्यांचीसुद्धा काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे हे शिकवलं. आपण म्हणजे निसर्ग नाही, तर आपण सगळे जण निसर्गाचा भाग आहोत हे शिकलो. जगात किती वाईट गोष्टी आहेत, याचा एक व्यक्ती म्हणून विचार करुन त्रास करुन घेण्यापेक्षा, ही स्थिती मला काय शिकवण्याचा प्रयत्न करत आहे याचा विचार सतत मी करत असते. मला असं वाटतं की, कुठल्याही परिस्थितीत व्यक्तीनं असाच विचार करणं गरजेचं आहे. जगाला तुमच्या सकारात्मक विचारांमधून घडणाऱ्या छोट्या बदलांची गरज आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oJou1c