Full Width(True/False)

सिनेरिव्ह्यू: खाली पीली

चार घटका करमणुकीचे उद्दिष्ट ठेवून प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्याचं काम करणारे अनेक सिनेमे आपल्याकडे येऊन गेले. या सिनेमांमध्ये फार काही ग्रेट नसतं; पण ते टाइमपास नक्की करतात. लॉजिकचा विचार फारसा न करता पडद्यावर सातत्यानं होणार ‘हॅपनिंग’ फक्त प्रेक्षकाने एन्जॉय करावं, हाच या सिनेमांचा हेतू असतो. मक्बूल खान दिग्दर्शित ‘’ याच प्रकारातील. वारंवार वापरलेला फॉर्म्युला इथे थोडाफार ‘ट्विस्ट’ करून पुन्हा दिसतो. अशा प्रकारातील असंख्य देश-विदेशातील सिनेमे आपण पाहिल्यामुळे त्यांचा शेवट काय होणार, हे आपल्याला आधीच माहिती असतं. त्यामुळे सिनेमाच्या मांडणीत काहीही नावीण्य राहत नाही. अगदीच वेळ जात नसेल तर ‘खाली पीली’ बघायला हरकत नाही. पाठशिवणीचा खेळ इथे रंगतो. टिपिकल मसालापट म्हणून सिनेमाकडे पाहायला हवं. विजय चौहान उर्फ ब्लॅकी () हा मुंबईमध्ये टॅक्सी ड्रायव्हर आहे. टॅक्सीचालकांचा संप सुरू असतानाही तो रात्री मुंबईत व्यवसाय करीत आहे, ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारून प्रवासी वाहतूक करीत आहे. त्याच रात्री वेश्या व्यवसाय वस्तीत लहानाची मोठी झालेली पूजा () ब्लॅकीच्या टॅक्सीमध्ये बसते. पूजाचे बळजबरीने लग्न लावून देण्यात येणार असते. मात्र, तेथून पूजा पळून आलेली आहे. सोबत पैसे, दागिन्यांनी भरलेली भरगच्च बॅग तिच्याकडे आहे. ‘तुला हवे तितके पैसे घे’,असे म्हणून पूजा ब्लॅकीला टॅक्सी पळवण्याची विनंती करते आणि मग त्यानंतर सुरू होतो तो एक पाठशिवणीचा खेळ. ब्लॅकी आणि पूजा यांच्या आयुष्याचा भूतकाळ काय आहे? सिनेमात खलनायक असणारी युसूफ चिकना (जयदीप अहलावत) चोक्सी भाई (स्वानंद किरकिरे) या दोन्ही व्यक्तिरेखांचा आणि ब्लॅकी-पूजाचा काय संबंध आहे? अशा प्रश्नांची उत्तरे मांडणारी एक गोष्ट दिग्दर्शक ‘पास्ट-प्रेझेंट’चा खेळ रंगवून मांडतो. ब्लॅकी आणि पूजाचे पुढे काय होते? पूजाच्या शोधात असणारा युसूफ पुढे काय करतो? या प्रश्नांच्या उत्तरासाठी ‘खाली पीली’ बघायला हवा. रोमान्स, अॅक्शन, कॉमेडी अशी सगळी भेळ एकत्र करून सिनेमा रंगवला जातो. त्याची मांडणी काहीशी वेगवान आहे. प्रेक्षक त्यांत गुंतूनही राहतो. मात्र, एका विशिष्ट टप्प्यावर या प्रकारच्या ‘रोड मुव्ही’मध्ये काय घडते, तेच येथेही घडते. काहीतरी फसवाफसवी करून निघालेले नायक-नायिका, पाठलाग करणारे पोलिस, नायक-नायिकांच्या मागे लागलेले खलनायक असा सारा प्रकार इथे येतो. नव्वदच्या आणि त्यापुढच्या दशकात आलेल्या अनेक सिनेमांची कॉपी येथे केली जाते. कथानकात काहीसा ‘ट्विस्ट’ येतो. सतीश कौशिक, झाकिर हुसैन यांचे काही विनोदी सिक्वेन्स आहेत. मात्र, त्यातही काही नावीण्य नाही. दिग्दर्शकाची सिनेमावर पकड निश्चित आहे. सिनेमाचा वेग राखण्यातही तो यशस्वी ठरला आहे, यात शंका नाही. मात्र, एकूणच सिनेमाच्या गोष्टीत फारसा दम नसल्याने ‘खाली पीली’चा प्रभाव मर्यादित राहतो. ईशान खट्टरचा ब्लॅकी ‘अँग्री यंग मॅन’ साकारणाऱ्या अनेक अभिनेत्यांची भ्रष्ट नक्कल आहे. तरीही त्याचा पडद्यावरचा वावर निश्चित सहन होतो. अनन्या पांडेही ठीकठाक. जयदीप अहलावत, स्वानंद किरकिरे, सतीश कौशिक यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहेच. छोट्याशा भूमिकेत ही लक्षात राहतो. रांगडा खलनायक त्याने उत्तमपणे साकारला आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत वेगवान आहे. मात्र, गाण्यांना स्कोप नाही. विशाल-शेखरची घुसडलेली गाणी लक्षात राहणार नाहीत. सिनेमाच्या नावातच खरं तर सिनेमाचं सार सामावलेले आहे. पाठशिवणीचा मसालापट ‘ठीक’ कॅटेगिरीतला आहे. निर्माता : अली अब्बास जाफर, हिमांशु मेहरा, झी स्टुडिओज लेखन : यश केसरवाणी, सीमा अग्रवाल दिग्दर्शन : मक्बूल खान संगीत : विशाल-शेखर कलाकार : ईशान खट्टर, अनन्या पांडे, जयदीप अहलावत, स्वानंद किरकिरे, सतीश कौशिक, सुयश टिळक ओटीटी : झी फाइव्ह : झीप्लेक्स दर्जा : अडीच स्टार पाहा ट्रेलर:


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cUVkXc