मुंबई- कॉमेडियन सध्या ड्रग्ज कनेक्शनमुळे चर्चेत आली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) भारतीच्या घरावर छापा टाकला असता त्यांना तेथून गांजा मिळाल्याचं वृत्त आहे. सिनेसृष्टीतील नावाजलेली कॉमेडियन आणि आपल्या कष्टाने यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या भारतीचं बालपण मात्र फार खडतर होतं. ती दोन वर्षांची असताना वडिलांचं निधन झालं होतं. तिचं संपूर्ण बालपण गरिबीत गेलं. एका मुलाखतीदरम्यान, भारतीने तिच्या बालपणाबद्दल सांगितलं. ती म्हणाली की, 'मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, आम्ही एकूण चार भावंडं आहोत. माझ्या आईचं वयाच्या १७ व्या वर्षी लग्न झालं होतं आणि २३ वर्षांची असताना ती तीन मुलांची आई होती. असं कोणाला सांगितलं तर कोणाचाही विश्वास बसणार नाही.' भारतीचं बालपण फार संघर्षमयी होतं. भूतकाळातील आठवणींना उजाळा देताना तिने सांगितलं होतं की, 'माझ्या मोठ्या भावाचा आणि बहिणीचा बहुतेक वेळ आमच्यासाठी जेवण करण्यात आणि छप्पर बनवण्यातच जायचा. आम्हाला त्यावेळी पुरेसं अन्नही मिळत नव्हतं.' पण म्हणतात ना की वेळ बदलली की सारं काही बदलतं. २००८ मध्ये 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या चौथ्या सीझनमध्ये भारतीने भाग घेतला. यानंतर तिचं आयुष्य पुरतं बदलून गेलं. या शोमध्ये भारतीने 'लल्ली' नावाचं एक कॅरेक्टर केलं होतं. या कॅरेक्टरने तिला एका रात्रीत स्टार केलं. या शोनंतरच भारतीच्या करिअरला दिशा मिळाली. आज ती सिनेसृष्टीत 'लाफ्टर क्वीन' म्हणून राज्य करत आहे. एकेकाळी उपाशी पोटी झोपणारी भारती आज जवळपास १०.९३ कोटी संपतीची मालक आहे. २०१९ मध्ये फोर्ब्सच्या यादीमध्ये भारती सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये ८२ व्या स्थानावर होती. सध्या भारती 'इंडियाज बेस्ट डान्सर' आणि 'द कपिल शर्मा शो' या शोमधून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3flUYdF