मुंबई टाइम्स टीम करोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून सर्वांना घरात बसावं लागलं आहे. कामासाठी जेमतेम जाता येत असताना भटकंतीचा विचारही मनात येणं अशक्य. पण, कलाकारांची बातच वेगळी. त्यांना कामानिमित्त शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं. शूटिंगला परवानगी मिळाल्यानंतर अनेकांनी आधी आपापल्या चित्रपटांची, वेब सीरिजची शूटिंग पूर्ण करून घेतली. त्यानंतर काही जण पर्यटनाचा आनंद लुटताना दिसताहेत. बी-टाऊनचे अनेक कलाकारांनी व्हेकेशन मोड ऑन असं म्हणत मध्य-पूर्वेकडील देश, गोवा तसंच मालदीवला जाऊ लागलेत. विशेषत: मालदिवचा निळाशार समुद्र त्यांना भुरळ घालताना दिसतोय. न्यू नॉर्मलमध्ये हे बॉलिवूड कलाकारांचं आवडतं डेस्टिनेशन बनतंय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कतरिना कैफ लॉकडाउनच्या काळात बॉलिवूडचे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्कात होते. अभिनेत्री कतरिना कैफनं लॉकडाउनचा बराच काळ घरात, घराच्या गच्चीवर घालवला. अलीकडेच ती शूटिंगकरीता मालदीवला रवाना झाली होती. सुरक्षिततेच्या सर्व नियमांचं पालन करत तिनं मालदीवच्या निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. अलाया फर्निचरवाला सप्टेंबर महिन्यादरम्यान अभिनेत्री अलाया फर्निचरवालानं सुट्टी घालवण्यासाठी गोव्याची निवड केली. शिवाय दुबईला जाऊन तिनं जवळच्या मित्राच्या वाढदिवसालाही हजेरी लावली. गोव्याच्या सुट्टीदरम्यानच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला. विरुष्का दुबईत लाखो चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा आयपीएलच्या निमित्तानं दुबईला गेले होते. विरुष्का लवकरच आई-बाबा होणार असून त्या दोघांनी दुबईत एकत्र वेळ घालवल्याचं पाहायला मिळालं. मौनीला आवडली दुबई अभिनेत्री मौनी रॉयनं देखील मालदीवच्या निळ्या आणि शांत समुद्राचा आनंद घेतला. कुटुंबासोबत एकत्र सुट्टी घालवण्यासाठी तिनं दुबईची निवड केली. अभिनेत्री राधिका आपटे सध्या युकेमध्ये राहत असून तिलासुद्धा समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवण्याचा मोह आवरला नाही. गो'वा' अभिनेत्री सारा अली खान तिच्या वाढदिवसानिमित्त गोव्याला गेली होती. यासोबत अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या बहिणींसह मालदीव बेटांवर फिरताना आणि सुट्टीचा आनंद लुटताना पाहायला मिळाली. स्कुबाडायव्हिंगचा आनंद आई-वडीलांच्या लग्नाच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि तिचं कुटुंब एकत्र मालदीवला गेलं होतं. रकुलनं स्कुबाडायव्हिंगचा भरपूर आनंद घेतला. अलीकडेच विवाहबंधनात अडकलेले अभिनेत्री काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांनी हनिमूनसाठी मालदीवची निवड केली. अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता आदर जैन यांनी ताराच्या वाढदिवसानिमित्त मालदीव गाठलं. सुट्टी आनंदात अभिनेत्री दिशा पटानी बी-टाऊनची फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाते. मागील काही दिवसांमध्ये दिशा आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी मालदीवला जाऊन सुट्टीचा आनंद घेतला. अभिनेत्री शिवानी दांडेकर आणि लेखक-अभिनेता फरहान अख्तर यांनी अलीकडेच स्कुबाडायव्हिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानंदेखील मालदीवमध्ये सुट्टी घालवतानाचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले असून, त्याला चाहत्यांकडून हजारो लाइक्स मिळत आहेत. संकलन - तेजल निकाळजे, साठ्ये कॉलेज.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39p4BqR