Full Width(True/False)

oscar 2021: व्हर्चुअल नव्हे तर 'असा' रंगणार ऑस्कर सोहळा

वृत्तसंस्था: लॉस एंजेलिस करोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२१चा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा व्हर्चुअल माध्यमातून आयोजित केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, हा सोहळा डिजिटल नाही, तर कलाकारांच्या उपस्थितीतच करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ‘अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेज’ आणि ‘एबीसी चॅनेल’ यांनी दिली आहे. विषाणूमुळे उद्भवलेल्या महामारीच्या संकटामुळे ऑस्कर पुरस्कार व्हर्चुअली करण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, पुरस्कार समितीच्या प्रतिनिधीने ‘व्हरायटी’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले, की ऑस्कर पुरस्कार सोहळा तारे-तारकांच्या उपस्थितीतच होईल. जगभरात करोना संसर्गाचा फैलाव झाल्यामुळे जून महिन्यात अकादमीने २०२१चा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा २५ एप्रिल रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते. पुढील वर्षी होणारा हा सोहळा तब्बल आठ आठवडे उशिराने होणार आहे. तसेच, फीचर फिल्म विभागातील चित्रपटांना २८ फेब्रुवारी २०२१पर्यंत सहभागी होण्याची मुदत मिळाली आहे. ऑस्करच्या परंपरेनुसार पुरस्कार वितरण सोहळा लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित होतो. या थिटएरची आसन क्षमता साडेतीन हजारांची आहे. अकादमीच्या सदस्यांनी या थिएटरची नुकतीच पाहणी केली असल्याचे सांगितले. या सोहळ्याला प्रत्यक्ष किती कलाकारांना उपस्थित राहण्याची संधी मिळू शकेल, याबाबत अद्याप अनिश्चितता असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे लागेल, याबाबत सध्या माहिती नसल्याचे सांगितले. सप्टेंबरमध्ये झालेला एमी पुरस्कार सोहळा हा झूमवर रंगला होता, तर काही कलाकारांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले होते. ऑस्करप्रमाणेच ग्लोडन ग्लोब (२८ फेब्रुवारी), क्रिटिक्स चॉइस (मार्च ७), सॅग (मार्च १४) आणि बाफ्टा (एप्रिल ११) पुरस्कार पुढील वर्षात होणार आहेत. त्यापैकी गोल्डन ग्लोब हे बिर्वली हिल्स येथून थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qqj7EG