Full Width(True/False)

प्रजासत्ताक दिन कसा साजरा करावा..? कलाकार म्हणतात...

अभ्यासक्रमात हवं संविधानप्रजासत्ताक दिनाचं महत्त्व आपल्याला हल्ली जाणवेनासं झालंय. तीन वर्षं दिल्लीत असताना थंडीत लवकर उठून परेड बघायला जायचो. ते माझ्या आयुष्यातले प्रजासत्ताक दिनाचे विलक्षण आणि अविस्मरणीय अनुभव आहेत. करोनाकाळात संपूर्ण जग थांबलेलं असताना आपला देश आपल्या घटनेमुळे, संविधानामुळे पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू होऊ शकला. शालेय अभ्यासक्रमात इतर विषयांच्या मानाने नागरिकशास्त्र हे केवळ १० गुणांसाठी शिकवला गेल्यानं कदाचित घटना कशी आहे, ती अशी का आहे याचं अज्ञान पाहायला मिळतं. त्यामुळे किमान माध्यमिक शाळेपासून आपल्या देशाचे संविधान अभ्यासक्रमात यायला हरकत नाही असं मला वाटतं. यामुळे या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व जास्त अधोरेखित होईल. - , अभिनेता ध्वजारोहणाला उपस्थितीप्रजासत्ताक दिनादिवशी ध्वजारोहणाचा कार्यक्रम मी कधीही चुकवत नाही. शुटिंगसाठी बाहेर असले तरीही त्या ठिकाणी जिथे ध्वजारोहण होणार असेल तिथे मी जाते. आपल्या देशाबद्दल ओतप्रोत अभिमानानं ऊर भरून येणारे हे क्षण मला खूप आवडतात. देशाविषयी आदरानं विचार करण्याचा आणि केलेल्या बलिदानाचं स्मरण करण्याचा हा हक्काचा दिवस आहे. यावर्षी अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना आपण प्रजासत्ताक दिनी सलाम करू या. त्यांच्या कार्यामुळे यंदा आपण त्याच उत्साहात आणि सुरक्षिततेनं साजरा करू शकतोय. - मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री हक्कांसह जबाबदाऱ्याही महत्त्वाच्याआपण आपल्या भारतीय संविधानाप्रमाणे खरंच वागतो का, आपल्या घटनेचा आदर करतो का, देशामधील कायद्याचे आपण पालन करतो का असे अनेक प्रश्न मला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पडतात. आपल्या संविधानाबद्दल तपशीलवार ज्ञान प्राप्त करून घेणं ही भारतीय नागरिक म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे. केवळ हक्कांचा विचार न करता जबाबदाऱ्यांचंही भान जपणं महत्त्वाचं आहे. प्रजासत्ताक दिन, संविधान, घटना याचा आदर ठेवला जात नाही याचं मला प्रचंड वाईट वाटतं. पण तो आदर मिळवून देण्यासाठी जागरूक नागरिकांनीच एकत्र येऊन पाऊल उचलण्याची आता गरज आहे. - सुनिल बर्वे, अभिनेता त्या क्षणाचा अनुभव घ्यायचायआमच्या शाळेत प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण आणि देशभक्तीपर गाणी गायली जायची. दिल्लीत जाऊन आपल्या सैनिकांची परेड समोरून बघायची माझी इच्छा आहे. त्या देशाप्रति अभिमानानं भरलेल्या वातावरणाचा मला एकदा तरी अनुभव घ्यायचा आहे. करोनाकाळात आपल्या देशाने एकात्मता काय असते ते संपूर्ण जगाला दाखवून दिलं. त्यामुळे या काळात प्राणपणाने लढलेल्या, प्राण गमावलेल्या सगळ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. संविधानाचा आपल्या आयुष्यात होणारा उपयोग, हक्क, जबाबदाऱ्या याविषयीही माहिती करून घेणं हे आपलं प्राथमिक काम आहे. - आदिनाथ कोठारे , अभिनेता संकलन : गौरी भिडे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qStVep