मुंबई टाइम्स टीम शेपूटवाल्या दोस्तांची जबाबदारी नेहमीच हवीहवीशी असते. अनेक कलाकारांनी रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या प्राण्यांवर औषधोपचार केले आहेत. मुख्य म्हणजे कलाकार त्यातील एखाद्या शेपूटवाल्या दोस्ताची स्वतः जबाबदारी घेतात. तर बाकी दोस्तांना प्राण्यांचं पाळणाघर किंवा प्राणीप्रेमींद्वारे हक्काचं घर मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. काही कलाकारांनी अडचणीत सापडलेल्या प्राण्यांना स्वत:च्या घरात आश्रय दिला आहे. ० जुळलं अनोखं नातंअभिनेता जॉन अब्राहमचे बेली या शेपूटवाला दोस्ताशी खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर अनेक वेळा पाहायला मिळतात. त्याने बेलीला २०१६ साली एका संस्थेतून दत्तक घेतलं होतं. ० आनंदाचा झराचित्रीकरणाच्या वेळी सेटवर अनेक प्राणी बघायला मिळतात. पण प्रत्येक वेळेस ते चांगल्याच अवस्थेत असतात असं नाही. २०१३ साली अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेने झलक दिखलाजाच्या सेटवर कुत्र्याच्या सात पिल्लांची अडचणीतून सुटका केली होती. तसंच २०१९ साली तिने एका कुत्र्याला दत्तक घेतलं. त्याचं नाव कॅरमेलो नेने. आपल्या लाडक्या शेपूटवाल्यासोबतचा फोटो शेअर करत माधुरी दीक्षित नेने म्हणते की, 'प्रत्येक प्राणीप्रेमीने एखादा तरी शेपूटवाला दोस्त घरात पाळायला हवा. ते तुमचं आयुष्य अगदी आनंदाने व्यापून टाकतील यात शंका नाही'. ० पांडाची रंगली चर्चाप्रियांका चोप्रा-जोन्स आणि निक जोन्स ही जोडी फॅशन किंवा त्यांच्या कामामुळे चर्चेत असते. पण यावेळी कारण थोडं वेगळं आहे. त्यांनी ऑगस्ट २०२०मध्ये एका कुत्र्याची अडचणीतून सुटका करून त्याला दत्तक घेतलं. त्याचं नाव पांडा असं ठेवलं आहे. विशेष म्हणजे ते दोघं अजून दोन पाळीव दोस्तांचे पालक असून एकाचं नाव गिनो आहे तर दुसरीचं नाव डायना आहे. ० जखमी प्राण्यांवर औषधोपचारअमायरा दस्तूर या अभिनेत्रीने अनेक पक्षी-प्राण्यांची अडचणीतून सुटका केली आहे. तसंच जखमी झालेल्या अनेक पशू-पक्ष्यांवर औषधोपचार करून त्या सगळ्यांना तिने तिच्या खंडाळ्याच्या फार्महाऊसवर ठेवलं आहे. अमायराकडे एकूण सहा शेपूटवाले दोस्त आहेत. ० मलंग आणि चार्ल्सअभिनेत्री एली अवरामने 'मलंग'च्या सेटवर एका बोक्याची अडचणीतून सुटका केली होती. तिने त्या मनीचं नाव चार्ल्स असं ठेवलं. ती मांजरीविषयी सांगते की, 'मलंगच्या शूट दरम्यान चार्ल्सच्या रूपात मला सर्वात सुंदर गिफ्ट मिळालं. शूटिंगच्या दरम्यान व्हॅनिटीमध्ये बसलेले असताना अचानक चार्ल्स व्हॅनिटीमध्ये आला. नंतर बराच काळ तो व्हॅनिटीमध्येच होता. मला देखील तो आवडला आणि मग त्या शेपूटवाल्या दोस्ताला दत्तक घ्यायचा निर्णय घेतला'. हे एलीने तिच्या एका पोस्टद्वारे शेअर केलं होतं. ० आपलंसं करू याअभिनेत्री रवीना टंडनने रस्त्यावरील अनेक भटक्या दोस्तांची अडचणीतून सुटका करत त्यांना हक्काचं घर मिळवून दिलं आहे. तिने हिमाचल प्रदेशमध्ये चित्रीकरण करत असताना १२ पिल्लांची सुटका केली आहे. मुख्य म्हणजे त्या १२ पिल्लांपैकी ११ पिल्लांना हक्काचं घर मिळवून दिलं तर त्यातल्या एकाला तिने स्वतः दत्तक घेतलं आहे. संकलन- वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39WcN0x