Full Width(True/False)

सिनेरसिकांसाठी आनंदाची बातमी, चित्रपटगृहांबाबत केंद्राने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : संपूर्ण देशावर करोनाचे संकट असताना केंद्र सरकारकडून देशभरातील विविध सेवा तसेच अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले होते. मात्र करोनासारख्या भयंकर महामारीमधून आता सगळेच सावरताना दिसत आहेत. सारं काही आता पूर्वीसारखं होताना दिसत आहे. अशातच आता सिनेरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १ फेब्रुवारीपासून चित्रपटगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांनी याबाबत माहिती दिली आहे. १ फेब्रुवारीपासून १०० टक्के प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र करोनाशी निगडीत नियमांचे पालन करणं प्रेक्षकांसाठी बंधनकारक असणार आहे. शिवाय चित्रपटगृहांबाहेरील गर्दी टाळण्यासाठी दोन शोच्या वेळेमध्ये अंतर ठेवण्यात येणार आहे. असे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे. जास्तीत जास्त ऑनलाईन तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्याचं काम सरकार करणार असल्याचंही यावेळी प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. देशभरात करोनाचा असलेला प्रादुर्भाव पाहता ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेनुसार सुरु करण्याचे आदेश सरकारने दिले होते. शिवाय चित्रपटगृहांमध्ये दोन सीटमध्ये अंतरही ठेवण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे या नियमांच्या आधारे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना प्रवेश मिळत होता. मात्र बऱ्याच प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली. मात्र केंद्राने घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे थिएटर मालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच प्रकाश जावडेकर यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मबाबतही आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरु असलेल्या बऱ्याच कार्यक्रमांबाबत आमच्याकडे तक्रार आली आहे. ओटीटीवर सुरु असलेल्या सीरिज, कार्यक्रम, चित्रपटांना अजूनही सेन्सॉर बोर्डाचे नियम लागु नाहीत. सतत येणाऱ्या तक्रारींची आम्ही दखल घेतली आहे. आणि त्याबाबत योग्य तो निर्णय ही घेतला जाईल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tbImMC